आपला देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो. एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के लोकसंख्या ही शेतीव्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. त्याचबरोबर पशुपालन सुद्धा शेतकरी करत असतो याबरोबरच काही जोडव्यवसाय करून सुद्धा नवीन उत्पन्नाचा मार्ग तयार करत असतात. त्यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय इत्यादींचा समावेश होतो.याचबरोबर शेतकरी वर्ग खत विक्री करून सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे. जोडव्यवसाय असल्यामुळे शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे हे शक्य होते. शेती जर का योग्य प्रकारे पिकवायची असेल तर सर्वात आवश्यक म्हणजे खत आणि पाणी गरजेचे आहे. त्यामुळे बाजारात खतांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
गांडूळ खत निर्मितीला सुरुवात:
शेतकरी शेतीमधून अधिक उत्पन मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची खते वापरतो त्यामध्ये शेणखत काही रासायनिक खते औषधे ,सेंद्रिय खते, गांडूळ खते यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या बाजारात सेंद्रिय खते आणि गांडूळ खते यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे.अकोला जिल्ह्यातील तामसी येथील जगन्नाथ काळे या तरुणाने शेळीपालन व्यवसायाला सुरवात केली कालांतराने शेळ्यांच्या खतांवर म्हणजेच लेंडीवर योग्य प्रयोग करून गांडूळ खत निर्मितीला सुरुवात केली. सध्या गोदावरी नावाच्या गांडूळ खताच्या ब्रँड ला संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
लेंडीपासून गांडूळखत बनवण्याची पद्धत:-
गांडूळखत निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम १२ बाय ४ बाय २ फूट आकाराचा बेड तयार करावा त्यानंतर त्यामध्ये काडी कचऱ्याचा चार इंची थर द्यावा. त्यानंतर त्या बेड मध्ये दोन ते तीन महिने कुजलेले लेंडी खताचा थर द्यावा. त्यावर सतत 4 ते 5 दिवस थोडे थोडे पाणी शिंपडावे. बेडमधील उष्णता आणि तापमान कमी झाले की त्यामध्ये 2 किलो बेसन आणि गूळ टाकावा आणि त्यात 5लिटर प्रमाणे पाणी ओतावे नंतर त्यामध्ये पाच किलो गांडूळ कल्चर सोडावे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी दहा ते बारा लिटर पाणी सोडावे. दर आठ दिवसांनी गांडूळ खत काढले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे 3 महिन्याच्या कालावधी मध्ये चालते. प्रति बेड सुमारे ८ क्विंटल, तर सर्व बेड मिळून चार टन उत्पादन गांडूळखताचे मिळते. त्याचबरोबर ‘व्हर्मिवॉश’चा वापर घरच्या फळबागेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो.
गांडूळखत शेतीसाठी फायदेशीर:-
गांडूळ खत शेतीसाठी खूप उपयुक्त ठरते. गांडूळ जमिनीतील मातीचा दर्जा वाढवतात. आणि जमीन भुसभुशीत करतात त्यामुळे पीक चांगले येते शिवाय रासायनिक खतांचा तुलनेत हे शेतीसाठी खूप फायदेशीर ठरते तसेच मातीचा समतोल योग्य राहत असल्यामुळे शेतकरी गांडूळ खताला पसंती देत आहेत. तसेच गांडूळ खताला बाजारात प्रचंड प्रमाणात मागणी आहे.
Share your comments