आरोग्यदायी मोहाची फुले

Wednesday, 16 October 2019 01:58 PM


वनोत्पादनामध्ये मोह अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून, तो औषधी आणि व्यावसायिक उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. त्याला हिंदी व इंग्रजीमध्ये महुआ या नावाने ओळखले जाते. मोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत.

मोहाच्या फुलांचा पारंपरिक उपयोग:

 • ताज्या फुलांमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अर्बीनोज आणि काही प्रमाणात माल्टोज, र्‍हामनोज हे घटक असतात. त्यांची चव गोड असते. फुलांमध्ये ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे.
 • त्यात कॅरेटिन असून ‘अ’ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. फुलांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस अशी खनिजे, काही प्रमाणात प्रथिने आणि मेदही असतात.
 • अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलामध्ये जिवाणुरोधक, कृमिघ्न, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे पुढे आले आहे.
 • मोहाची फुले खाण्यायोग्य असून, त्यात मोठ्या प्रमाणात शर्करा, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळतात.
 • गोडीमुळे फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारा पदार्थ म्हणूनही होतो.
 • पारंपरिक पदार्थ उदा. हलवा, खीर, बर्फी यांना गोडी आणण्यासाठी फुले वापरली जातात. भात, नाचणी, ज्वारी किंवा रताळ्यासोबत फुलांचा वापर करून गोड भाकरी किंवा केक बनवले जातात.
 • वाळलेली फुले ही चिंच किंवा साल बियांसह उकळून धान्याला पर्याय म्हणून गरीब आदिवासी लोक खातात.
 • जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने फुलांचा वापर पशुखाद्यामध्ये केला जातो, त्यामुळे दुधामध्ये वाढ मिळते.
 • मद्य बनवल्यानंतर शिल्लक राहिलेले फुलांचे अवशेष हे पशुखाद्य म्हणून वापरतात.
 • भिजवलेल्या तांदळामध्ये मोहाची फुले मिसळून ती दळून घेतात. त्याचे पीठ साल पानामध्ये गुंडाळून आगीमध्ये टाकली जातात. अशा प्रकारे वेगळाच केक बनवला जातो.

मोहाच्या फुलांचा औषधी उपयोग:

आयुर्वेदामध्ये मोहाच्या फुलांचा वापर शीतकरणासाठी, वातनाशक, दुग्धवर्धक, स्तंभक म्हणून केला जातो.

 • फुलांचा रस: यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टॉनिक म्हणून उपयुक्त. दाह होत असलेल्या त्वचेवर चोळल्यास गुणकारी. डोळ्यांच्या रोगामध्येही उपयुक्त. रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर. पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी याचे नस्य केले जाते.
 • फुलांची भुकटी: फुलांची भुकटी हगवण, बृहदांत्र शोथावर स्तंभक म्हणून वापरली जाते.
 • कच्ची फुले: स्तनदा मातांच्या दुधामध्ये वृद्धीसाठी उपयुक्त.
 • भाजलेली फुले: कफ, खोकला आणि दम्यासाठी वापरली जातात. वंध्यत्व आणि दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो. तुपामध्ये तळून फुलांचा वापर मूळव्याधीच्या उपचारामध्ये केला जातो.
 • मोहाचे लोणी: मोहाच्या बियांपासून मऊसूत घट्ट लोणी तयार केले जाते, त्याला किंचित मेदाचा वास येतो. वनस्पतीजन्य लोण्याप्रमाणे याचा विविध पदार्थांमध्ये वापर करता येतो. हे लोणी त्वचेच्या संपर्कात येताच त्वरित वितळते. हे लोणी हिवाळ्यामध्ये किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी त्वचेवर लावले जाते. या लोण्यामध्ये क्रूड लिपीड घटकांचे प्रमाण सर्वाधिक (एकूण लिपीडपैकी 94.5 टक्के) असते. त्यानंतर त्यात ग्लायकोलिपीड आणि फॉस्फोलिपीड हे घटक असतात. या लोण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी, चॉकलेट निर्मितीमध्ये केला जातो.
 • मोहाचे तेल व पेंड: मोहाच्या बियांमध्ये 50 ते 61 टक्के तेल, 16.9 टक्के प्रथिने, 3.2 टक्के तंतुमय पदार्थ, 22 टक्के कर्बोदके, 3.4 टक्के राख, 2.5 टक्के सॅपोनिन्स आणि 0.5 टक्के टॅनिम हे घटक असतात. तेल काढल्यानंतर शिल्लक राहणार्‍या पेंडीमध्ये 30 टक्के प्रथिने, 1 टक्का तेल, 8.6 टक्के तंतूमय पदार्थ, 42.8 टक्के कर्बोदके, 6 टक्के राख आणि 9.8 टक्के सॅपोनिन्स आणि 1 टक्का टॅनिन असे घटक असतात.

मोहाच्या बियांतील मेद काढून घेतल्यास त्यातील प्रथिनांचे, सॅपोनिन्स आणि टॅनिनची पातळी वाढते. वाढलेली सॅपोनिनची पातळी आयसोप्रोपॅनोलच्या प्रक्रियेने कमी करता येते. या प्रक्रियेनंतर पेंडीची पचनीयता 81 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळले आहे. अशा विषारीपणा कमी केलेल्या मोह बियांच्या पिठाचा वापर आहार आणि पशुखाद्यामध्ये प्रथिनांचा स्रोत ठरू शकतो. तेल काढल्यानंतर शिल्लक पेंडीमध्ये तेल शोषण्याचे इमल्सिफिकेशनचे गुणधर्म दिसून येतात.

एरंड आणि निम तेलाच्या तुलनेमध्ये मोहाच्या तेलामध्ये ओलेईट आम्लाचे प्रमाण अधिक (45 टक्के) असते. पामतेल, साल मेद किंवा कोकमच्या तुलनेमध्येही ओलेईक आम्लाचे प्रमाण अधिक असल्याने अन्य कोकोआ पदार्थांना पर्याय म्हणून मोहाच्या तेलाचा वापर होतो. मोहाचे तेल हे अखाद्य तेलामध्ये महत्त्वाचे आहे. मोहाच्या पेंडीमध्ये कीटकनाशकाचेही गुणधर्म असून, मत्स्यपालनामध्ये वापर करता येऊ शकेल.

 • मोहाचे मद्य: फुलांच्या किण्वन प्रक्रियेनंतर त्यातून मद्य आणि मद्यआधारित पेयांची निर्मिती केली जाते. वायव्य भारतातील स्थानिक लोक मोहापासून मद्य (त्यात अल्कोहोलचे प्रमाण 20 ते 40 टक्के) तयार करतात. त्यात गूळ, अमोनियम क्लोराईडबरोबरच काही वेळेस मिरी मिसळून तीव्र स्वाद मिळवला जातो. मुरवल्यानंतर डिस्टिलेशनद्वारे मद्य मिळवले जाते. एक किलो वाळवलेल्या फुलांपासून 300 ते 400 मिली मद्य मिळू शकते. ओरिसामध्ये मोहाच्या फुलापासून बनवलेल्या मद्याला महुली म्हणतात. त्याची बनवण्याची पद्धत किंचित वेगळी आहे. किण्वनाच्या प्रक्रियेत बाखर गोळ्या टाकल्या जातात. त्यातील अल्कोहोलचे प्रमाण अधिक म्हणजे 30 ते 40 टक्के असते.

लेखक:
श्री. शैलेंद्र कटके व डॉ. आर. बी. क्षीरसागर

(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

mahua mahua flowers मोहाची फुले मोह महुआ mahuli महुली महुआ मद्य
English Summary: Healthy Mahua flowers

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.