मत्स्य व्यवसायामधील स्वयंरोजगाराच्या विविध संधी

02 July 2018 02:52 PM


मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्ट्यामुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश व जागतिक पातळीवर या व्यवसायास विषेश महत्व प्राप्त झाले आहे. या व्यवसायाद्वारे मानवास सकस आहार व मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. मासळीच्या निर्यातीद्वारे देशाला मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीसोबत मत्स्य व्यवसायाचा ही महत्वपूर्ण भूमिका आहे. मत्स्य व्यवसायासाठी आपल्या राज्यातही आवश्यक असणारी साधन संपत्ती विपूल प्रमाणावर उपलब्ध आहे. मत्स्य व्यवसायातून शेतकरी, युवक आणि महिलांकरिता रोजगाराच्या संधी विविध क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर तयार होत आहे. या क्षेत्रांची माहिती आपण इथे पाहू

१) मत्स्यशेती किंवा मत्स्यपालन:

गोडया पाण्यातील मत्स्यशेती कमीत कमी एक एकरच्या तलावात केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्य माशांचे तसेच चंदेरा, गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी उपयोग केला जातो. मत्स्यशेतीचा संवर्धन काळ १० ते १२ महिने इतका असतो. या काळात माशांची वाढ सरासरी एक किलो इतकी होते. मत्स्यशेतीसाठी सर्वात महत्वाची आवश्यकता म्हणजे बारमाही पाण्याचा पुरवठा यासाठी नदी, कालवे किंवा विहीरीचा पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे. त्यानंतर मत्स्यबीज उपलब्ध असणे महत्वाचे आहे. हे मत्स्यबीज चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे. तरच मासळीचे उत्पादन चांगले मिळू शकते. पाण्याचा पुरवठा चार ते सहा महिन्यांचा असलयास मत्स्यबीज उत्पादनाचा व्यवसाय करता येतो. हा व्यवसाय कमी कालवधीमध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. मत्स्यबीजांची वाढती मागणी लक्षात घेतल्यास निश्चितच भरघोस उत्पादन मिळू शकते. कार्प मासळीशिवाय मागूर, पंगस या माशांचे व गोडया पाण्यातील झिंग्याचे ही संवर्धन करता येते.

सद्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेततळे मोठयाप्रमाणात तयार होत असून या शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो. याद्वारे शेतकरी बांधवाना शेततळयामधील पाण्याची साठवणुक करता येते व शेती किंवा फळबागाकरीता या पाण्याचा वापर करता येतो. शेततळयातील पाणी खतयुक्त असल्यामुळे शेती किंवा फळबागाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर शेततळयामधील मत्स्योत्पादनाद्वारे आर्थिक उत्पन्न वाढते. असा दुहेरी फायदा शेततळयातील मत्स्यशेतीमुळे होतो.

२) शोभिवंत माशांचे सवंर्धन व प्रजनन:

अलीकडच्या काळात मोठया कार्यालयांमध्ये घरांमध्ये, हाॅटेलमध्ये, माॅल्समध्ये शोभीवंत माशांचे अॅक्वेरीअम ठेवले जातात. सुशोभिकरणासोबत वास्तू शास्त्रात या रंगीबेरंगी माशांना खूप महत्व आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रंगीबेरंगी माशांना प्रचंड मागणी आहे. या माशांचे प्रजननाद्वारे मत्स्यबीज तयार करुन त्याची विक्री करता येते. काचेच्या विविध आकाराचे अॅक्वेरिअम आकर्षक स्वरुपाात तयार करता येतात. त्यामध्ये लागणाऱ्या इतर साधंनांची (Accessories) उदा. रंगीत वाळू, वनस्पती, एरेटर्स, फिल्टर्सचा ही विक्री करता येते. हा व्यवसाय कमी जागे मध्ये व तुलनेने कमी भांडवलामध्ये ही करता येतो.

३) एकात्मिक मत्स्यशेती:

मत्स्यपालन व्यवसायासोबत इतर व्यवसाय उदा. पशुपालन, कुक्कुटपालन, बदकपालन, भातशेती, असे अनेक व्यवसाय एकत्रित पध्दतीने करता येतात. या व्यवसायातील साधनाचा वापर मत्स्यशेती करिता व मत्स्यशेतीमधील साधंनाचा वापर इतर व्यवसायासाठी करता येते असल्यामुळे एकमेकांशी हे व्यवसाय पूरक आहेत. शिवाय वैयक्तिकरित्या करताना होणाऱ्या खर्चांची बचत ही होते व एकूणच नफयाचे प्रमाण वाढते.

४) मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ निर्मिती व्यवसाय:

सध्या विविध प्रकाराचे खाद्य पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. हे पदार्थ रुचकर व टिकाऊ असल्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. परंतु सर्वच पदार्थ पौष्टिक असतात असेही नाही. अशा वेळेस मासळीपासून विविध पदार्थांची उदा. मत्स्य चकली, मत्स्यवडा, मत्स्य शेव, मत्स्य वेफर्स, माशांचे लोणचे, चटणी इ. निर्मिती करता येते. मासे हे पौष्टिक असून त्यामध्ये आवश्यक जीवनसत्वे असतात. तसेच पचण्यास ही हलके असतात. या गुणधर्मांमुळे मत्स्य पदार्थ सर्व वयोगटातील लोकांना अतिशय उपयुक्त ठरतात. हा व्यवसाय विशेषत: महिलांना करण्यासाठी सोईस्कर आहे. अल्पबचत गटाद्वारे विविध मत्स्य पदार्थं तयार करुन बाजारात विक्री करतात येते. युवकांसाठी सुध्दा हा व्यवसाय हाॅटेलच्या स्वरुपात करता येतो. जास्त काळ टिकणारे मत्स्य पदार्थ उदा. चटणी, वेफर्स, लोणचे इत्यादी तयार करुन विक्री करता येते. अशा रितीने या व्यवसायाद्वारे घरातील सर्व सदस्यांना स्वयंरोजगार मिळू शकतो.

५) मत्स्य खाद्य निर्मिती:

अनेक ठिकाणी मत्स्य शेतीचा व्यवसाय होत आहे. या व्यवसायासाठी मत्स्य खाद्य हा घटक आवश्यक आहे. मत्स्य पालनामध्ये उच्चप्रतीचे मत्स्य खाद्य आवश्यक असल्यामुळे मत्स्य खाद्याची मागणी मोठया प्रमाणात आहे. मत्स्य खाद्य निर्मितीचा व्यवसाय केल्यास निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. 

६) कन्सल्टंन्सी:

मत्स्यशास्त्राचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यांनंतर मत्स्यसंवर्धन, शोभिवंत माशांचा व्यवसाय, मत्स्य पदार्थ निर्मिती व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन गरजू लोकांना देता येते. या व्यवसायाची संपूर्ण शास्त्रीय माहिती लोकांना माहिती नसल्यामुळे मार्गदर्शनपर (Consultancy) हा व्यवसाय ही यशस्वीरित्या करता येवू शकतो.

अशा या विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मत्स्यव्यवसाय करण्यास प्रचंड वाव आहे. परंतू त्यासाठी तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे. या विषयांमधील प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तांत्रिक माहिती प्राप्त करुनच हा व्यवसाय अंगीकारावा. म्हणजे व्यवसाय सुरु करताना अडचणीचे न ठरता सोईस्कर होवून होणारा तोटा टाळता येतो. विशिष्ठ व्यवसाय निवडताना त्याला आवश्यक असणाऱ्या बाबी लक्षात घेऊनच तो व्यवसाय निवडावा. जेणेकरुन व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. यामधून बेरोजगारी सारख्या समस्येवर मात करता येईल. मत्स्य व्यवसायाद्वारे विषेशतः ग्रामीण भागातील शेतकरी, युवक व महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होईल व आर्थिक स्थिती व जीवनमान उचांवेल.

डॉ. अजय कुलकर्णी, श्री. विजय सुतार व श्री. अजय तांदळे
सहाय्यक प्राध्यापक
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर

fishery self employment मत्स्यव्यवसाय स्वयंरोजगार Aquarium शोभिवंत मासे
English Summary: Various opportunities for self employment in the fisheries business

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.