अनेक शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. तर यासाठी गाय-म्हशींचे पालन करतात.तसेच कोणत्या म्हशीच्या जातीचे पालन करून अधिक उत्पन्न मिळवता येईल या शोधात असतात.
महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने म्हशींच्या मराठवाडी, पंढरपुरी आणि नागपूरी या तीन जातीचे पालन केले जाते. यातील पंढरपुरी या जातीचे पालन तर काटक तसेच दुधासाठी केले जाते. पंढरपुरी ही सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. या जातीच्या म्हशी मध्यम आकाराच्या असून यांचा चेहरा लांब आणि निमुळता असतो.
विशेष म्हणजे या म्हशींची शिंगे ४५ ते ५० सेंटीमीटर पर्यंत वाढलेली आणि अगदी खांद्यापर्यंत आलेली असतात. लंबुळकी-पिळदार शिंगे आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीमुळे या म्हशी देशभरात प्रसिद्ध आहे.
अधिक उत्पादन क्षमतेमुळे म्हैस बाकीच्या जनावरांपेक्षा फायद्याची ठरते. तिच्या दुधामध्ये स्निग्धाचे प्रमाण जास्त असून तूस, कुठार यांसारख्या शेतातल्या उरलेल्या अवशेषांवर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्य बनवून म्हशींना देता येते.
दुग्ध व्यवसाय साठी उपयुक्त असणारी ही पंढरपुरी म्हैस हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर सुद्धा तग धरून राहू शकते. जवळजवळ सर्व प्रकच्या वातावरणात ही जात चांगले दूध देते. ही म्हैस कमीत कमी सुमारे ६ ते ७ लिटर दूध देते. व्यवस्थित योग्यरीत्या काळजी घेतली तर या जातीच्या म्हशी १६ ते १८ लिटरपर्यंत सुद्धा दूध देतात. एका वेतात या म्हशी पंधराशे ते अठराशे लिटर दूध देतात.
दूध उत्पादन क्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे. या म्हशींचे वजन साधारण ४५० किलो एवढे असते.प्रजननक्षमते साठी प्रसिद्ध असणाऱ्या
या म्हशीच्या पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात. ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात. दर १२ ते १३ महिन्यात या जातीच्या म्हशी एका पारड्याला जन्म देतात.
बाकी सर्व देखरेख आणि सांभाळ हा इतर जनावरांसारखाच असल्याने विशेष असे लक्ष या म्हशींना द्यावे लागत नाही.
लवकर गाभण राहणे, कमी भाकड काळ आणि चांगली प्रजनन क्षमता असणाऱ्या ह्या पंढरपुरी म्हशीचे पालन केल्यास नक्कीच दुग्ध व्यवसायात फायदा होईल.
Share your comments