उन्हाळा म्हटला की आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघातचे प्रकार आपण नेहमी पाहत असतो. उन्हाळ्यात आपण आपल्या खाण्या-पिण्यात बदल करत असतो. शरीराची काळजी घेत असतो, जेणेकरुन आपले आरोग्य तंदुरुस्त राहिल. आपण ज्याप्रमाणे आपली स्वत: ची काळजी घेत असतो, त्याचप्रमाणे आपण जनावरांची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात तापमान साधारण ४२ ते ४८ सेल्सिअसपर्यंत पोहोचत असते. यामुळे जनावरांवराच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जनावरांच्या पचनशक्ती आणि दूध उत्पादन क्षमतेवरही परिणाम होत असतो. उन्हाळ्यात पशूपालन करताना योग्य काळजी घ्यावी. जर या दिवसात आपण जनावरांची काळजी नाही घेतली तर भविष्यात होणारी त्यांच्या शारिरिक वाढ, आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि उत्पादन क्षमतेवर परिमाण होऊ शकतो. जनावरांना दिल्या जाणाऱ्या आहाराकडेही आपले लक्ष असले पाहिजे. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर दूध उत्पादन क्षमता साधारण १० टक्क्यांनी कमी होत असते.
तापमानात अधिक वाढ झाली तर जनावरे आजारी पडत असल्याने ते आतून अशक्त होत असतात. याचा परिणाम हा पुढील ऋतूत होत असतो. जनावरांना तळपत्या उन्हापासून, उष्णतेपासून वाचविण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात गरम वातावरण आणि गरम हवा जनावरांच्या दिनचर्येवर परिणाम करत असते. यामुळे आपल्याला या दिवसात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. यात जनावरांना थंड आणि सावली देणारे छत असावे. गुरांना पिण्यासाठी स्वच्छ द्यावे.
उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेताना काय करावे
उन्हापासून आणि लू पासून वाचविण्यासाठी जनावरांना राहण्यासाठी करण्यात आलेल्या शेडसमोर गोणपटाचे पडदे लावावे. उन्हाळ्यात जनावरांमध्ये लू लक्षण आढळत असतात. वातावरण गार नसल्याने, जनावरांच्या शेडमध्ये हवा खेळती नसल्याने आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसणे या कारणामुळे लू होत असतो. अधिक उष्णता वाढली तर जनावरे दगावण्याची शक्यता असते. संकरित जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे. त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे इ. उपाय योजल्यास संकरित गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते. याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे, शक्य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.
लू लागण्याचे लक्षणे - जनावरांना ताप येतो, चारा खात नाहीत. जीभ बाहेर काढतात. तोंडाजवळ फेस येतो, नाक आणि डोळे लाल होतात, पातळ विष्ठा करतात. हृदयातील ठोके वाढतात. लू झालेले जनावरांना ताप येतो, जनावरे सुस्त होतात आणि खात नाहीत. सुरुवातीला जनावरांची नाडी आणि श्वासोच्छवास जलद होत असतो. कधी- कधी नाकातून रक्त येते. जर वेळेवर आपण लक्ष नाही दिले तर जनावरांचा श्वासोच्छवास कमी होऊ लागतो आणि चक्कर येऊन बेशुद्ध होत असतात. त्यानंतर ते दगावत असतात.
लू पासून वाचविण्यासाठी करण्यात येणारे उपचार
- शेड प्रशस्त जागेत बनवा जेणेकरून जनावरांना मोकळी जागा राहिल.
- हवा येण्यास पुरेशी जागा राहील.
- शेड नेहमी हवा येण्यासाठी मोकळे असावे.
- लू झालेल्या जनावरांना थंड ठिकाणी बांधावे.
- बर्फ किंवा गार पाण्याचे पट्ट्या जनावरांच्या डोक्यावर बांधाव्यात जेणेकरुन त्यांना आराम मिळेल.
- गुरांना दररोज १ ते २ वेळा गार पाण्याने अंघोळ घालावी.
- जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता असावी.
- गुरांना उन्हापासून वाचविण्यासाठी पशुपालन करणाऱ्यांनी शेडमध्ये पंखा, कुलर, किंवा फवारा सिस्टीम लावावी.
- गुरांना दिवसा सेडमध्ये बांधावे.
- लू ची लागण झाल्यानंतर तात्काळ पशु वैद्यकीयांना दाखवावे.
- जनावरांना इलेक्ट्रल एनर्जी द्यावी.
उन्हाळ्यात गुरांची काळजी आणि खाद्य -
- उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा खाण्यास द्यावा.
- मुबलक पाणी पिण्यास द्यावे.
- या दिवसात जनावरांना भूक कमी लागते, मात्र तहान जास्त लागते. यामुळे गुरांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. साधारण दिवसातून तीनवेळा पाणी पिण्यास द्यावे. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते. यासह आपण जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते. यामुळे त्यांच्या शरिरात पाण्याची पुर्ती राहत असते. त्यांना अधिक तहान लागत नाही.
- उन्हाळ्यात दुधाळ जनावरांना योग्य आहार आणि पाणी योग्य प्रमाणात दिले पाहिजे.
- उन्हाळ्यात हिरवा चाऱ्याची कमतरता असते, यामुळे पशुपालकांनी जानेवारीमध्ये मूग, मका, कडवल आदी पिके लावावीत. यामुळे उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होईल. ज्यांच्याकडे बागयत जमिन नाही त्यांनी आधीच घास कापून त्याला उन्हात वाळवली पाहिजे. कारण घास प्रोटिन युक्त असते.
- गुरांच्या चाऱ्यात एमिनो पावर आणि ग्रो बी-प्लेक्स मिसळावे.
- उष्णता वाढल्याने गुरांच्या पचनशक्तीवर परिणाम होत असतो, त्यांची भूक कमी होत असते. अशावेळी जनावरांचा खुराक वाढविण्यासाठी गुरांना नियमितपणे ग्रोलिव फोर्ट दिले पाहिजे.
- या दिवसात गुरांना भूक कमी लागत असते पण तहान अधिक लागते. यामुळे गुरांना दिवासातून तीनवेळा गुरांना पाणी पिण्यास द्यावे. यामुळे त्यांच्या शरिरातीत तापमान नियंत्रित राहिल. शक्य असेल तर जनावरांना थंड पाणी पिण्यास द्यावे.
- जनावरांना दिवसातून २ वेळा अंघोळ घालावी. जनावरांना चारा-पाणी केल्यानंतर विराक्लनीने जनावरांची अंघोळ घालावी.
- गुरांना शीळे अन्न खाण्यास देऊ नये. कार्बोहायड्रेट अधिक प्रमाण असलेले खाद्य द्यावे. जनावरांना संतुलित आहार द्यावा.
- वयस्क गुरांना ५० ते ६० ग्रॅम एलेक्ट्रल एनर्जी आणि वासरांना १० ते १५ ग्रॅम एलेक्ट्रल एनर्जी दररोज द्यावे.
- उन्हाळ्यात गुरांचे निवारा नियोजन करताना जनावरांच्या शेडवर वाळलेला चारा ठेवावा. जर आपल्याकडे शेड नसेल तर जनावारांना झाडाखाली बांधावे.
- शेडच्या अवती-भोवती गोणपाटचे पडदे बांधावेत. गुरांचे शेड प्रशस्त असावे. जर शेडच्या अवती-भोवती झाडे असतील ते फायदेशीर असतात.
लेखक:
डॉ. सागर अशोक जाधव, (M.V.Sc., पशूपोषण शास्त्र विभाग)
मोबाईल - ९००४३६१७८४.
Share your comments