द्राक्ष हे भारत देशातील महत्वाचे फळपिक समजले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. महाराष्ट्रातील द्राक्षे त्याच्या विशिष्ट चविमुळे जगभरात लोकप्रिय आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जातात. द्राक्षाचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी, बेदाणे तयार करण्यासाठी व मद्य तयार करण्यासाठी करतात. इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या द्राक्ष पिक फायदेशीर समजले जाते. त्यामुळे द्राक्ष पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
द्राक्ष पिक इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असले तरी ते जास्त खर्चीक व नाजूक फळपिक आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष पिकाचे दर्जेदार उत्पादन हे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनले आहे. परंतु योग्य नियोजन, नवीन तंत्र, इ. मुळे द्राक्ष पिकाचे निर्यातक्षम उत्पादन शक्य आहे.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष घड हा योग्य आकाराचे मणी, एकसारखा, आकर्षक रंग, गोड, कीड-रोग विरहीत ,किडनाशक अवशेष मुक्त असलेला घड आवश्यक असतो .तसेच अलीकडच्या काळातील वातावरणातील बदलांमुळे सनबर्निंग, पिंकबेरी इ. समस्या वाढलेल्या आहेत. ह्या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळवण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे.
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावण्या अगोदर करावयाची पूर्वतयारी
- द्राक्ष घडांना पेपर लावण्याची योग्य अवस्था
साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावावे. कारण याअगोदर बागेत किडरोग नियंत्रन उत्तम झालेले असल्यास नंतरच्या काळात किड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. - घड व मणी विरळणी
निर्यातीसाठी आवश्यक असलेला मण्यांचा आकार, घडाची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी इ. मिळण्यासाठी वेलीवरती घडांची संख्या, प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी पेपर लावन्याअगोदर वेलीचे वय, लागवडीचे अंतर, जात इ. गोष्टींचा विचार करून घडांची संख्या निर्धारित करावी. एकसारख्या वाढीचे, आकर्षक, कीड रोग विरहीत घड ठेवावे. किड-रोगांचा प्रादुर्भाव असलेले, पानांच्या आड, गर्दीत असलेले, एकसारखा आकार नसलेले जास्तीचे घड काढून टाकावे. तसेच खराब, कमी आकाराचे, गर्दी करणारे मणी काढून जातीपरत्वे प्रत्येक घडात मणी संख्या निर्धारित करावी. यामुळे प्रत्येक वेलीवर योग्य घड व मणी संख्या राहून निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होईल. - काडी व घडांची बांधणी
पेपर लावण्याअगोदर काड्यांची व घडांची बांधणी करून घ्यावी जेणेकरून पेपर लावणे सोयीचे होईल. - कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी
एकदा द्राक्ष बागेत पेपर लावल्यानंतर आपण फवारणीद्वारे वापर केलेल्या किटकनाशकांचा घडांशी संपर्क येत नाही. त्यामुळे पेपर लावन्याअगोदर कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी अत्यंत महत्वाची आहे. विशेषकरून मिलीबग (पिठ्या ढेकुण) चे नियंत्रण महत्वाचे आहे. यासाठी रासायनिक किटकनाशकांचा त्यांचा काढणीपूर्व कालावधीचा विचार करून फवारणी घ्यावी तसेच व्हर्टीसिलीयम लेकेनी सारख्या जैविक कीडनाशकांचा वापर शिफारशीनुसार करावा. - बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी
द्राक्ष पिक विविध बुरशीजन्य रोग जसे केवडा, भुरी, करपा इ. बळी पडते. यासाठी पेपर लावन्याअगोदर बुरशीनाशकांच्या काढणीपूर्व कालावधीचा विचार करून फवारणी घ्यावी. तसेच ट्रायकोडर्मा व्हीरीडी, बॅसीलस सबटीलीस यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर महत्वाचा ठरतो. यामुळे रोगनियंत्रण होऊन रासायनिक औषधांचे अवशेष कमी होण्यास मदत होईल.
अशाप्रकारे सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर कुशल मजुरांद्वारे घडाना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून योग्य अवस्थेत पेपर लावण्याचे काम पूर्ण करावे.
द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे फायदे
- द्राक्ष घडांचे ऊन व त्यामुळे होणाऱ्या सनबर्निंग सारख्या समस्यांपासून संरक्षण होते.
- घडांचे थंडी पासून संरक्षण होऊन मण्यांचा योग्य आकार मिळण्यास मदत होते.
- पिंक बेरी या समस्येपासून मुक्तता मिळते, किंबहुना हि समस्या टाळण्यासाठी हा एकमेव उपाय आहे.
- घडांचे पक्षी, प्राणी इ. यांपासून होणारे नुकसान टाळता येते.
- द्राक्ष काढणी वेळी निर्यातीसाठी आवश्यक मण्यांचा आकार, आकर्षक एकसारखा रंग मिळून निर्यातक्षम मालाचे उत्पादन वाढून अधिक आर्थिक फायदा मिळतो.
पेपर लावन्यागोदर व नंतर करावयाची कार्यवाही
- घड व मनी विरळणी.
- किटकनाशक व बुरशीनाशक यांचा तज्ञांच्या सल्ल्याने वापर.
- कुशल मजुरांचा उपयोग करून घडांना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून पेपर लावावे.
- पेपर लावल्यानंतर ठराविक काळाने प्रातिनिधिक स्वरुपात घडांची मिलीबग, भुरी इत्यादीसाठी तपासणी करावी.
अशाप्रकारे काळजी घेऊन पेपर लावल्यास निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढून जास्त आर्थिक फायदा मिळू शकतो.
लेखक:
प्रा. योगेश लक्ष्मण भगुरे व प्रा. दीपक पाटील
सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग
कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक
९९२२४१४८७३
Share your comments