फळबाग लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर असून शेतीमध्ये येणारी तरुण पिढी आता फळबाग लागवडीला प्राधान्य देताना दिसत आहे. फळबाग लागवडीतून आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु फळबागांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न हवे असेल तर सर्व बाजूंनी व्यवस्थापन व्यवस्थित असणे गरजेचे आहे.
यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप मोठे महत्त्व असून फळबागावर होणारा किडींचा प्रादुर्भाव विविध उपाययोजना करून नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून आपण फळबागांमध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी फळमाशी या कीटकाच्या एकात्मिक व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
फळमाशी फळबागांचा कर्दनकाळ
या माशीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते. त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात. या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात. या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात असे फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.
फळमाशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
1- जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू देणे गरजेचे असून त्यामुळे या अळीचे कोश उष्णतेत नष्ट होतात.
2-मशागत करताना जमिनीमध्ये शिफारस केल्यानुसार कीडनाशक मीसळणे गरजेचे आहे.
3- शक्यतो फळमाशीला प्रतिकारक असणाऱ्या जातींची लागवड करणे गरजेचे आहे.
4- फळमाशी ग्रस्त बागेत पडलेली फळे गोळा करून ती नष्ट करून टाकावी किंवा लांब नेऊन त्यांचा नायनाट करावा.
5- बागेमध्ये मिथिल युजेनॉलचे सापळे एका हेक्टरसाठी पाच किंवा दहा लावावे व त्यामधील कीटकनाशक 15 ते 20 दिवसांनी बदलणे गरजेचे आहे.
6- फळधारणा जेव्हा होईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टरीन (1000 पीपीएम) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नुकसानीची पूर्वसंकेत पातळी पाहून शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.
Share your comments