1. फलोत्पादन

भाजीपाला पिकांच्या परीपक्वतेचे मापदंड व काढणी

भाजीपाला पिकांच्या उत्पादनात भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला पिकांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके इ. मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे मानवी आहारामध्ये भाजीपाला पिकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. भाजीपाला पिकांचे प्रती हेक्टर मिळणारे जास्त उत्पादन, काढणीसाठी लागणारा कमी कालावधी, दिवसेंदिवस देशांतर्गत व परदेशात वाढणारी मागणी इ. कारणामुळे भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

KJ Staff
KJ Staff


भाजीपाला पिकांच्या उत्पादनात भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला पिकांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके इ. मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे मानवी आहारामध्ये भाजीपाला पिकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. भाजीपाला पिकांचे प्रती हेक्टर मिळणारे जास्त उत्पादन, काढणीसाठी लागणारा कमी कालावधी, दिवसेंदिवस देशांतर्गत व परदेशात वाढणारी मागणी इ. कारणामुळे भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

भाजीपाला पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, किडरोग व्यवस्थापन इ. बाबींना जसे अनन्यसाधारण महत्व आहे तसेच भाजीपाला पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. भाजीपाला पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी पिकांच्या परिपक्वतेचे मापदंड माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. भाजीपाला पिकांच्या परिपक्वतेचे मापदंड खालीलप्रमाणे आहे.

  • लागवडीपासून किंवा फळधारणेपासून फळ तयार होण्यासाठी लागलेले दिवस
    सर्व भाजीपाला पिकांचा जीवनक्रम हा ठरलेले असतो, त्यात जमिनीचा प्रकार, लागवडीसाठी वापरलेली जात, लागवडीचा हंगाम इत्यादीत थोडाफार बदल होऊ शकतो. त्यानुसार आपण काढणीचा योग्य कालावधी ठरवू शकतो.
  • भाजीपाला पिकांमध्ये डोळ्यांना दिसणारे बदल 
    भाजीपाला पिके परिपक्व होत असताना त्याच्या आकारमानात, रंगामध्ये विशिष्ट बदल होत असतो. पिकांच्या या होणाऱ्या बदलानुसार आपण त्याचा काढणीचा वेळ ठरवू शकतो.
  • घनता, वजनामध्ये झालेली वाढ
    जसे जसे भाजीपाला पिके परिपक्व होत जातात त्यानुसार त्यांच्या वजनात वाढ होते. परिपक्वतेनुसार फळांच्या वाढलेल्या वजनानुसार आपण त्या भाजीपाला पिकांचा काढणीचा वेळ ठरवू शकतो. 
  • भाजीपाला पिकांमधील साखर, आम्लता, सामू यांचे प्रमाण

वरील परिपक्वतेच्या मापदंडाप्रमाणे पिकानुसार जातीपरत्वे आपल्याला सोप्या व सोयीच्या वाटलेल्या मापदंडानुसार काढणी करावी.

भाजीपाला पिकांच्या योग्य परिपक्वतेला काढणीचे महत्व

  • बाजारामध्ये जास्त मागणी व चांगले दर मिळतात.
  • पिकांची वाढ चांगली होते.
  • नवीन फुलांची व फळांची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते.
  • पिकांची गुणवत्ता वाढून दर्जेदार उत्पादन मिळते.
  • कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • भाजीपाला पिकांची चव चांगली लागते व टिकवणक्षमता वाढते.

भाजीपाला पिकांची परीक्वतेनुसार काढणी

भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी गृहीत धरलेली परिपक्वता हि कोणत्या हेतूसाठी भाज्यांची काढणी केली आहे, ह्यावर अवलंबून असते, म्हणजे पिकांची काढणी स्थानिक बाजारपेठेसाठी, दूरच्या बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी वेगवेगळ्या परिपक्वतेला करावी लागते.

  • टोमॅटो: रोपांच्या लागवडीपासून जातीनिहाय, हंगाम, जमीन इ. गोष्टी विचारात घेता साधारत १०-१२ आठवड्यांनी फळे काढणीसाठी तयार होतात. दूरच्या बाजारपेठेसाठी पिकण्यास सुरवात झालेल्या फळांची काढणी करावी व स्थानिक बाजारपेठेसाठी पूर्ण पिकलेली फळे व प्रक्रीयेसाठी झाडावर पूर्ण पिकलेली किंचित मऊ पडलेली फळे काढावी.
  • वांगी: रोपांच्या लागवडीपासून जातीनिहाय, हंगाम, जमीन इ. गोष्टी विचारात घेता साधारत १०-१२ आठवड्यांनी फळे काढणीसाठी तयार होतात. पूर्ण वाढलेली परंतु कोवळी, आकर्षक, चमकदार फळे काढावीत. फळांचा रंग आकर्षक नसल्यास ती फळे जास्त पक्व झाली आहे असे समजावे. अशा फळांना बाजारात मागणी नसते.
  • मिरची: लागवडीपासून ४०-५० दिवसांनी हिरव्या फळांची तोडणी करण्यास सुरवात होते. मिरच्या वाळवून साठवायच्या असतील तर ७०-८० दिवसांनी रंग लाल झाल्यानंतर फळे तोडायला सुरवात करावी.
  • ढोबळी मिरची: लागवडीपासून ४५-५० दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात. फळे योग्य आकाराची, आकर्षक रंग असताना काढावी. रंगीत ढोबळी मिरचीमध्ये फळांचा रंग जातीप्रमाणे पिवळा, लाल होण्यास सुरवात झाल्यानंतर काढणी करावी.  
  • कांदा व लसून: हंगाम व जातीनुसार १००-१२० दिवसात कांदा व लसून काढणीस तयार होतो. पाने करपण्यास सुरवात झाली किंवा ५०-६०% माना पडल्यानंतर काढणीस सुरवात करावी.
  • भेंडी: लागवडी नंतर ४५-५० दिवसात फळे काढणीस तयार होतात. निर्यातीसाठी आकर्षक हिरव्या रंगाची, कोवळी, लुसलुशीत, ६-९ से.मी. लांबीची फळे एक दिवसाआड काढावी.
  • कोबीवर्गीय भाजीपाला: जातीपरत्वे, हंगामानुसार ९०-१०० दिवसांनी गड्डा काढणीस तयार होतो. कोबी पिकाचे आकर्षक हिरव्या रंगाचा, घट्ट गड्डा काढावा.
  • फुलकोबी: योग्य आकाराचा, आकर्षक पांढऱ्या रंगाचा गड्डा काढावा. काढणीस उशीर झाल्यास गड्डा पिवळसर होऊन त्याचा आकर्षकपणा नाहीसा होतो.
  • वेलवर्गीय भाजीपाला: यामध्ये काकडी, भोपळा, कारली, दोडके, गिलके इ. समावेश होतो. या पिकांची पूर्ण वाढ झालेली परंतु कोवळी, आकर्षक फळे काढावी. काढणीस उशीर झाल्यास फळांचा आकर्षकपणा नाहीसा होऊन चांगली चव लागत नाही. तसेच बाजारभाव पण कमी मिळतो.
  • शेंगवर्गीय भाजीपाला: यामध्ये वाल, घेवडा, वाटणा, चवळी, गवार इ समावेश होतो. या सर्व पिकांची पूर्ण वाढ झालेली परंतु कोवळी फळे काढावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगाची प्रत खालावते.
  • पालेभाज्या: यामध्ये मेथी, शेपू. कोथिंबीर, पालक इ. समावेश होतो. या पालेभाज्या लागवडीनंतर हंगामनिहाय, जातीपरत्वे ४०-५० दिवसात काढणीसाठी तयार होतात. या पालेभाज्यांची आकर्षक हिरव्या रंगाची, कोवळी पाने असताना काढणी करावी.

लेखक:
प्रा. योगेश लक्ष्मण भगुरे
सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग
कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक
९९२२४१४८७३

English Summary: Maturity and harvesting of vegetable crops Published on: 27 April 2020, 09:11 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters