1. फलोत्पादन

फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

फळबाग जुनी, अधिक वर्षाची असेल, फळझाडांची वाढ चांगली झाली असेल तर अशा क्षेत्रातून मातीचे नमुने घेतांना फळझाडांना अन्नपुरवठा होणाऱ्या क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. साधारणपणे झाडाच्या बुंध्यापासून 2 ते 4 फूट लांब व दुपारी 12 वाजता झाडाची सावली ज्या भागात पडत असेल, त्या भागाच्या बाहेरचा दीड ते दोन फूट एवढा भाग सोडून मधल्या भागातून झाडांना जास्तीत जास्त अन्न पुरवठा होतो असे समजण्यात येते, अशा भागातून 12 इंच (किंवा 30 से.मी.) खोलीचे मातीचे नमुने घ्यावेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
soil sample news

soil sample news

डॉ.आदिनाथ ताकटे

फळबागेसाठी जमिन उत्तम निचरा होणारी असावी. ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे, अशा जमिनीत फळबाग घेऊ नये. माती परिक्षणासाठी सर्वसाधारण पिकाचे क्षेत्रामधील ज्याप्रमाणे मातीचे नमुने घेतले जातात, त्यापेक्षा थोडया वेगळया पध्दतीने मातीचे नमुने तपासणीसाठी घेणे आवश्यक आहे.

फळबागेतून मातीचे नमुने घेताना फळबाग किती जुनी आहे हे विचारात घेणे आवश्यक आहे. फळबाग नव्यानेच केली असेल, तर अशा क्षेत्राचे नमुने घेताना 100 से.मी. खोलीपर्यंत अथवा मुरुम लागेपर्यंत प्रत्येक 30 सें.मी. (1 फुट) थराचे म्हणजेच 0 ते 30 से.मी. (पहिला थर), 30 ते 60 सें.मी. (दुसरा थर) आणि 60 ते 90 से.मी. (तिसरा थर) या प्रमाणे मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावेत. शक्य असल्यास नमुने घेताना जमिनीचे थर स्पष्टपणे वेगवेगळे दिसत असतील, तर अशा वेगवेगळया थरांचे मातीचे नमुने घेणे अधिक चांगले, असे मातीचे नमुने घेतल्याने मातीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण किती आहे हे आजमाविणे शक्य होईल.

फळबाग जुनी, अधिक वर्षाची असेल, फळझाडांची वाढ चांगली झाली असेल तर अशा क्षेत्रातून मातीचे नमुने घेतांना फळझाडांना अन्नपुरवठा होणाऱ्या क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. साधारणपणे झाडाच्या बुंध्यापासून 2 ते 4 फूट लांब व दुपारी 12 वाजता झाडाची सावली ज्या भागात पडत असेल, त्या भागाच्या बाहेरचा दीड ते दोन फूट एवढा भाग सोडून मधल्या भागातून झाडांना जास्तीत जास्त अन्न पुरवठा होतो असे समजण्यात येते, अशा भागातून 12 इंच (किंवा 30 से.मी.) खोलीचे मातीचे नमुने घ्यावेत.
प्रातिनिधीक नमुन्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार विभाग करुन प्रत्येक भागातील साधारण: झाडाच्या भोवतालचे वरीलप्रमाणे नमुने घेऊन ते एकत्र करुन सर्वसाधारणपणे एक किलोग्रॅम मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवतीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावा.

फळबागांचे पाणी व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे असल्यास अशा फळबागेतील जमिनीत झाडाखालील ओल्या मातीचा जो कंद तयार होतो, त्या कंदाच्या (Wetting front) कडेवरील दोन्ही बाजूंकडील माती प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावी. ओली माती प्रथम सावलीत सुकवून नंतर प्रयोगशाळेत पाठवावी. त्यासोबत शेतकऱ्याने स्वत:चे नांव, गाव, सर्व्हे नंबर, जमिनीची खोली, फळबागेचे वय इत्यादी माहितीसह प्रयोगशाळेत पाठवून द्यावे. विशेष समस्या असल्यास तसा उल्लेख माहितीसोबत करावा.

मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी

मातीचा नमुना घेण्यासाठी वापरात येणारी अवजारे उदा :-फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इ. स्वच्छ असावीत. मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणी पूर्वी घ्यावा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ:करण करुन परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.
उभ्या पिकांतील मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमुना घ्यावा परंतु पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आत संबंधित जमिनीतून माती नमूना घेवू नये.
निरनिराळ्या जमिनीतील नमुना गोळा करताना वेगवेगळया मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करु नये.
शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुना घेवू नयेत.
शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत.
सर्व साधारणपणे नमुना काढणे व प्रयोगशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता असते.
फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळया थरातून घ्यावा उदा.खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील 30 से.मी. पर्यंत मुरुम नसल्यास 30 ते 60 से.मी. थरातील दुसरा थर व खोल जमिनीत 60 ते 90 से.मी. पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोग शाळेत पाठवावे.
जमिन क्षारयुक्त व क्षारयुक्त-चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन से.मी. मधील क्षार बाजूला करुन नंतरच नमुना घ्यावा.
सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औजाराने मातीचा नमुना घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची अवजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्मअन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.

मातीच्या नमुना कोठे व कसा पाठवाल?

मातीचा नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती, मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी, मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.
शेतकऱ्यांचे पूर्ण नांव
पूर्ण पत्ता
गट नंबर / सर्व्हे नं.
बागायत / कोरडवाहू
ओलीताचे साधन
जमिनीचा निचरा
जमिनीचा प्रकार (हलकी / मध्यम / भारी )
जमिनीचा उतार (जास्त / मध्यम / सपाट )
जमिनीचा खोली (उथळ / मध्यम खोल / खोल )
जमिनीचा रंग (भुरकट / काळी )
नमुना घेतल्याची तारीख
मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
पुढील हंगामात घ्यावयाची पिके, त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.

माती परिक्षण प्रयोगशाळेत मृद नमुना तपासल्यानंतर अहवालाप्रमाणे मातीचा सामू, क्षारता, मुक्त चुन्याचे प्रमाण, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सूक्ष्मअन्नद्रव्ये (लोह, मंगल, जस्त, तांबे आणि बोरॉन) इत्यादीचे प्रमाण नमुद केलेले असते.

या माती परिक्षण अहवालावरुन सामू सर्वसाधारणप्रमाणे 6.5 ते 7.5 पर्यंत असल्यास वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सामू 6.5 पेक्षा कमी असल्यास आम्ल जमिनी म्हणतात. विशेषत: कोकणातील जमिनीचा सामू जास्त आम्लयुक्त असतो. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा शेणखतातून वापर करावा.

याऊलट पश्चिम महाराष्ट्र, मराठावाडा, विदर्भातील जमिनीचा सामू किंचीत विम्ल ते अतिशय विम्ल (सामू 7.5 ते 9.0) प्रकारच्या आहेत. सामू 8.5 पेक्षा जास्त असलेल्या अतिविम्ल चोपण जमिनीमध्ये भुसूधारक म्हणून जिप्समचा शेणखतातून वापर करावा. मात्र चुनखडीयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करतांना जिप्सम ऐवजी गंधकांचा शेणखतातून वापर करावा.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९

English Summary: How to take soil sample in orchard area indian agriculture news Published on: 16 May 2024, 12:57 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters