
melon cultivation
खरबूज पिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अगोदर नदीच्या पात्रामध्ये याची लागवड केली जात होती. परंतु आता या पिकाची लागवड व्यापारी तत्त्वावर खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. दुष्काळी भागात येणारे पीक म्हणून खरबूज पीक ओळखले जाते. या लेखामध्ये आपण या पिकाच्या लागवड पद्धती विषयी माहिती घेऊ.
खरबूज पिकासाठी लागणारी जमीन व हवामान
रेताळ, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन यासाठी आवश्यक असते.जमिनीचा सामू साडेसहा ते सात असावा. पाणी धरून ठेवणारी जमीन असेल किंवा चोपण जमीन असेल तर त्यामध्ये हे पीक घेऊ नये. जमीन जर भारी असेल आणि पिकाला पाणी जर नियमित दिले नाही तर फळे तडकतात.या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याची लागवड करतात. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी 24 ते 26 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
खरबुजाच्या उपयुक्त सुधारित जाती
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुसा सरबती,हरामधू,पंजाब सुनहरी व दुर्गापुरा मधू या जाती शिफारशीत केले आहेत.
खरबूज रोपवाटिका व्यवस्थापन
- पूर्वी थेट बियाणे टोकून खरबुजाची लागवड करायचे परंतु सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रो ट्रे मध्ये वाढवलेले रोपांची पुनर्लागवड केली जाते. यामुळे वेलांचे योग्य प्रमाण, मजूर, पाणी आणि इतर कृषी निविष्ठा वर होणारा खर्च वाचतो.
- रोपे तयार करण्यासाठी साधारण 98 कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपिट भरून बियाणे लागवड केली जाते.
- दीड ते दोन किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते.
- लागवड केल्यानंतर आठ ते दहा ट्रे एकावर एक ठेवून काळा पॉलिथिन पेपरने झाकून घ्यावेत. टाकल्यामुळे उबदारपणा टिकून राहतो व बी लवकर उगवते.
- रोपे उगवल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावे.
- रोपांची सवड होऊ नये म्हणून पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड ची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
- नाग अळी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- 14 ते 16 दिवसात पहिला फुटवा फुटल्यानंतर रोपांची पुनर्लागवड करावी.
- लागवड एक दीड बाय एक मीटर अंतरावर किंवा 1.5×05 मीटर अंतरावर करावी.
- लागवडीचा हंगाम उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मार्च आणि पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर
खरबुज लागवडीचे तंत्र
- लागवडीसाठी 75 सेंटिमीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर उंच गादीवाफे तयार करावेत.
- लागवडीपूर्वी 50 किलो नत्र,स्फूरदव पालाश प्रतिहेक्टरी व लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी मात्रा द्यावी
- बेसल डोस मध्ये एकरी पाच टन शेणखत + 50 किलो डीएपी + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 50 किलो 10:26:26+ 200 किलो निंबोळी पेंड+दहा किलो झिंक सल्फेट मिसळावे.
- दोन गादीवाफ्यात च्या मध्ये लॅटरल येते अंतर सात फूट असावे.
- गादी वाफ्याचा वरचा माथा 75 सेंटिमीटर असावा. वाफ्याच्या मध्यभागी लॅटरल टाकून यावर चार फूट रुंदीचा मल्चिंग पेपर अंथरून दोन्ही बाजूंनी पेपर व माती टाकावी. जेणेकरून पेपर वाऱ्यामुळे फाटणार नाही.
- मल्चिंग पेपर अंथरला नंतर दोन इंची पाईप च्या तुकड्या च्या सहाय्याने ड्रीपर च्या दोन्ही बाजूंना दहा सेंटिमीटर अंतरावर छिद्रे पाडावीत.
- ट्रीप लाईनच्या एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर दीड फूट ठेवावे.
- छिद्रे पाडून झाल्यावर गादीवाफा ओलून वाफसा आल्यानंतर लागवड करावी.
- रोपांची लागवड करताना रोपे व्यवस्थित दाबून पेपरला चिकटणार नाही याची काळजी करून लावावे.जेणेकरून रोपांची मर होणार नाही. अशा पद्धतीत एकरी सुमारे सात हजार दोनशे पन्नास रोपे लागतात.
Share your comments