1. आरोग्य

शेतकरी महिलांनो आरोग्याला जपा

KJ Staff
KJ Staff


शेतीत काम करणाऱ्या महिला शेतकरी, मजूर महिलांच्या आरोग्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना दुखणी आली तरी त्या काम करतच असतात. त्यातून त्या दुखण्याकडे दुर्लक्ष होऊन आजार वाढत जातो. परंतु कामे तर नेहमीचीच आहेत ती करावीच लागणार, मात्र आरोग्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्यावेळीच जपायला पाहिजे.

बळीराजाच्या सोबतीला शेतीतील अनेक कामे या महिलाच करत असतात. दिवसाचे १४ ते १८ तास त्या शेतावर आणि घरातही राबतात. जनावरांचे गोठे साफ करणे, दुध काढणे, जनावरांना चारा व पाणी देणे. इत्यादी कामे तसेच शेतीतील पूर्व मशागतीपासून धान्य साठवणुक, वाळवणी आणि विविध हंगामात गृहोपयोगी पदार्थ तयार करण्या सारखी कामे महिला वर्षानुवर्षे करतात. हे सर्व करत असतांना शेतकरी महिलांचे  स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते व परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

शेतीकामाच्या ताणामुळे होणारे आजार:

शेतीची कामे महिला पारंपारिक खुरपी, विळे वापरून हाताच्या व पायाच्या साहयाने पूर्ण करतात. कामाच्या वेळी त्यांच्या शरीरास अनैसर्गिक स्थितीत बराच काळ राहावे लागते. जसे की खुरपणी करताना बराच वेळ पायावर भार देवून बसावे लागते. त्यामुळे पाठीचा मणका, पायांच्या स्नायूंवर व गुडघ्यावर ताण येतो. परिणामी कामाची गती मंद होवून शारिरीक आजार होतात. यामध्ये मुख्यतः पुरूष शेतकऱ्यासाठी बनविलेली असतात, त्यामुळे महिलांची शारिरीक क्षमतेपेक्षा जास्त उर्जा खर्च होते व त्यांना शारिरीक कष्ट पडतात. याबाबत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झालेल्या अभ्यास क्रमानुसार महिलांना कमी जास्त प्रमाणात होणारे शारिरीक विकार पुढीलप्रमाणे आहे. या त्रासांची तीव्रता इतकी असते की महिलांना एका जागेवरून हालचाल करणे देखील अशक्य होते. मणक्यांच्या आजारामुळे जसे डिस्कस्लीप होणे, चक्कर किंवा अंधारी येणे, हातांची बोटे न वळणे, सांधे अकडणे, मान वळवण्यास त्रास होणे, उठ बस करण्यास त्रास होणे. इत्यादी आजार शेतकरी महिलांना होतात हे त्रास कमी करण्यासाठी महिलांनी विद्यापीठाने तयार केलेल्या विविध सुधारीत अवजारांचा वापर करायला हवा.

संरक्षक साहित्याच्या अभावामुळे होणारे आजार:

शेतीतील कामे उघडयावर करावी लागत असल्यामुळे शेतकरी महिलांना ऊन, पाऊस आणि थंडी या बदलत्या हवमानाला सतत तोंड दयावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थावर होऊन त्यांना अनेक आजार किंवा व्याधीना सामोरे जावे लागते. उन्हाळयात उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळयांची जळजळ होते. डोके गरम होतो, डोके दुखणे, प्रसंगी चक्कर येते व खुप घाम येऊन थकवा जाणवतो. शरीराची उघडी त्वचा जाळून आग होऊन जखमा होतात. पिकावर फवारलेल्या किटकनाशकामुळे, कीडींमुळे त्वचेवर परिणाम होऊन त्वचा लाल होणे, खाजवणे, चट्टे पडणे, असे विविध त्वचा रोग व श्वसनाचे आजार होण्याचा धोका संभवतो. लोखंडी अवजाराच्या वापरामुळे पायांना, हातांना इजा होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास उसाचे पाचट लागून जखमा होतात. त्या जखमांवर धुळ व किटकनाशकांचा, रसायनांचा प्रभाव होऊन त्या चिघळतात.

सकस आहाराचा अभाव व अस्वच्छतेमुळे आजार उद्भवतात. वारंवार शीळे अन्न खाणे, अपूरे, आपौष्टिक व अवेळी जेवण, वारंवार उपवास करणे इत्यादीमुळे शेतकरी महिलामध्ये कुपोषण होऊन अशक्तपणा, रक्तक्षय, पित्ताच्या तक्रारी, अल्सर, कंबरदुखी, पाठदुखी, हाडे साच्छिद्र व ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरॉसिस) इत्यादी आजार उद्भवतात. अपौष्टीक आहारामुळे गर्भावस्थेत व स्तनदा मातांमध्ये अशक्तपणा, रक्तक्षय, रांताधळेपणा, गर्भपात तसेच प्रसुतीत बालमृत्यू व कुपोषीत बालकांचा जन्म यासारख्या भीषण समस्या उद्भवतात.

काय काळजी घ्याल:

उन्हाळयात शेतात काम करतांना सुती कपडे वापरावेत. डोक्याला सुती रूमाल बांधावा आहारात भरपूर पाण्याचा व सरबताचा वापर करावा. पावसाळयात जास्त काळ पावसात काम केल्याने ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार, संधिवात यासारखे आजार उद्भवतात त्यामुळे पाणी लवकर ठिबकून जाण्यासाठी पॉलिस्टरच्या कापडाचा वापर करावा. त्यामुळे ओले कपडे लवकर वाळतील सततच्या ओलाव्यामुळे पायांच्या बोटांमध्ये चिखलया होतात. त्यासाठी वेळीच योग्य उपचार करावा. हिवाळयात थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड किंवा लोकरी कपडे वापरावेत. फवारणी व बीजप्रक्रीया बुरशीनाशक, कीटकनाशक हाताला लावू नये, श्वसननलिका व डोळयांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून चष्मा, मास्क व हातमोजे असे संरक्षक साहित्य वापरावे.

कापूस वेचणी, भाजीपाला, फुले व फळभाज्या तोडणी, चारा कापणी यासारख्या कामात पुढील किंवा मागील ओटीचा कापूस वेचणी कोट किंवा सनकोट व हातास आणि डोक्यास रूमाल बांधून स्वतःचे संरक्षण करावे. करडई, सोयाबीन इत्यादी पिकांची कापणी करतांना हातांना जखमा होऊ नये म्हणून जाड कपडयाचे हातमोजे महिलांनी वापरावेत. करडई, सोयाबीन इत्यादी पिकांची कापणी करतांना हातांना जखमा होऊ नये म्हणून जाड कपडयाचे हातमोजे महिलांनी वापरावेत.

शरीरासाठी आणि शरिरातील विविध कार्य सुरळीत चालण्यासाठी विविध प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. उर्जा, प्रथिने, स्निग्धता, कर्बोदके, जिवनसत्वे आणि खनिजे ही पोषकतत्वे योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक पोषकतत्वांचे शरीरामध्ये वेगळे महत्व असते. आहारामध्ये कॅल्शियम, लोह, जिवनसत्व ‘क’ आणि जिवनसत्व ‘अ’ यांचे प्रमाण दैनदिंन आहारातील आवष्यकतेपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण मात्र आहे. म्हणूनच, आहारामध्ये खनिजे व जिवनसत्वांचे महत्व महत्व जाणून घेणे अति महत्वाचे ठरते.

 • कॅल्शियम:
  प्रत्येक व्यक्तीला कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम हाडांना मजबूती देते व त्यांची रचना करते. याषिवाय हृदयांच्या ठोक्यावर ताबा ठेवते आणि रक्त गोठविण्यासाठी देखील आवष्यक असते. आहारातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे व दात खराब होतात. लहान मुलांची वाढ खुंटते, नंतरच्या आयुष्यात कॅल्शियम कमतरतेमुळे ऑस्टीओमलेषिया, ऑस्टीओपोरोसीस होण्याची शक्यता वाढते तर आहारातील जास्त प्रमाणामुळे हायपर कॅल्शियमीया आणि किडनी स्टोन होऊ शकतो.
  कॅल्शियमचे स्त्रोत: तीळ, कढीपत्ता, चीज, खवा, कोबीची पाने, आळुची पाने, शेवग्याची पाने, सुकलेले खोबरे, माठ, रागी, हरभरयाची पाने, कराळं, पनीर, दुध इत्यादी. 

 • लोह:
  लोह हे एक खनिज असून त्यांची शरीराला आवश्यकता असते. रक्तामधील लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबीन तयार करण्यासाठी हे एक आवश्यक मुलद्रव्य आहे आणि शरीरातील पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करते. रक्तपेशी तयार करण्यासाठी जेव्हा लोह कमी पडते, तेव्हा त्यांचा आकार लहान होऊन त्यांचे प्रमाण कमी होते व त्यांना आवश्यकतेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळतो. काही काळानंतर लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय (अॅनिमीया) होतो. वय, लिंग आणि कामाच्या पध्दतीनुसार आहारातील लोहाची गरज १२-५० मि.ग्रॅ. १ दिवस याप्रमाणे बदलत जाते. आहारातील लोह शरीरामध्ये पचन होण्यासाठी जिवनसत्व ‘क’ मदत करते.
  लोहाचे स्त्रोत: हरभऱ्याची पाने, पोहे, माठ, शेपू, सोयाबीन, आळुची पाने (काळी), मटकी, फुटाणे, चवळी, बाजरी, मसूर, गव्हाचे पीठ इत्यादी.
  जीवनसत्व ‘क’ स्त्रोत: आवळा, शेवग्याची पाने, पेरू, कोथींबीर, पत्ता कोबी, शेवग्याच्या शेंगा, पपई (पिकलेली), मोसंबी, संत्री, पालक, टोमॅटो इत्यादी.

 • जीवनसत्व ’:
  डोळयांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व ‘अ’ ची आवश्यकता असते, तसेच हाडांच्या वाढीसाठी देखील महत्वाचे आहे. शरीरात जीवनसत्व ‘अ’ ची कमतरता असणारा व्यक्ती कमी प्रकाशात पाहू शकत नाही. जीवनसत्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे लाळ ग्रंथी, श्वाच्छोश्वासचा मार्गे, डोळे आणि त्वचेवर देखील प्रभाव पडतो. जीवनसत्व ‘अ’ च्या अधीक्यामुळे हाडांमध्ये ठिसुळपणा येतो. बिटाकॅरोटीन हे जीवनसत्व ‘अ’ चे पुर्व स्त्रोत आहेत. वय लिंग आणि कामाच्या पध्दतीनुसार आहारातील बिटाकॅरोटीनची आवष्यकता १२०० ते ३८०० मायक्रोग्रॅम प्रत्येक दिवसी याप्रमाणे बदलत जाते.

मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे व भाजीपाला याचा आहारात उपयोग करावा. आहारात प्रक्रीयायुक्त सोयाबीन, लिंबू, दुध, दही, शक्य असल्यास मांस, मासे, अंडी तसेच मिश्रधान्य व कडधान्य यांचा वापर करून सकस आहार घ्यावा. आजारांची भीषणता व त्यांचा स्वतः महिलांवर, कुटुंबावर व समाजावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन स्वतः महिला शेतकऱ्यांनी जागरूक राहावे. कुटुंबातील इतर व्यक्तींनी काळजी घ्यावी म्हणजे प्रत्येक कुटुंब  सुदृढ, आनंदी व सुखी होईल.

सौ. कीर्ती गि. देशमुख, डॉ. उमेश ग. ठाकरे
(कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters