पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख आधारस्तंभ असून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायाचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. आता पशुपालन व्यवसायामध्ये गाई आणि म्हशीचे पालन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्ती होते. जेवढे दुधाचे उत्पादन वाढेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्तीत वाढ होऊ शकते. परंतु एकंदरीत आपण विचार केला तर दुधाचे उत्पादन हे गुरांच्या बाबतीत असलेल्या अनेक प्रकारच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.
त्यामुळे शेतकरी राजांनी अशा महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे असते. या लेखात आपण वाढीव उत्पादनासाठी करायच्या काही महत्त्वाच्या बाबी समजून घेऊ.
नक्की वाचा:दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा
वाढीव उत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत या 4 गोष्टी
1- जनावरांची निरोगी पचनसंस्था- आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जनावरांच्या सगळ्या प्रकारचे आरोग्य हे दुधाच्या उत्पादनात परिणाम करत असते. यामध्ये जनावरांची पचनसंस्था आहे व निरोगी असणे खूप गरजेचे आहे.
त्यासाठी गुरांना आपण जे काही वैरण टाकतो ते जमिनीवर न टाकता गव्हाणीत टाकावे व वैरणीची कुट्टी करून जनावरांना देणे हे कधीही फायद्याचे राहील. कुट्टी करीत असताना बोटभर लांब तुकडे करावेत. जनावरांचा चारा हा संतुलित पद्धतीने फक्त ओला किंवा फक्त वाळलेला चारा देऊ नये.
असे केल्यास जनावरांमधील रवंथ करण्याची जी काही महत्त्वपूर्ण क्रिया असते त्याचे प्रमाण कमी होते. यामुळे पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. तसेच वैरण देताना ती एकाच वेळी न देता दिवसातून थोडी-थोडी चार ते पाच वेळा द्यावी. जनावरांना समतोल आहार देणे खूप महत्त्वाचे आहे.
2- गोठ्याची स्वच्छता- जनावरांना आपण ज्या गोठ्यात ठेवलेले असते तो गोठा स्वच्छ, कोरडा तसेच हवा खेळती राहील अशा पद्धतीचा असावा. गोठ्यामध्ये जर ओलसरपणा असेल तर साहजिकच हानीकारक जंतूंची वाढ होण्यास मदत होते व जनावरे आजारी पडण्याची भीती निर्माण होते.\
तसेच जनावरांची खाऊन उरलेली वैरण त्या ठिकाणी पडू न देतात ती बाहेर काढणे खूप गरजेचे असते. तसेच जनावरांना दररोज स्वच्छ केले तर खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही व रक्ताभिसरण खूप चांगल्या पद्धतीने होते.
3- निरोगी प्रजननसंस्था- जनावरांची प्रजनन संस्था निरोगी राखणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी जनावरांचे सांसर्गिक गर्भपाताची चाचणी दरवर्षी करून घेणे गरजेचे आहे.
जबाबदार पशुवैद्यकाकडून कृत्रिम रेतन करणेदेखील गरजेचे असून समजा एखाद्या वेळेस जनावराची वार अडकली तर स्वतः काढण्याचा प्रयत्न न करता किंवा तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्ति कडून वार काढली तर गर्भाशयाची समस्या निर्माण होण्याची भीती असते.
तसेच जनावरांच्या आहारात खनिज द्रव्यांचे प्रमाण व्यवस्थित दिले तर जनावरे उलटण्याची प्रमाण कमी होते. तसेच ज्या जनावरांना गर्भाशयाचे आजार असतील अशा जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवणे खूप गरजेचे आहे.
4- स्वच्छ दूध निर्मिती- जनावरे जर आजारी असतील तर अशा जनावरांपासून स्वच्छ दूध मिळत नाही व अशा दुधाची टिकवण क्षमता कमी होते व दूध खराब होण्याची भीती असते.
त्यामुळे जनावरे निरोगी व सशक्त असणे खूप गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा दुध काढाल तेव्हा प्रत्येक सडातील चार ते पाच धारा वेगळ्या भांड्यात काढावेत व हे वेगळे काढलेले दूध इतर दुधात मिसळू नये.
तसेच जेव्हा दूध काढाल तेव्हा जनावराला कोरडा चारा किंवा उग्र वास येणारा चारा खायला देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ ठेवावी. तसेच दूध काढण्याचे भांडे स्वच्छ गरम पाण्याने धुऊन काढावीत.
नक्की वाचा:Goat Rearing: शेळीपालनातील 'ह्या'9 बाबी म्हणजे शेळीपालनातील यशाचा आहे पासवर्ड
Share your comments