गुरांमधील सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रण

25 November 2020 07:23 PM By: KJ Maharashtra

सर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास बळी पडतात. आजार दीर्घकाळ टिकुन राहतो. प्रसार अत्यंत तीव्र गतीने होतो. हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे.सांसर्गिक गर्भपात हा गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांना दीर्घकाळ होणारा जीवाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रादुर्भाव साधारणत: संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. आजारात मरतुकीचे प्रमाण लक्षणीय नसले तरी जनावरांना प्रजनन समस्या निर्माण होतात. हा आजार जनावरांमधुन मनुष्यात संक्रमित होऊ शकतो. आजार बृसेल्ला नावाच्या जिवाणूंमुळे होतो. विविध प्राणीवर्गात वेगवेगळ्या प्रजातींच्या बृसेल्ला जिवांणूमुळे हा आजार होत असला तरी त्यापैकी काही प्रजातींची प्रादुर्भाव एकापेक्षा जास्त प्राणीवर्गात आढळून येतो.

प्रादुर्भाव आणि प्रसार:

* आजार वर्षभर सर्वदुर दिसून येतो. सर्व वयोगटातील जनावरे या आजारास बळी पडतात. आजार दीर्घकाळ टिकून राहतो. प्रसार अत्यंत तीव्र गतीने होतो. आजाराचे जिवाणू बाधित प्राण्यांचे वीर्य, दूध, गर्भपात झालेले अर्भक, जार आणि योनीतील स्त्राव यामधुन अधून-मधून, निरंतर आणि अतिशय जास्त संख्येत शरीराबाहेर टाकले जातात. अशा बाबींच्या संपर्काने दूषित झालेल्या वैरण, कुरणे आणि पाण्यातून आजाराचा प्रसार होतो.

* निरोगी प्राण्याने बाधित प्राण्याचे जननेंद्रिये चाटल्यानेसुध्दा हा आजार पसरतो. दूषित वीर्याच्या माध्यातून निरोगी गायी-म्हशींना या आजाराचा प्रादुर्भाव होतो. दूषित स्त्रावांचे थेंब उडल्याने डोळ्याच्या श्र्लेष्म त्वचा, जखमांची आलेल्या संपर्कातून आणि दुधावाटे आजाराचा प्रसार होतो.

* माणसांमध्ये उदरात गर्भाशयावाटे पिल्लांमध्ये आजार संक्रमित होतो. प्रादुर्भावीत वासरांमध्ये प्रथम गर्भधारणेपर्यंत आजार सुप्तावस्थेत राहतो. अशी जनावरे निरोगी जनांवरांसाठी आजाराचे उगमस्थान म्हणून अत्यंत घातक ठरतात. प्रादुर्भावीत जनावर आयुष्यभर बाधित राहते.

* माणसांमध्ये हा आजार प्रामुख्याने व्यवसायजन्य असुन तो पशुपालक, खाटीक आणि पशुवैद्यकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. दूषित दुधाचे अथवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन, प्राण्यांच्या दूषित स्त्रावांचे डोळ्यांच्या श्र्लेष्म त्वचेवर उडालेले थेंब इत्यादी मुळे माणसांत या आजाराचे संक्रमण होते.

प्रमुख लक्षणे:

* गाभण काळाच्या शेवटच्या काही महिन्यात गर्भपात होणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. मात्र प्रत्येक बाधित गायी-म्हशींमध्ये गर्भपात होईलच असे नाही. साधारणत: बाधा झाल्यानंतर पहिल्यांदा येणा-या गाभण काळाच्या शेवटच्या काही महिन्यात गर्भपात दिसून येतो. त्यानंतरच्या गाभण काळात गर्भपात होत नसल्याचे दिसुन येते. मात्र इतर लक्षणे दिसून येतात.त्यामध्ये कच्ची प्रसूती होणे, अशक्य वासरांचा जन्म होणे, जार अडकणे, दूध उत्पादनात घट होणे ही लक्षणे दिसतात. या आजारात जनावरे इतर आजारांसारखी लक्षणे दाखवीत नाही.

* वळू आणि नर प्राण्यांमध्ये या आजाराच्या प्रादुर्भावाने वृषण, अधिवृषण, वीर्य नलिका बाधित होतात. त्या ठिकाणाहून जिवाणू अधून-मधून विर्यात उत्सर्जित होत राहतात. वृषणे दीर्घकाळ सुजतात. त्यामध्ये गळू होतो. प्राण्यांमध्ये सांधे सुजून सांधेदुखी होते.

* प्रादुर्भावीत मनुष्यामध्ये सतत कणकण जाणवते. ताप सतत कमी जास्त होतो. रात्री घाम फुटतो. वृषणे आणि सांधे सुजतात. डोके, पाठीचा कणा दुखतो. स्त्रियांमध्ये गर्भपात होत नाही.

निदान:

* आजाराची लक्षणे इतर आजारांसारखी नाहीत. लक्षणे दिसण्यास भरपूर कालावधी लागू शकतो.

* लक्षणे दाखविणा-या जनावरांची त्वरित चाचणी करून घ्यावी. कळापातील सर्व प्राण्यांची वर्षातून दोनदा आर.बी.पी.टी. चाचणी करून घ्यावी.

* बाधित आढळलेल्या जनावरांची 21 दिवसांनंतर पुन्हा एकदा चाचणी करावी. ज्या जनावरांची चाचणी सकारात्मक येईल त्यांचे रक्तजल, रक्त, वीर्य, योनिमार्गातील स्त्राव, गर्भपात झालेले अर्भक आणि जार हे नमुने पक्क्या निदानासाठी प्रयोगशाळेत पाठवावेत.

* प्रयोगशाळेत रक्तजलावर इतर चाचण्या, जिवाणू संवर्धन आणि उपलब्ध जनुकीय चाचण्या करून पक्के निदान करता येते.

उपचार आणि प्रतिबंध

* आजारात अनेक प्रतिजैविके प्रभावी ठरतात. मात्र ती दीर्घकाळ वापरावी लागतात. म्हणून बाधित जनावरांवर उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावा. दीर्घकाळ उपचारामुळे उपचारावर जास्त खर्च येतो. हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे.

* आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी गर्भपात झालेले अर्भक, जार, स्त्राव खोल खड्डा करून पुरावे अथवा जाळून टाकावे. बाधित जनावरांना त्वरित विलग करावे. त्यांचा उपचार करावा किंवा प्रक्षेत्रावर इतर जनावरांच्या संपर्कात ठेऊ नये. त्यांना सार्वजनिक बाजारात, मेळाव्यात काढून टाकावे.

* आजारावर जिवंत लसी उपलब्ध आहेत. गायी आणि म्हशींमध्ये बृसेल्ला अबोर्टस कॉटन 19 आणि शेळ्या-मेंढ्यांमध्ये बृसेल्ला मेलीटेन्सीस रेव-1 या लसी वापरतात. मात्र हे लसीकरण मादी वासरां/पिल्लांमध्ये आयुष्यात एकदाच करावे लागते. नर आणि वयस्क माद्यांमध्ये लसीकरण करू नये.

* या आजारावरील लसी जिवंत असल्याने त्या देताना पुरेशी दक्षता घ्यावी लागते. लस देताना हातमोजे दक्षता घ्यावी. लसीकरणानंतर सुई, लसीची कुपी आणि हातमोजे जमिनीत पुरून टाकावेत.

हेही वाचा :गाई – म्हशीच्या गर्भधारणेसाठी ऑक्टोबर ते मार्चचा काळ असतो उत्तम


आर.बी.पी.टी. चाचणीची पध्दत:

* आर.बी.पी.टी. चाचणीसाठी रक्तजल आवश्यक असते. ही चाचणी अत्यंत सोपी असून ती गोठ्यात सुध्दा करता येते.

एक स्वच्छ काच पट्टी घ्यावी. काचपट्टीवर एक थेंब रक्तजल घ्यावे. त्यावर तेवढेच आर.बी.पी.टी. प्रतीजन द्रावण टाकून एकजीव करावे. मिश्रणास घड्याळाच्या काट्याप्रमाणे चार मिनिटे फिरवावे. खालील प्रमाणे निदान करावे.

* मिश्रण एकजीव राहिल्यास: जनावर बाधित नाही.

* पाच मिनिटांनंतर सूक्ष्म गुठळ्या तयार झाल्यास: जनावर बाधित नाही.

* चार मिनिटात गुठळ्या तयार झाल्यास: जनावर बाधित असण्याची शक्यता.

 

संदर्भ - स्मार्ट डेअरी - डिजीटल मॅगझीन.

Disease animals cow buffalo
English Summary: Control of contagious abortion in animal

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.