डॉ.उषा डोंगरवार, योगेश महल्ले, प्रमोद पर्वते
रबी हा शब्द “वसंत ऋतु” या अरबी शब्दापासून आला आहे आणि हे वास्तव प्रतिबिंबित करते की ही पिके वसंत ऋतूमध्ये काढली जातात. रब्बी हंगाम हा भारतातील आणि दक्षिण आशियातील इतर भागांमधील दोन प्राथमिक पीक हंगामांपैकी एक आहे. ही पिके हिवाळ्याच्या महिन्यांत लागवड केलेली असतात. विशिष्ट पिकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून हा कालावधी थंड हवामान आणि कमी दिवसाच्या प्रकाशाचा म्हणून ओळखला जातो. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि कृषी अर्थव्यवस्थेत योगदान देण्यात रब्बी पिके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारची तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये किंवा इतर पिके घेतली जातात. सध्याचा काळात सर्वच पिकाची काढणी करण्याकरिता मजुरांची टंचाई भासते. वेळेवर कापणी झाली नाही तर बियाणे किंवा धान्य यांच्या प्रतीवर वाईट परिणाम होतो. तसेच पिक उत्पादन घेतांना त्याच्या वाढीसाठी आवश्यक सर्व कामे वेळेवर पूर्ण होने गरजेचे असते अन्यथा त्याचा दुष्परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट येते. शेतीमध्ये सध्याच्या काळात यंत्राचा वापर वाढविणे गरजेचे आहे.
रब्बी पिक कापणी,काढणी व मळणीकरीता उपयुक्त अवजारे
स्वयंचलित कापणी यंत्र (रिपर)
या कापणी यंत्राचा (रीपारचा) वापर गहू, भात, मोहरी, सोनबोरू, करडई सारख्या पिकांच्या कापणी साठी करण्यात येतो. एक एकर पिकाची कापणी एक ते दीड तासामध्ये पूर्ण होते यानुसार एका दिवसात दीड ते पावणे दोन हेक्टर क्षेत्रावरील पिकाची कापणी करता येते . पारंपारिक पद्धतीपेक्षा कापणी खर्चामध्ये ८५ ते ९० टक्के आणि वेळेमध्ये ९० ते ९५ टक्के बचत होते. त्यामुळे कापणीवरील खर्च कमी होतो.
स्वयंचलित कापणी यंत्र हे हाताळणीस सुलभ आहे. कार्बेरेटर व फिल्टर यासारख्या साध्या व नियमित उपयोगातील भागांमुळे त्याचे व्यवस्थापन सुध्दा सहज शक्य आहे. बाकीचे भाग लोखंडी असल्यामुळे त्याची फक्त ग्रीस/ऑइल देवून व्यवस्थापन करता येते. स्वयंचलित कापणी यंत्र पुरुष व महिला सहज चालवू शकतात. म्हणून याचा मोठया प्रमाणात वापर होणे गरजेचे आहे. स्त्री मजुरांचे शारीरीक श्रम यामुळे कमी होऊ शकतात. तसेच कस्टम हायरिंग सेंटर साठी एक उपयुक्त यंत्र म्हणुन वापरले जावू शकतो.
ट्रॅक्टरचलित कंद पिके काढणी अवजार:
बटाटा, आले,गाजर, बिटरूट इत्यादी काढणीसाठी हे अवजार उपयुक्त असून ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविण्यात येते. एका दिवसात दीड ते पावणे दोन हेक्टर क्षेत्रावरील पिकाची काढणी सहजरीत्या करता येते. पारंपारिक पद्धतीपेक्षा कापणी खर्चामध्ये ३५ ते ४० टक्के आणि वेळेमध्ये ६० ते ६५ टक्के बचत होते.
मल्टीक्रॉप थ्रेशर
मल्टी क्रॉप थ्रेशर शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर मशीन आहे. मल्टी क्रॉप थ्रेशर मशीन च्या साहाय्याने गहू, मोहरी, बाजरी, मका, डॉलर हरभरा, साधा हरभरा, इत्यादी पिकांचे दाणे स्वच्छ पद्धतीने काढले जातात. या मशीनच्या साहाय्याने पिकांचे दाणे आणि भुसा वेगळा केला जातो.
मल्टीक्रॉप थ्रेशर मशीनची वैशिष्ट्ये
एक आधुनिक तंत्रज्ञानाने बनवले गेलेले मशीन असून या मशिनच्या साह्याने वेगवेगळ्या प्रकारचे काम एकावेळेस केले जातात. जसे की पिकांच्या कापणीनंतर पिकाची मळणी आणि निर्माण झालेला भुसा वेगळा केला जातो. हे यंत्र हलके असून याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे अगदी सोपे आहे. या यंत्राच्या वापरामुळे वेळेत, मजुरीत आणि पैशात बचत होते.
कंबाइन हार्वेस्टर :
अलीकडे कंबाईन हार्वेस्टरमुळे कापणी व मळणीचे काम सुकर झाली आहे.कम्बाईन हार्वेस्टर हे एक बहुउपयोगी व प्रगत असे कृषी उपकरण आहे. कापणी व मळणी अशी संपूर्ण प्रकिया या एकाच कृषी उपकरणात आहे. हे उपकरण रबी पिके कापणी करण्यासाठी तसेच दाण्यांच्या सफाईसाठी उपयोगात येतो. या मशीनचा वापर केल्यामुळे लागणारे मानवी श्रम कमी होते तसेच वेळेतही बचत होते. मशीनच्या मदतीने शेतीच्या कामामध्ये सुलभता येऊन नफ्यात वाढ होते. याप्रकारच्या हार्वेस्टरमध्ये सर्व प्रकारची मशिनरी फिट असते. मशिनरी आपल्या शक्तीने इंजिन आणि इतर मशीनच्या भागांना संचालित करते. त्यामुळे कापणी, मळणी तसेच सफाईचे काम सुलभतेने होते.बाजारात विविध कंपण्याचे व क्षमतेचे हार्वेस्टर उपलब्ध आहे.
कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे फायदे
कम्बाईन हार्वेस्टर मशीन उपयोग केल्यामुळे मजुरांची समस्या दूर होते तसेच कमी वेळेत जास्त काम केले जाऊ शकते. या मशीनचा एक वेळ वापरामुळे पिकांची कापणी, मळणी आणि धान्याची स्वच्छता केली जाते. हे काम एकदम कमी खर्चात आणि कमी वेळेत पूर्ण होत असते. कम्बाईन हार्वेस्टर मशीनने पिकांची कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतातच राहतात. कालांतराने ते अवशेष कुजल्याने त्यांच्या खतात रूपांतर होते. कम्बाईन हार्वेस्टर यंत्राने कापणी केलेल्या धान्याचा उपयोग बीज उत्पादनामध्ये सुद्धा होतो. नामांकित कंपनीच्या हार्वेस्टर एका तासात १ते २ एकर क्षेत्राची कापणी करतात.
लेखक - योगेश रा. महल्ले- विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र,साकोली (भंडारा)
डॉ.उषा रा.डोंगरवार –वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र,साकोली (भंडारा)
प्रमोद पर्वते विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार ) कृषी विज्ञान केंद्र,साकोली (भंडारा)
Share your comments