फुलांमुळे, फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे पण केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. बेल शास्त्रीय नाव: Aegle marmelos, एगल मार्मेलोस, इंग्लिश: Bael, बेल हा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या उष्णकटिबंधीय भूप्रदेशांत आढळणारा एक दिव्यवृक्ष त्यापैकीच एक आहे. भारतीय संस्कृतीत बिल्वपत्रला नव्हे तर संपूर्ण बेल वृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्राचा उपयोग केला जातो त्यामुळे हिंदूधर्मात बेल आणि बिल्वपत्रला पवित्र स्थान आहे. बिल्ववृक्ष हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला आहे. पानांबरोबरच बेलाच्या फळालाही महत्त्व पावलेले आहेत. बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव एगिल या इजिप्तशियन या देवतेवरून ठेवले गेले.
बेल हा एगेल प्रजातील एकमेव वृक्ष आहे. या वृक्षला देशाच्या विविध भागामध्ये आणि देशाबाहेरही वेगवेगळ्या नावाने ओळखले जाततात जसे मराठी (बेल); हिंदी (बेल, सिरल); संस्कृत (बिल्वा, श्रीफळ, शिवद्रम, शिवपाल); तेलगू (मारे डू); बंगाली (बिल्बम); गुजराती (बिल); कन्नड (बिप्तारा, कुंबळा, मालुरा); तामिळ (कुवलम); थाई (मातम आणि मॅपिन); कंबोडिया (फ्नू किंवा पीनोई); व्हिएतनामी (बाऊनऊ); मलायन (माझ पास); फ्रेंच (ओरंगेर ड्यू मालाबार); पोर्तुगीज (मार्मेलोस) अशा वेगवेगळ्या नावांनी बेल वृक्षाला संबोधले जाते.
हेही वाचा :रताळ्याचे आकरा फायदे; रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे फायदेशीर
बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी, देवाळांजवळ, उद्यानांमध्ये, किंवा घराच्या परसबागेत वाढवली जातात. या झाडांना खूप महत्व आहे. वातावरणामध्ये ते हवामानातील शुद्धीकरणाचे कार्य करते कारण भरपूर प्रमाणात प्राणवायू इतर झाडाच्या तुलनेत जास्त सोडतात, प्राणवायूचा एक स्त्रोत म्हणुन बेल वृक्ष कार्य करतो आणि वातावरणामधील विषारी वायू शोषून घेतो. या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात. बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि या गुणवंत फळाचा चंदनासारखा सुगंध वातावरण भारून टाकणारा असतो. केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने, फुले, झाडाची साल व खोडाचा गाभा याचाही आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयोग करता येतो.
एका छोट्याशा बेलापासून आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. पोटदुखीपासून तर मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर बेल गुणकारी आहे. बिल्वपत्रासाठी बेलाच्या झाडाचा वापर सर्वसामान्यांना माहिती आहे. पण, या झाडाला लागणारे बेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते कारण बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते. पण, त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतो. चिकट, तंतुमय पदार्थ आणि त्यात असलेल्या मोठ्या प्रमाणातील बिया यामुळे बेल फळ खाण्यासाठी अवघड जाते.
गावखेड्यात जुन्या जाणकारांकडून बेलाच्या या फळाचा वापर केला जातो. पण, बदलत्या व्यवस्थेत या फळाच्या गुणाकडे काहीसे दुर्लक्ष होत चालले आहे. पण, बेलापासून अनेक फायदे असल्याने प्रत्येकाने या फळाचा उपयोग करायला पाहिजे. बेल फळाच्या औषधी उपयोगाची गणना करता येत नाही. बेलाचे विविध भाग विविध उपचारत्मक म्हणून वापरले जातात. जसे की अस्थमा, रक्तक्षय, अशक्तपणा, जखमा, सूज येणे, उच्च रक्तदाब, कावीळ, अतिसार, अशा अनेक रोगावर गुणकारी आहे. पौष्टिक मूल्यामध्ये बेल फळ उच्च आहे त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, तंतुमय पदार्थ यांचा चांगला स्त्रोत आहे. बेल फळात जीवनसत्व ब2 सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. बेल फळ सर्वात पौष्टिक फळापैकी एक आहे. बेल फळामधील चिकट पोत आणि लागद्याला अगदी आकर्षक रंग आणि उत्कृष्ट सुगंध जो प्रक्रिया केल्यानंतरही नष्ट होत नाही.
बेल फळाचे पौष्टिक मूल्य:
बेल फळाच्या लगदया मध्ये स्टिरॉइड्स, कूमारिन्स, फ्लॅनोनोयड्स, टेरपेनॉईड, फिनोलॉलिक संयुगे, लिग्निन, इनुलीन, आणि अन्य एंटिऑक्सिडेंट जी आपल्याला जुनाट रोगांपासून वाचवू शकते. याव्यतिरिक्त, त्यात प्रथिने, कर्बोदके, खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह) आणि जीवनसत्वे (विट ए, विट बी, विट सी आणि रिबोफॅव्हिन) यांचा समावेश आहे. अॅल्कॉइड, कार्डियाक ग्लायकोसाइड आणि फ्लॅनोनोयड्स इत्यादीचा उत्तम स्त्रोत आहे. बेलफळ हे स्थानिक पारंपारिक औषधांसाठी वापरले जाणाऱ्या महत्वाचे झाडांपैकी एक आहे. पारंपारिक औषधांमध्ये त्याच्या वापराचे असंख्य संदर्भ दिलेले आहेत.
आरोग्यवर्धक फायदे:
- मधुमेह विरोधी: मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे. रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो. किंवा 250 मिली ग्राम प्रती किलो ग्राम शरीराच्या वजनानुसार बेल फळाचा अर्क घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येतो कारण कौमारीन (coumarins) नावाचा घटक बेल फळामध्ये असल्यामुळे इन्सुलिन निर्माण करण्यासाठी बीटा पेशीला उत्तेजित करतो.
- अतिसार आणि आमांश विरोधी: उन्हाळ्याच्या दिवसात अतिसार ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या, हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. किंवा कच्चे फळे खाल्यास अतिसार नियंत्रणामध्ये येतो. अर्धे पिकलेली फळ हे सर्वोत्तम मानले जाते परंतु संपूर्ण पिकलेली फळे किंवा अगदी फळाचा चूर्ण परिणामकारक परिणाम दर्शवितो.
- बद्धकोष्ठता: योग्य परिपक्व फळ सर्वोत्तम रेचक मानले गेले आहे. पिकलेले फळे 2 ते 3 महिने नियमितपणे खाल्यास जड पदार्थ काढण्यात प्रभावी आहे.
- अपचनापासून मुक्ती: पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ रामबाण औषध आहे. बहुतांश रोगांची सुरुवात पोटापासून होत असते. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे. पुढचे मोठे आजार टाळणे शक्य आहे.
- रक्तक्षयविरोधी: बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात. अशा परिस्थितीत वाळलेल्या बेलाच्या गराचा चूर्ण तयार करून गरम दुधात रोज एक चमचा शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.
- गर्भवती महिलांसाठी: गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे. त्यापासून गर्भवती महिलांना आराम मिळतो.
- उन लागल्यास: जागतीक तापमानवाढीमुळे दरवर्षी पारा उन्हाळ्यात वाढत जातो. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. अशा वेळी बेलाचा शरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो.
याचबरोबर इतर आजारात अनेक रोगावर बेल फळ रामबण उपाय म्हणून वापरले जाते जसे की मलेरिया विरोधी, व्रणविरोधी, कर्करोगविरोधी, जीवाणू विरोधी, आणि कावीळ इत्यादी रोगावर बिल्ववृक्षाचा झाडांच्या जवळजवळ सर्व भाग उदा. मूळ, झाडाची साल, पाने, फुले किंवा फळे एक किंवा इतर मानवी आजार बरा करण्यासाठी वापरतात. यांच्यात असलेल्या विशिष्ठ आरोग्यवर्धक घटकामुळे उपचारत्मक म्हणून बेल फळ ओळखले जाते.
के. आर. सवळे व प्रा. एच. डब्लू. देशपांडे
अन्न सूक्ष्मजीव आणि सुरक्षा विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Share your comments