वृक्ष व फळे कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत या वृक्षाला कर्ड फ्रूट किंवा मंकी फ्रूट असे म्हणतात. याचा प्रसार मुख्यत्वे आशियामध्ये पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार, जावा इ. प्रदेशांत आहे. ह्या काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत आहे. कवठाचे झाड ६-९ मी. उंच वाढते. खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते. पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एक आड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. फुले लहान, फिकट लाल व आखूड देठांची असून फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर येतात
फुलांचा हंगाम फेब्रुवारी-एप्रिल असून फळे २-३ महिन्यांनंतर तयार होतात. घनकवची (कठिण सालीचे) मृदुफळ ५-७ सेंमी. व्यासाचे मोठे, गोल, कठिण व करड्या रंगाचे असते. मगजामध्ये भरपूर बिया असतात. बिया लांबट व दबलेल्या असतात.
कवठ हे फळ फार कमी जणांना माहित असेल. कठीण आवरण असलेलं हे फळ चवीला थोडसं आंबड, गोड असं असतं. याला वुड अॅपल असंदेखील म्हटलं जातं. अनेक ठिकाणी हे फळ उपवासाच्या दिवशीदेखील खाल्लं जातं. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात.
बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात.
फळातील मगज आंबटगोड व खाद्य असतो. मगज स्तंभक, उत्तेजक व दीपक असून पोटाच्या तक्रारींवर गुणकारी आहे. याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबत करतात. विषारी कीटकदंशावर बाहेरून लेप लावतात. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो.
झाडातून पाझरणारा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. त्यापासून चित्रकाराचे जलरंग व इतर रंग-रोगणे तयार करता येतात. बाभळीच्या डिंकाला पर्याय म्हणून त्याचा उपयोग होतो.
लाकूड करडेपांढरे किंवा पिवळसर, कठिण, मजबूत आणि टिकाऊ आहे. त्याचा उपयोग घरबांधणी तसेच तेलाचे घाणे, चाकाचे आरे व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी होतो. फळाच्या कठिण कवचापासून शोभिवंत वस्तू बनवितात.
फायदे
मळमळ, उलटी होत असल्यास कवठ खावे. त्यामुळे त्रास कमी होतो.
जुलाब होत असल्यास कवठ खावे.
अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो.
कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात.कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.
लेखक: राजा ढेपे
Share your comments