कागदी लिंबाला फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत चांगली मागणी असते. यासाठी हस्त बहराचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. लिंबूवर्गीय झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणाऱ्या अन्नद्रव्याचा संचय होणे गरजेचे आहे. झाडाच्या फांद्यामध्ये अन्नद्रव्यांचा प्रमाणबद्ध संचय झाल्यानंतर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. हस्त बहारात शास्त्रीय पद्धतीने मशागत, खत व ओलीत व्यवस्थापन, संजीवकांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ शक्य आहे.
बहराचे वेळापत्रकः
आंबिया बहरःफुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होऊन फळांचे उत्पादन जून ते ऑगस्ट या महिन्यात मिळते. परंतु या काळात बाजारात फळांना फार कमी दर असतो.
मृग बहरःफुलधारणा जून-जुलै महिन्यात होऊन फळांचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिळते. फळांवर चकाकी असते, मात्र अपेक्षित दर मिळत नाही.
हस्त बहरः फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होते. फळे मार्च-मे महिन्यामध्ये काढणीस येतात. या काळात फळांना मागणी आणि दरही चांगला असतो.
हस्त बहराचे नियोजनः लिंबू झाडावर मृग बहराची फळे नसावीत. याकरिता झाडाला मृग बहार न येण्याची सवय लावणे जरुरी असते. असे केल्याने हस्त बहार नियमित येत राहील.
जिबरेलीक आम्लाच्या वापरामुळे मृग बहार फुटण्यास प्रतिरोध होऊन फुलधारणेऐवजी झाडाची शाकीय वाढ होते. मृग बहाराची फुले उशिरा म्हणजेच जून-जुलै ऐवजी ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजेच हस्त बहारात फुटण्यास मदत होते.हस्त बहर धरण्यासाठी लिंबू बागायतदारांनी जून महिन्यात ५० मिलि जिबरेलीक आम्ल प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी केलेली आहे. त्यामुळे झाडाला विश्रांती मिळते. विश्रांती दिल्यामुळे झाडे सुप्त अवस्थेत जातात. या कालावधीमध्ये कर्ब आणि नत्राचा संचय होतो. (ॲग्रेस्को शिफारस) झाडांना १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाण्याचा ताण द्यावा लागतो. ताणाच्या कालावधीत पाऊस येत असल्याने योग्य प्रकारे ताण बसत नाही. यासाठी प्रति लिटर पाण्यात एक ग्रॅम क्लोरमेक्वाट क्लोराईड मिसळून फवारणी करावी.
(ॲग्रेस्को शिफारस) आवश्यकतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी हीच फवारणी करावी. क्लोरमेक्वाट क्लोराईड हे संजीवक जिबरेलीक आम्लाचे प्रमाण कमी करते. त्यामुळे झाडांची वाढ थांबते, फुलोऱ्यात रूपांतर होण्यास मदत होते. कर्ब आणि नत्राचा संचय योग्य गुणोत्तर प्रमाणात होतो.
अन्नद्रव्य व्यवस्थापनः हस्त बहाराचे नियोजन केल्यावर झाडावर हंगाम नसताना देखील फळांची संख्या अधिक राखली जाते. यामुळे झाडांची होणारी झीज भरून काढणे, झाडांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी योग्य वेळी अन्नद्रव्यांच्या योग्य मात्रेचे नियोजन करावे.
सहा वर्ष आणि त्यावरील झाडांना ४० किलो शेणखत, ६०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे.
जुलै महिन्यात दिलेले प्रति झाड ४० किलो शेणखत पावसामुळे जमिनीत चांगले कुजते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
पाण्याचा ताण तोडताना, प्रतिझाड ३०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश द्यावे. उरलेल्या ३०० ग्रॅम नत्राची मात्रा बहर आल्यापासून साधारणपणे एक महिन्याने द्यावी. हा काळ फळांच्या वाढीचा असल्यामुळे झाडाची नत्राची गरज वाढते. स्फुरद व पालाशची अतिरिक्त गरज, पालाशची मात्रा अगोदर देवूनही मातीद्वारे उशिरा उपलब्ध होत असल्याने या कालावधीत आवश्यकतेनुसार पूर्ण होते.
बहर येण्याकरिता ताण दिल्यानंतर होणारी फुलगळ रोखण्यासाठी अन्नद्रव्यांची त्वरित उपलब्धता होणे आवश्यक असते. मातीद्वारे दिलेली अन्नद्रव्ये त्वरित उपलब्ध होत नाहीत. याकरिता ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा ताण तोडताना, प्रतिलिटर पाण्यात १० ग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट मिसळून फवारणी करावी. यामुळे नत्र व पालाशची गरज त्वरित पूर्ण केली जाते.
फुलधारणेच्या काळात झाडांस आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता झाल्यामुळे अपेक्षित फुलधारणा होऊन फुलगळतीवर नियंत्रण दिसून येते.
फवारणीः प्रति लिटर पाणी
१) झिंक उपलब्धताः झिंक सल्फेट ५ ग्रॅम
२) बोरॉन उपलब्धताः बोरॉन १ ग्रॅम
३) ताण तोडतानाः चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण २ ग्रॅम
ओलित व्यवस्थापनः वाफ्यातील ओलावा टिकवून ठेवण्याकरिता, वाफ्यामध्ये वाळलेल्या गवताचा ५ सेंटिमीटर जाडीचा थर द्यावा. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलित राहून प्रत्येक महिन्याला एका पाण्याच्या पाळीची बचत होते. जमिनीतील उपयुक्त जिवाणू सक्रिय होऊन मुळांचे अन्नद्रव्य घेण्याचे कार्य वाढते. फळगळ कमी होऊन वाढ चांगली होते.
ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास ३० टक्के पाण्याची बचत होते. फळांची प्रत उत्तम आणि झाडावर सल सुद्धा कमी आढळते.
दुहेरी आळे पद्धतीत पाण्याचा आणि खोडाचा संपर्क न आल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
बागेतील ओलावा ४० टक्के झाल्यावर, ओलीत केल्यास फळांची प्रत उत्तम राहून उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्पोत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी व शिफारशीत खताच्या मात्रेच्या ८० टक्के खते (१४० ग्रॅम नत्र, २४० ग्रॅम स्फुरद आणि २४० ग्रॅम पालाश प्रति झाड) द्यावीत. यामुळे फळे मोठ्या आकाराची व दर्जेदार होऊन उत्पादनात चांगली वाढ होते.
हस्त बहाराकरिता ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्य व पाणी नियोजन ः (दहा वर्षे आणि त्यावरील झाडांकरिता)
महिना पाणी (लिटर/दिवस/झाड)- खते (ग्रॅम/झाड)
नत्र स्फुरद पालाश
ऑगस्ट ४८ ०० ०० ००
सप्टेंबर- ताणाचा कालावधी ०० ०० ००
ऑक्टोबर १५ ऑक्टोबर पर्यंत ताणाचा कालावधी सोडून ५८ लिटर १२० ६० ४८
नोव्हेंबर ५३ १२० ६० ४८
डिसेंबर ४६ ९६ ४८ ४८
खैऱ्या रोग नियंत्रण ः
फवारणी ः प्रति लिटर पाणी
कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम
जून ते सप्टेंबर या काळात ३० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.
(ॲग्रेस्को शिफारस)
(टीप ः स्ट्रेप्टोमायसीन हे संक्षिप्त नाव वरील लेखात घेतले असले तरी या प्रतिजैविकातील सक्रिय घटक पुढीलप्रमाणे आहेत. स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड १० टक्के.)
संपर्क :डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३
उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Share your comments