महाराष्ट्रातील शेतकरी सिंचनासाठी प्रामुख्याने पृष्ठभागावरील पाणी आणि भूजलाचा वापर करत आहेत. पृष्ठभागावरील पाणी म्हणजे नद्या, तलाव यामधील पाणी जे हलके मानले जाते हर भूजल म्हणजेच विंधन विहिरी ( भूगर्भातील पाणी ) किंवा विहिरी मधील पाणी ज्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते जड मानले जाते.
परंतु आता मागील काही वर्षापासून सिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि परिणामी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरिक्त वापर शेतीमध्ये सिंचनासाठी केला जात आहे. क्षारयुक्त पाण्याचा वापर वाढल्याने त्याचे दुष्परिणाम जमिनीवर व शेतीमधील उत्पादनावर दिसून येत आहेत.क्षार युक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठवुन खराब होत आहेत किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत असल्याचे दिसून येत आहे.
1) पाण्यामधील क्षाराची कारणे :
1) भूजलातील पाण्यामध्ये किती क्षार आहेत हे ठरण्यामागे तेथील भौगोलिक परिस्थिती, मातीतील क्षाराचे प्रमाण, खडकांचा प्रकार असे अनेक घटक कारणीभूत असतात.पावसाचे पाणी किंवा पृष्ठभागावरील पाणी जमिनीत मुरताना किंवा झिरपत असताना ते मातीतून, खडकांमधून वाहत जात असते. यावेळी मातीतील क्षार पाण्यात विरघळत असतात.
2) साधारणत: क्लोरिन, बायकार्बोनेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यांसारखे क्षार पाण्यात मिसळले जातात.
3) यासोबत आपण शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरत असलेले रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे देखील पाणी क्षारयुक्त होत आहे.
2) क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम :
1) पिकांना सतत क्षारयुक्त पाणी दिल्यास जमिनीतील क्षाराचे प्रमाण वाढते. मातीवर क्षारांचा पांढरा थर जमा होतो व जमीन क्षारपड होते. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून कस कमी होतो. तसेच क्षारपड झालेल्या जमिनीमध्ये बियाण्याची उगवण देखील कमी होते.
2) सध्या सिंचनासाठी ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात वापरले जाते. परंतु ठिबक सिंचन ना मध्ये क्षारयुक्त पाणी वापरल्याने ठिबक सिंचन प्रणाली मधील नळ्यांमध्ये आणि छिद्रांमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे थर जमा होतात. व छिद्रे बुजून जातात. त्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही. त्याचसोबत ठिबक सिंचन प्रणालीच्या देखभालीचा खर्च देखील वाढतो.
3) पाण्यातील क्षारांचा पिकांच्या मुळावर देखील दुष्परिणाम होतो. क्षारांमुळे पिकांच्या मुळांभोवती एक आवरण तयार होते. त्यामुळे मुळांची नीट वाढ होत नाही व परिणामी पिकांची वाढ खुंटते व उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो.
Share your comments