फळांतील रस शोषणारा पतंग आणि प्रतिबंधात्मक उपाय

Sunday, 10 May 2020 08:55 AM


महाराष्ट्रात दरवर्षी अनेकविध फळपिकांपैकी मोसंबी, संत्र व डाळिंब या फळांवर फळांतील रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव झाल्याने फार मोठ्या प्रमाणात विशेषतः मोसंबी, संत्रा फळांचे नुकसान झाले आहे. हा निशाचर पतंग असून या पतंगाच्या अनेकविध प्रजाती असून त्यात फळांना उपद्रवकारक काही पतंग की ज्यांना निसर्गतःच विशिष्ट प्रकारच्या तोंडाची रचना असल्याने हे पतंग रात्रीचे वेळी पुर्ण वाढ झालेली किंवा पक्व/पिकलेल्या फळांना आपल्या सोंडेने सुक्ष्म छिद्र पाडून आतील रस शोषतात, म्हणूनच या पतंगांना फळावरील रस शोषणारा पतंग असे म्हणतात. शेतकरी बांधव या किडीला 'पाकोळी' या नावाने संबोधतात.

भारतात या पतंगाचा उपद्रव लेफ्रॉय (१९०१) या शास्त्रज्ञाच्या लिंबूवर्गीय फळझाडांवर प्रथम निदर्शनास आला. बिंद्रा (१९६९) या शास्त्रज्ञाच्या मते जगात या पतंगाच्या २५ वेगवेगळ्या जाती आहेत, तर बेन्झीगर (१९८२) यांनी या किडीच्या ८६ विविध प्रजातींची नोंद केलेली आहे. मात्र यापैकी महत्वाच्या तीन जाती ऑथेरेईस फुल्लोनिका, ऑथेरेईस मॅटर्ना आणि ऑथेरेईस अॅन्सिला या प्रजातींना आता युडोसिमा फुल्लोनिका, युडोसिमा मॅटर्ना आणि युडोसिमा अॅन्सिला या नावाने अनुक्रमे ओळखले जाते. भारतात त्यांचा प्रसार तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात झाल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त आकीया जनाटा ही प्रजाती सुद्धा काही प्रमाणात आढळते.

या किडीचा पतंग आकर्षक असून त्यांच्या मोठ्या आकारावरून आणि रंगावरून ते सहजपणे ओळखू येतात. पूर्ण वाढ झालेल्या पतांगाना पंखांच्या मजबूत जोड्या असल्याने ते बरेच दूरवर उडून जाऊ शकतात. पतंगाच्या पंखांची मागील जोडी पिवळ्या रंगांची असते आणि वेगवेगळ्या प्रजातीपरत्वे त्यावर विविध आकाराचे ठिपके असतात व त्या आधारे त्यांच्या प्रजातीची ओळख आपणास करता येते.

नुकसानीचा प्रकार:

या किडीचे पतंग रात्रीच्या वेळी फळांवर हल्ला करतात. म्हणून सर्वसाधारणपणे रात्री ८ ते ११ च्या आणि पहाटे ५ ते ६ दरम्यान या पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पतंग बागेत आल्यानंतर पक्व फळ शोधून त्यावर बसून ते फळांना आपल्या सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषून घेवून त्यावर उपजीविका करतात. कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरुवात होते. त्या जागी इतर परोपजीवी बुरशींचा प्रादुर्भाव होतो. अशी प्रादुर्भावीत फळे गळून पडतात. फळांची प्रत कमी झाल्याने अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे दिसून येते. १९९१ साली डॉ. मोटे यांनी महाराष्ट्र राज्यात या किडीमुळे जवळपास ५७% डाळिंब फळांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणले असून काही फळांवर या पतंगाने ९ छिद्रे केल्याचे नमूद केले.

डाळींबाव्यतिरिक्त हे रस शोषणारे पतंग केळी, पेरू, आंबा, पपई, टोमॅटो, प्लूम, मोसंबी, चिकू, आवळा, रामफळ, संत्री, सफरचंद, सिताफळ, अननस, काजू, द्राक्ष, टरबूज, अंजीर इ. फळांवरही प्रादुर्भाव करतात. या पतंगांचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. कारण पावसाळी हवामानात जून ते ऑगस्ट कालावधीत जीवनक्रम पूर्ण होवून या किडीचे पतंग बाहेर पडतात. पावसाळ्यात किडीच्या वाढीसाठी पूरक असणाऱ्या जंगली वनस्पती उदा. गुळवेल, चांदवेल विपुल प्रमाणात वाढतात त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.

अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात या पतंगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. जर हे पतंग पावसाळ्यात विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबर पासून निदर्शनास येतात तर मग त्यापूर्वी ते असतात तरी कुठे? आणि अचानक तयार कसे होतात? हे प्रश्न साहजिकच मनात आले असणार, म्हणूनच या पतंगांच्या जीवनक्रमांबाबत थोडे आपण जाणून घेवू या.

जीवनक्रम

या किडीचा जीवनक्र मोठा मजेशीर आहे, कारण ज्या फळांना हे पतंग उपद्रव करतात त्या फळझाडांवर त्यांच्या पतंगापूर्वीच्या कोणत्याही अवस्था (उदा. अंडी, अळी आणि कोष) दिसून येत नाहीत. अंडी घालण्यापासून ते पतंगाची पूर्ण वाढ होईपर्यंत या किडीचा जीवनक्रम परोपजीवी जंगली वनस्पतींवर होतो. त्यात विविध गवते आणि वेलींचा समावेश होतो. उदा. गुळवेल, वासनवेल, पांगारा आणि मधुमालती इ. वेलवर्गीय वनस्पती विशेष करून नदी नाल्यांच्या किनाऱ्याला किंवा जंगलांमध्ये आढळतात. मादी पतंग वरील वनस्पतींच्या पानांवर चमकणारी पांढऱ्या रंगांची अंडी घालतात.

एक मादी जवळपास ८०० ते ९०० अंडी घालते. अंडी गोलाकार व खालील बाजूस सपाट असतात. उबविण्याच्या वेळी अंड्यांचा रंग नारिंगी होतो. ही अंडी २ ते ३ दिवसात उबतात व त्यातून लहान पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. सुरवातीला अळ्या वरील नमूद केलेल्या वेलींची पाने खरवडून खातात आणि वाढीच्या अवस्थेत नंतर त्या पूर्ण पाने कुरतुडून खातात. त्यांचे पाने खाण्याचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. अळी अवस्था पूर्ण होईपर्यंत ती पाचवेळा कात टाकते आणि अळीची पूर्ण वाढ होण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो.

पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग तपकिरी होतो. अळी स्वतःभोवती कोष विणून आत कोषावस्थेत जाते. कोषावस्था या वेलींवरच तयार होते आणि १० ते १५ दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतो. अशाप्रकारे पतंग अवस्था पूर्ण तयार होईपर्यंत या किडीचा जीवनक्रम इतर वनस्पतींवर होत असल्याने त्यांचे नियंत्रण करणेही तितकेच कठीण जाते. कारण अंडी, अळी आणि कोष या अवस्था डाळिंब, मोसंबी, संत्री इ. फळपिकांवर होत नसल्याने पतंग कोषातून बाहेर पडल्यानंतर खाद्य शोधण्यास फळबागांकडे धाव घेतात. म्हणूनच अंडी, अळी आणि कोषाला पूरक असणाऱ्या वनस्पतीचा बागेच्या किंवा नदी नाल्यांच्या किनारी वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

व्यवस्थापनासाठी उपाययोजना 

  • बागेच्या सभोवती बांधावरील किंवा नदी नाल्यांच्या किनाऱ्यावरील पावसाळ्यात तयार होणाऱ्या या किडीला पूरक असणाऱ्या वनस्पतींचा नायनाट करावा.
  • फळांच्या हंगामाचे नियोजन करावे.
  • बागेमध्ये पतंगाना आकर्षित करून पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
  • पतंगाना बागेपासून प्रवृत्त करण्यासाठी सिट्रोनेला ऑईलचा वापर करावा.
  • पतंगाना मारण्यासाठी १ किलो गुळ+६० ग्रॅम व्हिनेगर+५० मिली मॅलाथिऑन+१० लिटर पाणी या आमिषाचा वापर करावा.
  • बागेतील खाली पडलेल्या फळांचा नायनाट करावा.
  • बटर पेपर, वृत्तपत्र किंवा पॉलिमर पिशव्या अशा सामग्रीचे झाडावरील फळांना आवरण घालावे.
  • बागेत संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी तण आणि पिकाचा कचरा जाळुन धुराचे लोट तयार करावेत जेणेकरून तयार झालेल्या फळांचा गंध शोधण्यात पतंग अपयशी ठरतात आणि बागेत प्रवेश करत नाहीत.
  • पतंगांचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात पतंग गोळा करून मारणे हे परिणामकारक ठरते. त्याकरिता रात्रीच्या ७ ते ११ आणि पहाटे ५ ते ६ या वेळी बागेत टेंभा (मशाल) किंवा बॅटरीच्या सहाय्याने फळांवर बसलेल्या पतंगाना पकडून गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नाश करावा.

लेखक:
डॉ. सुमेधा शेजुळ पाटील आणि डॉ. संतोष कुलकर्णी
कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
९७६४४५०९४१

Fruit Sucking moth फळांतील रस शोषणारा पतंग पाकोळी pakoli Pomegranate डाळिंब सिट्रोनेला ऑईल Citronella Oil
English Summary: Fruit sucking moth and its preventive measures

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.