पिकांमध्ये किंवा फळ पिकांमध्ये आंतरपीक घेणे हा एक उत्पादन वाढीच्या आणि आर्थिक उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून खूप चांगला पर्याय आहे. विविध पिकांमध्ये जसे आपण आंतर पीक घेतो.
अगदी त्याच प्रमाणे फळ पिकांमध्ये सुद्धा आंतरपीक घेता येणे शक्य आहे. कारण फळझाडांची लागवड ही एकमेकांपासून जास्त अंतरावर असते. त्यामुळे फळ पिकांमध्ये फुलपिकांची लागवड करणे खूप फायद्याचे ठरते. आंतरपीक पद्धतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या मुळाच्या पद्धती आणि वाढीच्या कालावधीत भिन्नता असणारी पिके शिवाय ज्या पिकांना अर्धवट सावली आवश्यक असते अशा लहान पिकांच्या बरोबरीने उंच पिके लागवडीसाठी निवडली जातात. फुल पिकांचा विचार केला तर अगदी कमीत कमी जागेत आणि कमीत कमी वेळेत जास्त आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता या पिकांमध्ये असते. त्यामुळे फुलपिके हे मुख्य पीक म्हणून न घेता तर मुख्य पिकांसोबत आंतरपीक म्हणून लागवड करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे आंतर पिकात जास्त उत्पन्न मिळत असल्याने फळे पिकांमध्ये फुल पिकांचे आंतरपीक म्हणून अंतर्भाव करणे खूप फायद्याचे ठरू शकते. आंतरपीक पद्धतीमध्ये पिकाच्या मुळाच्या पद्धती आणि वाढीचा कालावधी यामध्ये भिन्नता असणारी पिके यांची निवड करणे महत्त्वाचे ठरते.
फळबागांमध्ये फुलांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव
1- फळबागांमध्ये आंतरपीक लागवड हा एक चांगला पर्याय आहे. फळपिकांची लागवड एकमेकांपासून जास्तअंतरावर केली जाते त्यामुळे दोन झाडांच्या लागवडी मधील पट्ट्यात फुल पिकाची लागवड करणे शक्य होते.
2- आंबा, चिकू, नारळ, सिताफळ, द्राक्ष, संत्रा, डाळिंब यासारख्या जास्त अंतरावरील फळ पिकांमध्ये फुलझाडांची लागवड ही अत्यंत कार्यक्षम रीतीने करता येते.
3- अनेक प्रकारच्या प्रयोगात्मक अभ्यासातून सिद्ध झाले आहे की, फुल पिकांचा जर आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला तर मुख्य पिकांच्या उत्पन्नावर किंवा गुणवत्तेवर कोणताही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही.
फुल पिकांचे आंतरपीक घेण्याचे फायदे
1- कमीत कमी कालावधीत काढणी करता येणे शक्य.
2- आवश्यकता आणि मागणीनुसार मुख्य पिकांमध्ये लागवड करता येते.
3- फुल पिकांचा सापळा पीक म्हणून देखील उपयोग करता येतो.
4- जर फळबागांमध्ये फूल पिके आंतरपीक म्हणून घेतली तर परागीभवन अधिक प्रभावीपणे होते व फळधारणा होण्यास मदत होते.
5- फळ बागांमधील दोन फळझाडांच्या ओळींमधील जागेचा फूल पिकांच्या लागवडीसाठी वापर करता येतो.
6- मोकळ्या जागेमध्ये आंतरपिकाचा अंतर्भाव केल्याने तण वाढत नाही, त्यामुळे तणनियंत्रणासाठी चा खर्च वाचतो.
आंतरपीक घेताना घ्यायची काळजी
1- आंतरपीक म्हणून फुल पिकाची निवड करताना मुख्य पीक आणि आंतरपीक यांचा वाढीचा कालावधी किती आहे याचा अभ्यास करून व खात्री करूनच निवड करावी.
2- जसे लिली, निशिगंधा इत्यादी सारखे कंदवर्गीय फुलपिके बटाटा आणि रताळी सारख्या कंदवर्गीय पिकांसोबत घेऊ नये.
3- आपल्याला आंतरमशागत करावी लागते त्यामुळे फळबागांमध्ये जागेचा तसेच काही यंत्रे किंवा ट्रॅक्टरचा उपयोग कसा करतो हे लक्षात घेऊनच फुलपिके लागवडीचे नियोजन करावे.
4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळबागांमध्ये मुख्य फळांचा हंगाम व त्याचा कालावधी लक्षात घेऊनच आंतरपिकासाठी फुल पिक लागवडीचा निर्णय घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:नोकरी; राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे विविध पदांसाठी भरती
Share your comments