नवजात वासरांना होणारे विविध आजार आणि उपचार

Sunday, 22 December 2019 03:48 PM


वासरांच्या जन्मापासून ते वयाच्या सहा ते आठ महिन्यांपर्यंतचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असा असतो. या काळातील वासरांच्या व्यवस्थापनात दुर्लक्ष झाले तर त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यांच्यापासून उत्पादन मिळण्यासाठी बराच कालावधी लागतो.

बेंबीला सूज येणे: वासराच्या जन्मानंतर ज्या भागात नाळ लटकलेली असते तो भाग म्हणजे बेंबी. कधी-कधी या भागाला संसर्ग होऊन सूज येऊन दुखरा बनतो. सूज आल्यानंतर त्यामध्ये पू होतो. त्यानंतर त्याचे विष तयार होऊन ते संपूर्ण शरीरात मिसळते. त्यामुळे वासरांना ताप येतो. दूध, चारा व पाणी याकडे दुर्लक्ष करतात, पांढरी पिवळसर रंगाची हागण लागते, वासरे अशक्त बनतात, त्वचा खरबळीत बनते, नुसता हाडांचा सापळा दिसतो. योग्य वेळी उपचार न झाल्यास वासरे दगावण्याची दाट शक्‍यता असते. साधारणपणे हा आजार रेडकांमध्ये जास्त आढळतो.

जंताचा प्रादुर्भाव: लहान वयात जंताचा प्रादुर्भाव दिसतो. जंतामुळे वासरांना हागवण लागते, रक्ताक्षय होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वासरे विभिन्न आजारास बळी पडतात.

न्यूमोनिया: फुफ्फुस, श्‍वासनलिका, गळ्याचा दाह हा जिवाणू, विषाणू आणि बुरशी यांच्या प्रादुर्भावामुळे होतो. नाकातून एकसारखे पाणी व शेंबूड येतो, ठसका लागतो, खोकला येतो, वजन वाढत नाही, अशक्तपणा येतो.

त्वचेचे रोग: वासरांचे केस गळतात, त्वचेवर लाल चट्टे येतात, त्वचा निस्तेज दिसते. वासरे खाजेने हैराण होतात. अशा वेळी बाह्य कीटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्वचेवर जखमा होतात.

अपचन: वासरे हलगर्जीपणामुळे मोकाट सुटतात आणि प्रमाणापेक्षा जास्त दूध पितात. त्यामुळे पचनक्रिया बिघडून हागवणीमुळे वासरे सुस्त पडून राहतात

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • वासराचा जन्म झाल्यानंतर साधारणपणे एकूण वजनाच्या 10 ते 12 टक्के चिक दोन भागांत विभागून तीन ते चार दिवसांपर्यंत पाजावा. जन्मल्यानंतर पहिल्या एक तासात निम्मा चिक पाजावा. 
  • वासराच्या जन्माअगोदर त्याच्या आईला गाभणपणाच्या शेवटच्या महिन्यात कृमीनाशकाची एक पूर्ण मात्रा द्यावी. त्यामुळे वासरांना जंतापासून संरक्षण मिळते. जन्मानंतर नियमितपणे कृमीनाशकाची मात्रा वासरांना द्यावी. 
  • जन्मानंतर वासराची नाळ स्वच्छ करावी. टिंक्‍चर आयोडिन लावून बेंबीपासून एक ते दीड इंच अंतरावर टिंक्‍चर आयोडिनने भिजविलेल्या दोऱ्याने गाठ बांधावी. नाळ टिंक्‍चर आयोडिनच्या कपामध्ये बुचकळावी. यामुळे जिवाणू व बुरशी यांचा संसर्ग टाळता येतो. 
  • काही कारणांमुळे वासराला त्याच्या आईपासून चिक दूध मिळू शकत नसल्यास नुकत्याच व्यालेल्या दुसऱ्या गाईचा किंवा म्हशीचा चिक पाजावा. जर हेही शक्‍य नसल्यास पुढील मिश्रण तयार करावे. चार लिटर दूध तीन भागांत विभागून प्रत्येक वेळी वासरास पाजताना एक कोंबडीचे अंडे व अर्धा चमचा हळद पावडर आणि पाच मि.लि. शिफारशीत जीवनसत्त्वाचे द्रावण वासरास पाजावे. 
  • अश्‍वगंधा चूर्ण तीन ग्रॅम रोज याप्रमाणे वयाच्या तीन महिन्यांपर्यंत वासरास द्यावे.
  • घटसर्प, एकटांग्या व पायखुरी-तोंडखुरी या रोगांना प्रतिबंधात्मक लस वासरास वयाच्या चौथ्या-पाचव्या महिन्यात पशुवैद्यकाकडून टोचून घ्यावी.

                 

लेखक:
डॉ. गणेश उत्तमराव काळुसे
विषय विशेषज्ञ (पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय)
डॉ. सी. पी. जायभाये
(कार्यक्रम समन्वयक)
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा 

नवजात वासरे new born calf livestock जनावरे न्यूमोनिया Pneumonia जंत worm deworming

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.