Sarkari Yojana :- समाजातील विविध घटकांकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून महामंडळाच्या माध्यमातून समाजातील अशा घटकांकरिता या योजनांची अंमलबजावणी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते
व उद्योग उभारणी करिता आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून होते. अगदी याच पद्धतीने जर आपण राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उद्योजकांचा विचार केला तर यांच्याकरिता राज्यांमध्ये इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यान्वित आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. याच गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. चे अध्यक्ष अतुल सावे यांनी आज मंत्रालयामध्ये केले. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी स्वतः पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व या माध्यमातून गरजू व्यक्तींना देखील रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहन मंत्री श्री अतुल सावे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना श्री सावे म्हणाले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तीचा समावेश असलेल्या शासन प्रमाणीकरण प्राप्त गटांना स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी यांच्या माध्यमातून जे काही कर्ज देण्यात येते त्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाचा परतावा इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेचे स्वरूप
गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून प्रति गटाला बँकेकडून कमाल दहा लाख रुपये आणि उद्योग उभारता यावा याकरिता बँकेच्या माध्यमातून 50 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतीशी संबंधित व पारंपारिक उपक्रम तसेच लघुउत्पादन व व्यापार तसेच विक्री संदर्भातील लहान व मध्यम उद्योग त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रातील गट इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे ज्या गटांना या योजनेच्या अंतर्गत कर्ज मंजूर होईल त्यांनी जर प्राप्त कर्जाचे हप्ते वेळेवर भरले तर त्यांना कमाल १२ टक्के व्याजदराच्या आणि पंधरा लाख रुपये इतक्या रकमेच्या मर्यादेमध्ये व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला महामंडळाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री अतुल सावे यांनी दिली.
गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अधिक माहितीसाठी व सहभागाकरिता इच्छुकांनी या ठिकाणी साधावा संपर्क
महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेची अधिक माहिती हवी असेल व जर सहभाग घ्यायचा असेल तर इच्छुक व्यक्तींनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन योजनांचे पोर्टल या मेनुवरील गट कर्ज व्याज परतावा या योजनेवर क्लिक करून अधिकची माहिती घ्यावी.
Share your comments