1. फलोत्पादन

खरीप हंगामात कंद पिकांची लागवड

कोकणामध्ये चांगल्याप्रकारे उत्पन्न देणारी महत्वाची कंदपिके म्हणजे रताळी, कणगर, वडीचा अळू, भाजीचा अळू, करांदा, सुरण आणि शेवरकंद ही आहेत.

KJ Staff
KJ Staff
सुरण

सुरण

कोकणामध्ये चांगल्याप्रकारे उत्पन्न देणारी महत्वाची कंदपिके म्हणजे रताळी, कणगर, वडीचा अळू, भाजीचा अळू, करांदा, सुरण आणि शेवरकंद ही आहेत.

1. कणगर

  • जमीन: पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडवी. भुसभुशीत जमिनीमध्ये मोठया आकाराचे व गुळगुळीत पृष्ठभाग असलेले कंद पोसले जातात.

  • पूर्वमशागत: नांगरुन किंवा खोदून जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी १० मे. टन या प्रमाणात पूर्ण कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मिसळावे. त्यानंतर ९० से.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.

  • जाती: कणगराच्या ‘कोकण कांचन’ या जातीची लागवड करावी. या जातीत प्रति हेक्टरी १८ मे. टन एवढी उत्पादन क्षमता आढळते. लागवडीपासून खांदणीपर्यंतचा कालावधी १८० ते २०० दिवसापर्यंत असतो.

  • लागवड: पाणी देण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात लागवड करावी. सरीमध्ये ६० से.मी. अंतरावर कंद लावून मातीने झाकावेत व ताबडतोब पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. अन्य ठिकाणी मात्र पाऊस सुरु झाल्यानंतर वरंब्यावर कंद लावावेत. लागवडीकरिता १२० ते १५० ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. एक गुंठा क्षेत्रावर लागवडीकरिता १८० ते २०० कंदाची आवश्यकता असते.

  • खते: एक गुंठा क्षेत्रासाठी लागवडीच्या वेळी ४०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ४०० ग्रॅम पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ४०० ग्रॅम नत्र द्यावा. लागवडीच्या वेळी द्यावयाचा हप्ता खड्ड्यात विभागून द्यावा व लागवडीनंतरचा हप्ता कडे पध्दतीने द्यावा.

  • आंतरमशागतः लागवडीनंतर वेलास आधार द्यावा. आधाराकरिता झाडांच्या सुक्या फांद्या किंवा शक्य झाल्यास बांबू, नायलॉन दोरी व प्लॅस्टिक सुतळ यांचा वापर करावा. जेथे सरीवर लागवड केलेली असेल अशा ठिकाणी पाऊस सुरु झाल्यानंतर वरंब्याची माती ओढून लागवड केलेल्या सरीचे रुपांतर वरंब्यात करावे. लागवडीनंतर खते देताना मातीची भर देउन वरंबे पुन्हा सुधारावेत. आवश्यकतेनुसार पिकाची बेणणी करावी.

  • पीक संरक्षण: पाने कुरतडणाऱ्या अळया व पानांवरील बुरशीजन्य रोग यांचे निराकरण करण्यासाठी प्रती लिटर पाण्यात १.५ मिली एन्डोसल्फान व २ ग्रॅम कार्बेडॅझिम या प्रमाणात मिश्रण करुन फवारावे.

  • काढणी व उत्पन्न: लागवडीनंतर सुमारे साडेसहा ते सात महिन्यांनी वेलाची पाने पिवळी पडू लागतात. यावेळेस प्रथम वेली अलग करुन नंतर कंदाची काढणी काळजीपुर्वक करावी. हेक्टरी १८ टन उत्पन्न मिळते.

  • साठवण: पुढील हंगामध्ये बियाणे म्हणून कंद वापण्यासाठी लिटरभर पाण्यात २ ग्रॅम बाविस्टीन व २ मिली मोनोक्रोटोफॉस या प्रमाणात द्रावण तयार करुन त्यामध्ये कंद बियाणे किमान अर्धा तास बुडवुन काढावेत. असे कंद मडक्यात, राखेत किंवा वाळूमध्ये साठवून ठेवावेत.

2. इतर कंदपिके:

कोकणामध्ये घोरकंद, श्वेतकंद, करांदा, सुरण या कंदपिकांची लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते.

  • जमीन: पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडवी.

  • पूर्वमशागत: लागवडीनंतर ताबडतोब आधाराची व्यवस्था करावी. आधाकरिता झाडांच्या सुक्या फांद्या किंवा शक्य झाल्यास बांबू, नायलॉन दोरी व प्लॅस्टिक सुतळ यांचा वापर करावा आवश्यकतेनुसार बेणणी करुन भर द्यावी.

  • लागवड: पावसाळी लागवड जून-जूलै महिन्यात करावी. पाण्याचा पुरवठा असल्यास, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात या पिकाची लागवड करावी. लागवड सरी-वरंब्यावर अथवा गादी वाफ्यावर करावी. लागवडीसाठी बेणे म्हणून वापर करावा. शेवरकंदासाठी बेणे (फाटा) वापरुन लागवड करावी.

  • साठवण: पुढील हंगामामध्ये बियाणे महणून वापरायचे कंद काळजीपुर्वक साठवावे लागतात. यासाठी कंद मडक्यात, राखेत किंवा वाळूमध्ये साठवून ठेवावेत.

इतर कंद पिकांच्या महत्वाच्या जाती:

  • घोरकंद
    कोकण घोरकंद: ही गोलाकार वाढणारी जात असून कंद आतून पाढरे असून चवीला उत्तम असतात. या जातीच्या वेलावर कंद धरतात ते लागवडीसाठी वापरता येतात त्यामुळे जमीनीतील कंद खाण्यासाठी वापरता येतात. सरासरी उत्पन्न १५ टन प्रति हेक्टर मिळते.
  • वडीचा अळू 
    कोकण हरितपर्णी: ही जात कंद तसेच पानापासून वडया तयार करण्यासाठी वापरतात. पान वडया करण्यासाठी गुंडाळा करताना फाटत नाहीत. कंद खाताना खवखवत नाहीत. कंदाचे उत्पन्न सुमारे ५ ते ६ टन प्रति हेक्टरी मिळते.

डॉ. आर. जी. खांडेकर आणि प्रा. म. म. कुलकर्णी
उद्यानविद्या विभाग, बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली
9422431246

English Summary: Planting of tuber crops during Kharif season Published on: 30 June 2018, 05:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters