प्राणी शरीरात पंचेंद्रियांचे महत्त्व खूप मोठे आहे. डोळे ही त्यातील अत्यंत महत्त्वाचा व नाजूक भाग आहे. निसर्गाने प्राण्यांच्या डोळ्याची रचना ही त्यांच्या परिस्थितीला अनुकूल केली आहे. अंधारात काही प्राण्यांचे डोळे चमकतात. प्राण्यांच्या डोळ्यात असणाऱ्या टपेटम लुसिडम या पडद्यामुळे ते चमकतात. हे नैसर्गिकरित्या त्यांना अंधारात दिसण्याकरिता झालेला नैसर्गिक बदल आहे. गायवर्गीय प्राणी जरी रंगांधळे नसले तरी ते सर्व रंग माणसासारखे पाहू शकत नाही.
डोळ्यांच्या आजाराची लक्षणे -
१) डोळ्यातून सतत पाणी येणे. डोळे लालसर होणे.
२) डोळ्यांची उघडझाप करणे किंवा डोळे न उघडणे.
३) सुरवातीस निळसर पांढरा असलेला डोळ्याचा भाग संसर्ग झाल्यास पिवळसर होतो.
४) उन्हात गेल्यावर डोळे उघडत नाही.
जनावरांमध्ये आढळणारे डोळ्यांचे आजार -
डोळ्यांचा संसर्ग /डोळे येणे -
आजार प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात आढळत असला तरी भारतात काही भागात आढळून आला आहे. हा आजार मुख्यत्वे विषाणू तसेच काही जिवाणूंमुळे (उदा.मोरेकझेल्ला बोंव्हिस)होतो.अत्यंत वेगाने पसरणारा हा आजार आहे. लहान वासरांमध्ये वयस्कर जनावरांपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येतो. माश्यांमुळे या आजाराचा प्रसार होतो.
डोळ्यातून सारखे पाणी गळणे, अश्रूंनी पूर्ण चेहरा ओला होणे अशी काही लक्षणे सुरवातीच्या काळात दिसतात. हळू हळू पापण्या आणि चेहऱ्यास पू चिकटलेला दिसतो. सूर्यप्रकाशात गेल्या नंतर खूप वेदना होतात. त्यामुळे काही वेळेस जनावर सूर्यप्रकाशात चरायला जाण्यास तयार होत नाही.दोन्ही डोळ्यांमध्ये संसर्ग झाला असल्यास तात्पुरते अंधत्व येऊ शकते. खूप जास्त दिवस विना उपचार राहिल्यास नेत्र पटलास अल्सर होऊ शकतात. लवकर उपचार झाल्यास हा आजार पूर्ण बरा होतो.
उपचार
पशुवैद्यकाकडून डोळ्यात टाकायचे औषध आणि प्रतिजैवकांची मात्रा द्यावी. नवीन दाखल होणारे जनावर तपासून मगच त्यास गोठ्यात घ्यावे.
गोठ्यातील माशांचे नियंत्रण करावे.
डोळा सुजणे
डोळ्यातील आतील भागामध्ये दाब वाढल्याने डोळा खोबणीच्या बाहेर येतो किंवा नेहमीच्या स्थितीपेक्षा बाहेर आलेला दिसतो.
डोळ्यास जोराचे काहीतरी लागणे. डोक्याला जोराचा आघात झाल्यास कवटीच्या आतील भागाचा दाब वाढतो, त्यामुळेसुद्धा डोळा सुजून बाहेर येऊ शकतो.
उपचार
प्रथमोपचार म्हणून डोक्यावर आणि डोळ्यास बर्फ लावावा. आघात किंवा अपघाताने डोक्याला जोरात लागले असल्यास तत्काळ उपचार घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे डोळा पूर्ण निकामी होण्यापासून वाचतो. खोबणीतून बाहेर आलेला डोळा खोबणीत परत पूर्ववत ठिकाणी बसवावा.
डोळ्यास इजा होणे
जनवरास विविध कारणांमुळे डोळ्यास इजा होते. वैरणीचे खुसपट तसेच झुंज किंवा पळताना इतर जनावराचे शिंग लागून इजा होण्याची शक्यता असते.धारदार वस्तू डोळ्याच्या खोलवर जाऊन विविध पडद्याबरोबर खोलवर जखम होऊन डोळा निकामी होऊन अंधत्व येऊ शकते.वस्तूसोबत किंवा जखमेतून आत गेलेल्या बाहेरील मातीमुळे डोळ्यात संसर्ग होतो.
उपचार
डोळ्यास जखम झाल्यास स्वच्छ ओल्या कपड्याने डोळा झाकावा. बर्फ कपड्यात घेऊन त्यावर दाबून धरल्यास रक्तस्राव कमी होण्यास मदत होते. लक्ष न दिल्यास जिवाणूंमुळे पू आणि दाह होण्याची शक्यता असते.प्रथमोपचार म्हणून आपण डोळ्यात धूळ किंवा इतर काही जाऊ नये याची काळजी घ्यावी.शस्त्रक्रिया गरजेची असल्यास तातडीने निर्णय घेऊन तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन जावे.डोळ्यातील आतील भागामध्ये दाब वाढल्याने डोळा खोबणीच्या बाहेर येतो किंवा नेहमीच्या स्थितीपेक्षा बाहेर आलेला दिसतो.डोळ्यास जोराचे काहीतरी लागणे. डोक्याला जोराचा आघात झाल्यास कवटीच्या आतील भागाचा दाब वाढतो, त्यामुळेसुद्धा डोळा सुजून बाहेर येऊ शकतो.
डोळ्यांचा कर्करोग
कर्करोगाचे नेमके एक कारण नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात.सूर्यप्रकाशातील अति नील किरण हे सुद्धा डोळ्यांचा कर्करोग होण्यास कारणीभूत आहेत.पांढऱ्या रंगाच्या जनावरांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात होतो.डोळ्यांचा कर्करोग हा साधारणतः तिसऱ्या पापणीपासून किंवा डोळ्याचा पारदर्शक पडदा आणि पांढरा भाग यांचा जिथे संगम होतो, त्या भागापासून सुरू होतो.ही गाठ वेळीच लक्ष न दिल्यास पूर्ण डोळा व्यापते. डोळा निकामी होऊ शकतो.
उपचार
सुरवातीच्या टप्प्यात पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. गाठ पसरण्यास त्यामुळे आळा बसून डोळा वाचू शकतो.खूप मोठी गाठ झाली असल्यास डोळा काढावा लागू शकतो. यामुळे जनावराचे बहुमूल्य प्राण वाचवू शकतो.
डोळ्यात जंत होणे
विविध माशा त्यांच्या जीवन चक्रामध्ये डोळ्याच्या घाणीवर पोषण करतात. त्यावेळी या जंताच्या अळ्या डोळ्यात सोडतात. मग जंत डोळ्यात तयार होतात.सुरवातीच्या काळात वळवळ करणारा जंत डोळ्यात दिसून येतो. हा जंत डोळ्याच्या पडद्याला चिकटल्यास पडदा पांढरा होतो. जनावराच्या दृष्टीवर याचा परिणाम होतो.हे जंत थेलेजिया किंवा सेटारिया या जातीचे असतात. डोळ्यातून येणाऱ्या घाणीवर माश्या आकर्षित होतात. या माश्या द्वारे या जंताचा प्रसार होतो.
उपचार
पशू वैद्यकाकडून लवकर शस्त्रक्रिया करून घ्यावी.उशीर केल्यास जंत डोळ्याच्या आतील पडद्याला चिकटून त्याचा दाह करतात. डोळा निकामी होऊ शकतो.
डोळ्यांची काळजी
१. गोठ्यात धारदार टोक असणाऱ्या वस्तू जनावरांच्या अंग घासण्याच्या जागेपासून दूर ठेवा.
२. डोळ्यांना आलेली घाण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
३. डोळ्यांना अघोरी पद्धतीने डागणे किंवा बिब्बा भरणे टाळावे.
४. डोळ्यात मीठ किंवा तंबाखूची चूळ टाकू नका.
५. डोळ्याच्या आजारावर पशूतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. वैदू किंवा स्वत: उपचार करू नयेत.
शेतकरी हितार्थ
- विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
९९२३१३२२३३
Share your comments