सध्या आपण यांत्रिकीकरणाचा विचार केला तर ते शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात केले जात असून यंत्रांच्या साह्याने शेतीची पूर्वमशागत असो की पिके काढणे इत्यादी कामे शेतकरी बंधू करू शकता. आपल्याला माहित आहे कि, शेतीमधील कुठलेही काम हे खूप कष्टाचे असते व त्यासाठी लागणारा वेळ देखील जास्त लागतो. एवढेच नाही तर काही कामे करण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासते व मजूर वेळेवर मिळतील याची कुठलीही शाश्वती नाही आणि मजुरीचा खर्च याचा विचार केला तर तो बर्याचदा शेतकऱ्यांना परवडण्या पलीकडे जातो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कामांना वेळ जात असल्यामुळे वेळेचे नियोजन चुकण्याची भीती असते. परंतु या पार्श्वभूमीवर जर यंत्रांचा वापर केला तर मजुरांची समस्या तर मिळतेच परंतु कामेदेखील जलद गतीने आणि वेळेत होण्यास मदत होते.
आता आपल्याला माहित आहेच कि शेतीच्या कामामध्ये पिकांच्या लागवडीपेक्षा पिकांच्या काढणीचा जास्त वेळ आणि खर्च लागतो. यामुळे पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करणे गरजेचे असून त्यासाठी शेतकरी बंधूंना कम्बाईन हार्वेस्टर हे यंत्र खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या लेखामध्ये आपण या यंत्राबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
कम्बाईन हार्वेस्टर यंत्राचे वैशिष्ट्य
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे स्वयंचलित यंत्र असून यामध्ये आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची उपकरणे याला जोडलेली आहेत.
2- या यंत्राला इंजिन आणि चाके असून त्यामुळे ते कोठेही ने-आण करणे सोपे आहे
3- शेतकरी बंधूंना या यंत्राचा वापर करणे खूप फायदेशीर आहे कारण या यंत्राच्या मदतीने पिकांची काढणी आणि मळणी ही दोन्ही महत्त्वाची कामे तुम्ही एकाच वेळी करू शकता.
4- यंत्राच्या साहाय्याने मळणी होत असल्यामुळे शेतामध्ये तुम्हाला स्वच्छ धान्य मिळते.
5- या यंत्राच्या फायद्याचा विचार केला तर या यंत्राच्या साहाय्याने हरभरा, सोयाबीन तसेच मोहरी, गहू आणि भात तसेच मूग इत्यादी पिकांची काढणी करता येते.
6- त्यासोबतच कापणी करत असताना धान्याची मळणी देखील केली जाते व हे मळणी झालेले धान्य गोळा करण्याचे काम देखील या यंत्राच्या साह्याने होते.
7- या यंत्राचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याचदा काही वातावरनिय परिस्थितीमुळे किंवा वाऱ्यामुळे पीक शेतामध्ये आडवे पडते. परंतु अशा पिकाची काढणी देखील या यंत्राद्वारे सहजतेने करता येते.
8- जर या यंत्राच्या कार्यक्षमतेचा विचार केला तर अवघ्या एका तासात चार ते पाच एकर पिकाची कापणी करून शेतकऱ्यांना धान्याचे उत्पादन हातात येते.
कम्बाईन हार्वेस्टरची किंमत
जर आपण या यंत्राच्या किमतीचा विचार केला तर हे कंपनी आणि हार्वेस्टरचा आकार या दोन गोष्टींवर अवलंबून असते. भारतामध्ये या यंत्राचा किमतीचा विचार केला तर ती दहा ते 50 लाखांपर्यंत देखील आहे. या यंत्राच्या खरेदीवर सरकारकडून अनुदान देण्यात येते व यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे संपर्क करणे गरजेचे आहे.
Share your comments