Agriculture Management : मागील काही दिवसांपासून शेतकरी सातत्याने अवकाळी आणि सुलतानी संकटात सापडत आहे. या संकटातून कोणताच शेतकरी वाचताना दिसत नाही. तसंच फळबाग उत्पादक शेतकरी देखील अडचणीत येताना दिसत आहेत. मोसंबी उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत. मोसंबीवर सातत्याने मावा, सिल्ला, पाने खाणारी अळी, ढेकूण, डिंक्या अशा रोगांमुळे शेतकरी अडचणीत येतात. फळगळ देखील सातत्याने होत असते. यामुळे आंतरमशागतीची कामे वेळेवर करून तणनियंत्रण करावे. किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेता सापळे लावावेत, असा सल्ला कृषी अभ्यासक देतात .
किड आणि रोग व्यवस्थापन कसे करणार
मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 20 मिलीलीटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसंच पाने खाणाऱ्या अळीला रोखण्यासाठी क्विनॉलफॉस 20 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ढेकूणच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 25 मिलीलीटर किंवा डायमेथोएट 20 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबिया बहार घेण्याकरिता खताचे नियोजन
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर त्वरीत प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरण करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमान वाढताच हलके ओलित करावे. ताण तोडतांना हलक्या ओलिताअगोदर प्रत्येक झाडाला 600 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 पालाश आणि भरखते द्यावीत, त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.
संत्रा/मोसंबीचे बहार
निसर्गतः संत्रा/मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी पावसाळ्यात (जून-जुलै) येणाऱ्या बहारास "मृग बहार' (मृग नक्षत्रात येणारा) आणि पावसाळा संपल्यानंतर (ऑक्टोबरमध्ये) येणाऱ्या बहारास "हस्त बहार' (हस्त नक्षत्रात येणारा) तर थंडी संपतेवेळी (जानेवारी-फेब्रुवारी) म्हणजे आंब्याला ज्या वेळी बहार येतो तो "आंबिया बहार' असे तीन बहार वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येतात.
Share your comments