1. पशुसंवर्धन

शेळीपालनातील यशासाठी शेळ्यांची निवड पद्धती असते महत्त्वाची

KJ Maharashtra
KJ Maharashtra
निवडीमुळे शेळीपालनात मिळतं यश

निवडीमुळे शेळीपालनात मिळतं यश

शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे. पायाभूत कळपाच्या निवडीसाठी १ ते ३ वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे योग्य ठरते. झटपट वजन वाढणाऱ्या मादी व नराची निवड करावी. शेळीची निवड करताना आपला मूळ हेतू कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपणाला मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे असेल तर जन्मतः जास्त वजनाची करडे देणारी, एका वेतात अधिक करडे देणारी, झटपट वजन वाढणाऱ्या मादी व नराची निवड करावी. दुधासाठी पैदास करायची असल्यास दूध देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी.

शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माची असावी, तरच तिच्यापासून मिळणारी संतती उत्तम राहील. पायाभूत कळपाच्या निवडीसाठी १ ते ३ वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे योग्य होईल.

शेळीचे वय ओळखणे

शेळ्या जर स्थानिक बाजारातून किंवा शेतकऱ्यांकडून खरेदी करावयाच्या असल्यास शेळी किंवा बोकड १ ते ३ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या शेळ्या या वयस्क असू शकतात. कमी वयाच्या शेळ्या आपण विकत घेतल्या, तर आपल्या कळपात जास्त दिवस राहून उत्पन्न देऊ शकतात.

त्या अनुषंगाने शेळीच्या दातावरून तिचे वय ओळखता आले पाहिजे. शेळ्यांच्या वरच्या जबड्यात समोरील बाजूस चावण्याचे दात नसतात, त्या जागी कठीण मांसाचा भाग असतो. खालच्या जबड्यात समोरील बाजूस एकूण आठ दात असतात. करडास जन्मानंतर थोड्या दिवसात (पहिल्या आठवड्यात) खालच्या जबड्यात समोरच्या बाजूस दुधाच्या दाताच्या मधल्या तीन जोड्या येतात. चौथी जोडी वयाच्या चौथ्या आठवड्यात येते. दुधाचे दात छोटे व धारदार असतात. हे दात काही काळानंतर पडून कायमचे दात निघतात.

हेही वाचा : शेळीपालन: शेळी व्यवस्थापनाच्या पद्धती

 • १२ ते १४ महिन्यांत दुधाच्या दातांची मधील पहिली जोडी पडून पहिल्या पेक्षा मोठे कायमचे दात येतात.

 • २४ ते २६ महिन्यांत पहिल्या जोडीच्या दोन्ही बाजूंस असलेले दुधाचे दात (दुसरी जोडी) पडून कायमचे दात येतात.

 • ३४ ते ३६ महिन्यांत दुसऱ्या जोडीच्या दोन्ही बाजूंस असलेले दुधाचे दात (तिसरी जोडी) पडून कायमचे दात येतात.

 • शेळ्या जेव्हा ४ वर्षांच्या असतात, तेव्हा तिसऱ्या जोडीच्या दोन्ही बाजूंस असलेले दुधाचे दात (चौथी जोडी) पडून कायमचे दात येतात.

वैयक्तिक निवड पद्धत

प्रजननासाठी निवड ही त्यांच्या स्वतःच्या दृश्यरूप गुणांवरून करता येते. निवडीची ही पद्धत अतिशय सोपी असून, याद्वारे आपणाला उत्पादनामध्ये प्रगती फार लवकर दिसून येते. प्रजननक्षम शेळी व बोकड निवडताना काही बाबींचा विचार आवश्यक आहे.

 

शेळी निवड

 • शेळीची निवड करताना तिचे गुणधर्म पाहून अतिशय काळजीपूर्वक निवड करावी.

 • अधिक उत्पादनासाठी शेळीपासून २ वर्षांत ३ वेत मिळाले पाहिजे. शेळी निरोगी धष्टपुष्ट व सशक्त असावी.

 • जन्मतःच वजनदार व दोन पेक्षा अधिक पिले देणारी असावी.

 • शांत प्रकृतीची व चारा मन लावून खाणारी असावी.

 • उभी राहताना पाय एकमेकांस समांतर व मजबूत असावेत. पाय सरळ असावेत, टाचेवर व खुरांच्या पुढच्या भागावर जोर देऊन उभ्या राहण्याकडे कल नसावा.

 • शरीर समोरून मागे पसरत असावे. तोंड लांब असावे, नाकपुड्या मोठ्या व लांब असाव्यात, डोळे मोठे, चमकदार असावेत. मान लांब, पातळ व खांद्याशी व्यवस्थित जुळलेली असावी. छाती भरदार व रुंद असावी.

 • दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.

 • दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. सडांची लांबी फार मोठी असू नये, सड माफक लांबीचे व मऊ असावे, कास घट्ट असावी.

 • दूध काढल्यानंतर कासेचा आकार कमी व्हायला हवा. दूध शिरा पोटाखाली कासेपर्यंत स्पष्ट दिसाव्यात. शेळ्या खरेदी करताना शक्यतो दोन दाती व एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.

वंशावळीवरून निवड

 1. या पद्धतीमध्ये नर किंवा मादीची (बोकड किंवा शेळी) व्यक्तिशः निवड मागील चार ते सहा पिढ्यांपासून संबंधित असणाऱ्या पूर्वजांच्या उत्पादन गुणाच्या नोंदीवरून करू शकतो.

 2. या पद्धतीमध्ये आई, वडिलांपैकी एकाच्या गुणांवरून किंवा दोन्हींच्या गुणांवरून किंवा आई-वडील, आजी, आजोबा यांच्या गुणांच्या नोंदीवरून सुद्धा नर मादीची निवड प्रजननासाठी करता येते.

 3. या पद्धतीने नर मादीची निवड वयाच्या सुरुवातीलाच करता येते, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा वेळ किंवा पैसा खर्च होत नाही.

 4. दुग्ध उत्पादन हे लिंग मर्यादित गुण असल्यामुळे फक्त मादीच दूध देते, परंतु नरात सुद्धा दुग्ध उत्पादनाचे जनुके असतात,त्यामुळे आई, मावशी, आत्या, आजीचे दुग्ध उत्पादनावरून नराची निवड करू शकतो.

समांतर किंवा समवयस्क नातेवाइकाच्या आधारे निवड

या निवडीमध्ये सख्खे भाऊ-बहीण, मावस भाऊ-बहीण, आते भाऊ-बहीण इत्यादीच्या उत्पादक गुणाच्या आधारे व्यक्तिशः नर, मादीची निवड करता येते.
व्यक्तिशः नर- माद्या बरोबर जितक्या जवळचे नाते संबंध असणे हे कधीही फायद्याचे असून, आपणाला खात्रीची माहिती मिळते.

बोकड निवड

 • पैदाशीसाठी बोकड वयात येणे हे त्यांचे जन्मतः असणारे वजन, जात, आहार व वातावरण यावर अवलंबून असते.

 • प्रजननक्षम बोकड निरोगी, धष्टपुष्ट, चपळ, उंच, लांब, भरदार छाती असणारा असावा. शरीर प्रमाण बद्ध, हाडे सरळ व शरीराशी सुबद्ध असावीत.

 • मागील पायांवर व्यवस्थित उभे राहावयास पाहिजे.

 • पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा. माजावर आलेल्या शेळीस त्वरित भरण्याची क्षमता अंगी असावी. दोन वर्षे वयात २० माद्या एका महिन्यात भरण्याची क्षमता असावी. आहार व

 

 • वातावरणाचा परिणाम हा वीर्यनिर्मिती व त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा दिसून येतो. सामान्यतः थंडीच्या दिवसांत नर जोमदार असतो.

 • बोकडाला ‘अर्धा कळप’ अशी उपमा दिली आहे, कारण एक बोकड हा पुष्कळ शेळ्यांसाठी उपयोगी असतो. त्यामुळे कळपाची उत्पादनक्षमता ही

 • पुष्कळशी प्रजननासाठी वापरात असणाऱ्या बोकाडावर अवलंबून असते.

 • प्रजननासाठी निवडलेला बोकड हा उच्च प्रतीचा, जास्त दूध देणाऱ्या व करडाची वाढ झटपट होणाऱ्या शेळ्यांची पैदास असलेला असावा.

प्रतिनिधी - गोपाल उगले

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters