जर आपल्याकडे भारतीय शेतीचा विचार केला तर आता शेतकरी परंपरागत पिके सोडून विविध प्रकारचे नवनवीन पिके व फळबागांची लागवड करीत आहेत.
त्यामध्ये विविध तंत्रज्ञान आणि लागवडीची कौशल्य वापरून वेगवेगळ्या हवामान मानवणारे पिकांना देखील कौशल्य व तंत्रज्ञान वापरून यशस्वी केले जात आहे. आता आपल्याकडे स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट इतकेच काय तर थंड प्रदेशात येणाऱ्या सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी करून दाखवली. अशाच एका विदेशी फळाविषयी या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत.
गॅक फळ(Gac Fruit farming)
हे फळ खरबूज फळपीक कुटुंबातील असून या फळाच्या बाहेरील थरावर लहान लहान मणके असतात. जेव्हा या फळाचा रंग चमकदार लाल रंगात बदलतो तेव्हा हे फळ काढणीला आले असे समजावे. हे फळ प्रमुख्याने वियतनाम, मलेशिया आणि थायलंड यासारख्या देशांमध्ये पिकवले जाते. परंतु आपल्याकडे केरळमधील अनेक शेतकऱ्यांनी या विदेशी फळाची यशस्वी लागवड केली आहे. या फळाला व्हिएतनाम या देशांमध्ये स्वर्गीय फळ म्हणून ओळखले जाते.
केरळ राज्यात प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांनी त्या फळाची लागवड केली असून यशस्वी देखील केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या या फळांमध्ये ओमेगा 6 आणि 3 फॅटी ऍसिड व त्यासोबतच बीटा कॅरोटीनचा देखील चांगला स्त्रोत आहे. या फळाचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे फळ पिकल्यानंतर चार रंग बदलते.
चीन आणि व्हिएतनाम मध्ये याचा वापर पारंपारिक औषधांमध्ये देखील केला जातो. केरळ राज्यामध्ये कासारगोड, कोझिकोड इत्यादी भागातील शेतकरी गॅक फळाची लागवड करीत आहेत. या फळाची लागवड करताना नर आणि मादी दोन्ही रोपे लावणे आवश्यक आहे कारण हे फळ डायओशीयस असल्याने परागीभवन होण्यासाठी हे महत्वाचे आहे.
या फळांमध्ये नैसर्गिक किटकांच्या परागीकरण ऐवजी हाताने परागीकरणाची क्रिया केली तर चांगलं उत्पादन मिळते असे दिसून आले आहे. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार या फळाला प्रतिकिलो एक हजार रुपये इतका बाजार भाव मिळतो. तसेच बाजारपेठेत या फळाला चांगली मागणी असल्याने बरेच शेतकरी या फळ लागवडीकडे वळत आहेत.(स्रोत-Etv भारतमराठी)
Share your comments