आपण जर पशुपालक असाल किंवा पशुपालन करु इच्छित आहात तर जनावरांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. जनावरांना अनेक आजार जडत असतात. जनावारांचे आरोग्य योग्य ठेवणे ही पशुपालकांची मोठी जबाबदारी असते. यातील एक समस्या म्हणजे वार अडकणे. जनावरांमध्ये वार अडकण्याची समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कारण वार अडकणे ही समस्या दुधाळ जनावरांतील प्रमुख समस्या आहे. वार अडकल्यामुळे मुख्यतः जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार दिसून येत नाही. परंतु काही दुधाळ जनावरांनामध्ये चारा कमी खाण्याची व दूध उत्पादन कमी होण्याची लक्षणे दिसून येतात. अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घेणे कधीही फायद्याचे असते.
वार अडकण्यामागे बऱ्याचदा गर्भाशयास कळ कमी असणे किंवा काही कारणामुळे वार तशीच अडकून राहते. जीवाणूंचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाला तर वार कुजून त्याचे रूपांतर पू होण्यात होते. त्यामुळे जनावरांमध्ये ताप येणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होणे, अंडाशयात व गर्भनलिकेत दाह उत्पन्न होतो व या सगळ्या कारणांमुळे जनावरांमध्ये वांझपणा ही येऊ शकतो. गर्भाशयात पु झाल्यामुळे तो कासेत जाऊन कासदाह उत्पन्न करतो व त्याचा परिणाम दूध उत्पादन कमी होण्यावर होतो.
वार अडकण्याची प्रमुख कारणे
जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ तासांच्या आत बाहेर पडायला पाहिजे. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात वार पडते. व गर्भाशय पूर्वस्थितीत येते. गर्भाशय सुटणे व गर्भाशयास कळा येणे या बाबी वार पडण्यासाठी आवश्यक असतात. जेव्हा वासराचा जन्म होतो त्यानंतर वाराचे कार्य संपते, पुढे शरीराकडून वाराला होणारा रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे आपसूकच वाराच्या पेशी निर्जीव होतात त्यातील पाण्याचा अंश कमी होऊन वार अंकुचन पावते. त्यामुळे तिचा गर्भाशयाशी संपर्क तुटून ती लांबते व त्याच्या वजनामुळे व गर्भाशयाच्या कळामुळे शेवटी बाहेर पडते.
वार न पडण्याची प्रमुख कारणे
- जनावरांमध्ये असलेल्या अनुवंशिकतेमुळे वार पडू शकत नाही.
- प्रथमतः प्रसूत होणारी जनावरे व वय झालेली जनावरे
- गाभण काळ पूर्ण होण्याआधीच प्रसुती झाल्यास वार अडकू शकते.
- नर वासरू असल्यास वार अडकू शकते.
- व्यायला आलेली गाय किंवा म्हैस जास्त अंतर चालवत नेल्यास योग्य प्रमाणात व्यायाम न दिल्यास वार अडकू शकते.
- जनावरांमध्ये असलेले संप्रेरकांचे कमी प्रमाण वार अडकणे मागे प्रमुख कारण आहे.
- कॅल्शियम, फास्फोरस, आयोडीन सारख्या खनिज द्रव्यांची कमतरता.
- जीवनसत्व अ किंवा कॅरोटीन व जीवनसत्व ब सारख्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वार अडकू शकते. हे प्रमाण लठ्ठ गाईंमध्ये जास्त प्रमाणात दिसते.
- गर्भाशयाची अंकुचन व प्रसरण पावण्याची क्रिया कमी होणे.
- एखाद्यावेळेस विषबाधा, ॲलर्जी झाली तरी वार अडकू शकते.
- जनावरांनी बुरशीजन्य खाद्य खाल्ले तरी त्याचा परिणाम वार अडकण्यामध्ये मध्ये होतो.
- शस्त्रक्रिया करून वासरू काढल्यास वार अडकून राहण्याची शक्यता वाढते.
- गर्भाशयात पीळ पडल्यामुळे वार अडकण्याची समस्या निर्माण होते.
वार अडकू नये म्हणून काय करता येईल
जनावरांमध्ये वार अडकू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय पशुवैद्यक करू शकतात. तसेच पशुपालकांनी ही समस्या कमी होऊ शकते. जसे व्यायला आलेल्या गाई, म्हशी दररोज तासभर मोकळे सोडाव्यात त्यांना कमीत कमी एक किलो मीटर चालवत न्यावेत. तसेच तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने व्यायला आलेल्या जनावरांची काळजी घ्यावी.
Share your comments