1. यांत्रिकीकरण

भाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी

हवामानबदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पन्न व उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच सर्वत्र बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि याउलट शेतीमध्ये मजुर टंचाई भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून बरेच शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसुन येते आहे. अशा परस्थितीमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण आवश्यक आहे. शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे सुधारित अवजारे/यंत्रे वापरुन शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फायदेशीररित्या करणे होय. आज देशामध्ये कृषि अवजारे व यंत्रे यामध्ये लक्षणीय वाढ झाली असताना देखील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांमध्ये यांचा अवलंब खूप कमी असल्याचे दिसून येते. पुष्कळशा शेतकऱ्यांजवळ स्वत:चे बैलदेखील नसतात. सुधारीत अवजारे शेतकऱ्यांनी न वापरण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे लहान शेतकरी जास्त किमतीची अवजारे व यंत्रे खरेदी करु शकत नाहीत तसेच बऱ्याच अवजारांचा वापर वर्षातील काही ठराविक दिवसच होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे भाडेतत्वावर चालणारे सुधारित अवजारे सेवा केंद्र होय.

KJ Staff
KJ Staff


हवामानबदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पन्न व उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच सर्वत्र बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि याउलट शेतीमध्ये मजुर टंचाई भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून बरेच शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसुन येते आहे. अशा परस्थितीमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण आवश्यक आहे. शेतीचे यांत्रिकीकरण म्हणजे सुधारित अवजारे / यंत्रे वापरुन शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फायदेशीररित्या करणे होय. आज देशामध्ये कृषी अवजारे व यंत्रे यामध्ये लक्षणीय वाढ झाली असताना देखील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांमध्ये यांचा अवलंब खूप कमी असल्याचे दिसून येते. पुष्कळशा शेतकऱ्यांजवळ स्वत:चे बैलदेखील नसतात. सुधारीत अवजारे शेतकऱ्यांनी न वापरण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे लहान शेतकरी जास्त किमतीची अवजारे व यंत्रे खरेदी करु शकत नाहीत तसेच बऱ्याच अवजारांचा वापर वर्षातील काही ठराविक दिवसच होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे भाडेतत्वावर चालणारे सुधारित अवजारे सेवा केंद्र होय.

या केंद्रामार्फत भाडेतत्वावर सुधारीत अवजारे शेतकऱ्यांना माफक दरात त्यांच्या शेतीकामासाठी उपलब्ध करुन दिली जातात. यांत्रिकीकरणामुळे पेरणीपूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत, काढणी यांसारखी कामे कमी खर्चात व  कमी वेळेत होऊ शकतात. ही कामे बऱ्याच राज्यांमध्ये भाडेतत्वावर केली जात आहेत.

पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी त्या शेतीची योग्य प्रकारे मशागत करणे गरजेचे आहे. सुधारीत अवजारांच्या वापराने पिकाच्या उत्पन्नात 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यासाठी खेडयांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची सहकारी संस्था स्थापन करुन भाडेतत्वावर सुधारित अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देता येऊ शकतात. तसेच काही शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था अगर शेतकरी स्वत:च्या मालकीची सेवा केंद्रे सुरु करु शकतात. अशी केंद्रे ट्रॅक्टर, नांंगर, फण, पेरणीयंत्रे, कोळपी, मळणी यंत्रे यांसारखी सुधारीत शेती अवजारे विकत घेऊन भाडेतत्वावर इतर शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी देऊ शकतात. त्यांचप्रमाणे ट्रॅक्टरधारक शेतकरीदेखील सर्व प्रकारची सुधारीत शेती अवजारे विकत घेऊन इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकतात. त्यांमुळे त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर वाढून ट्रॅक्टर वापरणे फायदेशीर ठरते. विशेषत: खेडयांमध्ये अशा प्रकारची केंद्रे निर्माण झाल्यांस खेडयांमधील तरुणांना गाव पातळीवरच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अशा सुधारित सेवा अवजारे केंद्राच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची अवजारे भाडे तत्वावर माफक भाडे देऊन उपलब्ध होऊ शकतील. शेतकरी आपली शेतीकामे वेळच्या वेळी, अधिक कार्यक्षमतेने व फ़ायदेशीररित्या पूर्ण करु शकतील. यामुळे मजुरावरील आणि इतर खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.

अवजारांची निवड:

सुरुवातीला अवजारांची निवड जमिनीचा प्रकार, त्या क्षेत्रातील मुख्य पिके आणि विशिष्ठ शेतीकामे यांच्या अनुुषंगाने करावी. अवजारांची निवड ही यंत्रास लागणारी शक्ती त्याची कार्यक्षमता आणि त्याचा ठराविक  कार्य करण्यास लागणारा वेळ यांवर केलेली असावी. विविध पिकांसाठी जास्तीत जास्त तास चालणारी बहुविध अवजारे निवडून खरेदी करावीत. या सर्व बाबींचा उपयोग शेतकरी/शेतकऱ्याच्या समूहास उपयुक्त अशी यंत्रे त्यांच्या गरजेप्रमाणे जमिनीच्या आकारमानाप्रमाणे आणि ऊर्जा (शक्ती) उपलब्धतेनुुसार निवडण्यासाठी होतो.

प्रशिक्षण अवजारांचा वापर:

सुधारीत अवजारे सेवा केंद्र सुरु करण्यापूर्वी सर्व सुधारीत अवजारांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर दाखविणे आवश्यक आहे. ज्यांमुळे इतर शेतकऱ्यांमध्ये सुधारीत अवजारांच्या वापराबद्दल आणि जागरुकता निर्माण होईल. या संस्थेतील सर्व सदस्यांना किंवा समूहास सुधारीत अवजारांचे / यंत्रे चालविण्याचे तसेच कृषि उद्योग चालवण्यासंबधी प्रशिक्षण व मार्गदर्शन करुन त्यामध्ये पारंगत करणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर हिशेब ठेवणे, रेकाॅर्ड तयार करणे या बाबींची माहिती असावी लागते. असे सेवा केंद्र सुरु करु इच्छिणाऱ्या खेडयांतील शेतकरी, तरुण व संस्था यांच्या मार्गदर्शनासाठी शेतीची पेरणीपूर्व मशागत, पेरणी, कुळवणी, पीक सरंक्षक, पिकाची मळणी यांसाठी कोणकोणती अवजारे वापरावीत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच या सुधारीत यंत्राचा वापर फायदेशीर होण्यासाठी वर्षातील कमीत कमी किती तास हे अवजारे / यंत्र भाडयाने देणे आवश्यक आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अवजारांची संख्या तसेच अवजारांच्या वापराचेे तास यामध्ये वाढ झाल्यास नफ्यात वाढ होऊ शकते.

भांडवल:

ट्रॅक्टरधारक शेतकरी हे सुधारित अवजारे सेवा केंद्र कमीत कमी 60 हजार रुपये ते अडीच लाख रुपये इतक्या मुद्दल व 20 टक्के रक्कम सुरुवातीची यंत्रणा प्रस्थापित करण्याकरिता गुंतवून सुरु करु शकतो. ट्रॅक्टर नसलेल्यांसाठी सुरुवातीची गुंतवणुक थोडी जास्त आहे. परंतु शासकीय योजना अंर्तगत काही अनुदानही या सेवा केंद्रास मिळू शकते. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे सुधारीत अवजारे सेवा केंद्र कोणीही एखादा शेतकरी, शेतकरी मंडळ, सहकारी संस्था, अशासकीय संस्था अथवा इतर संस्थामार्फत चालविले जाऊ  शकते.

प्रतिवर्षी एक अथवा अधिक अवजारांची भर पडल्याने मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते व पूर्ण वर्षभर व्यवसाय चालण्याची शाश्वती राहते. स्थानिक परिस्थितीनुसार गुंतवलेले भांडवल तीन ते पाच वर्षामध्ये परत मिळू शकते. शेतीमध्ये भाडेतत्वावर सुधारित अवजारांच्या शेतीच्या विविध कामांसाठी वापर प्रचलित होत आहे. यापुढे भाडेतत्वार शेतीकामांसाठी अवजारे देणे हा एक फायदेशीर व्यवसाय ठरणार आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते.

महेश पाचारणे (विषय विशेषज्ञ), डॉ. महेश बाबर (विषय विशेषज्ञ), संग्राम पाटील (कार्यक्रम सहाय्यक) 
कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव, सातारा

English Summary: Employment Opportunity in Agriculture Machinery Custom Hiring Center Published on: 08 August 2018, 06:38 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters