1. फलोत्पादन

ड्रॅगन फ्रुट लागवडीचे तंत्र

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Dragon Fruit

Dragon Fruit

ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती असून या फळाचे शास्त्रीय नाव (Hylocere usundatus) असे आहे. हे फळ कॅक्टासी या कुळातील आहे. हे एक विदेशी फळपिक असून याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ हे कटीबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका हे आहे. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया आदी देशांत या फळ पिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.

आता ते भारतातही येऊन पोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यातील काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करतात. ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. भारतामध्ये या फळाखालील क्षेत्रफळ हे 100 एकारापेक्षा हि कमी आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये हे फळ आपण लंडन, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशामधून आयात करतो. या फळाला भारतामध्ये लागवडीस खूप वाव आहे. हायलोसेरेयस (Hylocereus) ही त्याची महत्वाची प्रजाती आहे. ड्रॅगनफ्रूटला आपल्या देशांत पिताहाया किंवा पिताया या नावानेही संबोधले जाते.  हे पिक जगभरात उष्णप्रदेशीय देशांमध्ये घेतले जाते. याची वेल छत्रीसारखी दिसते. याला वाढीसाठी द्राक्षांप्रमाणे आधाराची गरज असते. साधारणतः या वेलीची आयुष्यमर्यादा 15 ते 20 वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्या यांची निवड महत्त्वाची आहे. मूलतः पोषक जमिन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्यापासून योग्य उत्पादन घेता येते.

हेही वाचा :‘या’ कारणांमुळे आंबा उत्पादन कमी होण्याची शक्यता

उपयोग आणि गुणधर्म

 • “ड्रॅगन फळ’’ हे मधुमेह, संधिवात, कर्करोग, दमा इत्यादी आजार नियंत्रित करते.
 • शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
 • अन्नपचन शक्ती वाढवते.
 • यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.
 • तसेच या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते.
 • सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याला तुम्ही वापरू शकता.
 • डेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगन हे फळ खाल्ले जाते.
 • हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यात मदत होते.

हवामान

आपल्या येथील हवामान हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय असल्यामुळे या फळ पिकासाठी योग्य आहे. साधारणता 20-30 सें. तापमान, जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आणि 100-150 सें. मी. पाऊस पिकाच्या वाढीस अनुकूल आहे. धुके आणि जास्त पावसाचा प्रदेश यास अनुकूल नाही. दिवसाचे सर्वात कमी आणि अधिक तापमान हे पिकाच्या वाढीस हानिकारक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास फुल आणि फळ यांची गळ होते.

जमिन

तसे पाहता हे पिक विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते, पण योग्य पाण्याचा निचरा होणारी जमिन अधिक योग्य असते. वालुकामय चिकणमाती सोबत अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमिन या पिकास अधिक पूरक आहे. साधारणता जमिनीचा सामू 5.5-7.5 असला पाहिजे.

जाती

याच्या जातींमध्ये खूप विविधता आढळते, त्यामध्ये याचे वर्गीकरण तीन प्रकारांत केले आहे.

 • वरून लाल रंग आतील गर पांढरा.
 • वरून लाल रंग आतील गर लाल.
 • वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा.

यामध्ये वरून लाल रंग आतील गर पांढरा हि जात भारतामध्ये प्रसिद्ध आहे.

अभिवृद्धी

याची अभिवृद्धी हि कटिंग्स आणि बियापासून केली जाते. बियापासून अभिवृद्धी केल्यास झाडा-झाडामध्ये वेगवेगळे पणा दिसून येतो, त्यामुळे हि पद्धत प्रचलित नाही. म्हणून याच्या अभिवृद्धीसाठी व्यवसायिक दृष्ट्या कटिंग्स हि पद्धत वापरली जाते.

लागवड पद्धती

जमिनीची 2-3 वेळा खोल नांगरणी अशी करावी कि, जमीन भूसभूसीत होईल. दोन झाडांतील व ओळींतील अंतर 3 बाय 3 मीटर असावे. 40-45 सेंटीमीटर उंचीचे आणि 3 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करावे. साधारणता प्रती हेक्टरी 1,200-1,300 सिमेंटचे पोल उभारावेत. पोल हा 12 सेंटीमीटर रुंद आणि 2 मीटर उंच असावेत. पोल जमिनीत गाडते वेळेस साधारणता 1.4-1.5 मीटर उंची हि जमिनीचा वर असली पाहिजे.

चांगल्या उत्पन्नासाठी 2-3 वर्ष जुने, आरोग्यदायी आणि 45-50 सेंटीमीटर उंची असलेले रोपे निवडावीत. पावसाळ्याचा दिवसात म्हणजे जून-जुलै महिन्यात लागवड करावी. लागवड हि सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस करावी. प्रती पोल 4 रोपे प्रमाणे लागवड करावी.

हेही वाचा :‘शेतकऱ्यांनो फळबागेची करा लागवड सरकार देतय अनेक सवलती


पाण्याचे नियोजन

ह्या फळपिकाला बाकी फळ पिकाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. काही महिन्यापर्यंत हे पाण्याचा ताण सहन करू शकते. पण फळ धारणेचा अवस्थेत एका आठवड्यात 2 वेळेस पाणी द्यावे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर दररोज 1-2 लिटर पाणी प्रती झाड द्यावे.

खत व्यवस्थापण

अधिक उत्पन्नासाठी या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात. सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. पण नंतरच्या काळात स्पुरद आणि पालाशची मात्रा अधिक प्रमाणात द्यावे लागते. 

छाटणी करणे

लागवडीपासून 2 वर्षानंतर हलक्या प्रमाणात छाटणी करावी. रोगीट व वाकड्या-तिकड्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करावी. 3 वर्षानंतर झाडाला छत्री सारखा आकार द्यावा. छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावावे.

रोग व किड व्यवस्थापण

या पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात पिठ्या ढेकूण. काही प्रमाणत पिड्या देकून हि किड आढळते त्यासाठी नुवान 1.5 मी.ली. प्रती लिटर प्रमाणे फवारणी करावी. याला काही प्रमाणात पक्षापासून नुकसान होऊ शकते त्याचे यापासून रक्षण करावे.

काढणी तंत्र

साधारणता लागवड झाल्यानंतर 18-24 महिन्यानंतर फळ येण्यास सुरुवात होते. फुल आल्यानंतर 30-50 दिवसात फळ परिपक्व होते. फळाचा रंग हा अपरिपक्व अवस्थेत हिरवा असतो नंतर तो परिपक्व अवस्थेत बदलत जावून लाल किंवा गुलाबी होतो. फळ लागण्याचा कालावधी हा 3-4 महिने चालतो. या कालावधीमध्ये फळाची काढणी 3-4 वेळेस केली जाते.

उत्पन्न

एका फळाचे वजन साधारणता 300-800 ग्रॅम असते आणि एक झाडाला/वर्ष साधारणता 40-100 फळे येतात. एका वर्षाला एका झाडापासून (एक पोल/4 झाड) 15 ते 25 किलो इतके उत्पन्न मिळते.


लेखक:

नंदकिशोर माधवराव कानडे
(आचार्य पदवी विद्यार्थी, फळ विभाग, आई.आई.एच.आर. बेंगलोर) 9881787237
विलास घुले
(आचार्य पदवी विद्यार्थी, उद्यानविद्या विभाग, म.फु.कृ.वि. राहुरी)
प्रशांत निमबोळकर
(सहाय्यक प्राध्यापक, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, वर्धा)

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters