बळीराजाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा वास्तववादी व हृदयस्पर्शी लेख जरूर वाचा
महाराष्ट्र आपली जन्मभूमी साधू संतांची, महंतांची,शूर- वीरांची, लढवय्यांची ही कर्मभूमी अशा भूमीत आपण जन्मलो, हे आपले परम भाग्यच.अभिमान व गर्व आहे आम्हाला या मातीचा आमचा महाराष्ट्र जसा गड, किल्ले, डोंगर, दऱ्या, समुद्र, निसर्ग यांनी सजून दिसतो.तसाच तो मनाला भावतो आमच्या बळीराजाने कसलेल्या हिरव्यागार शेतांनी व त्याच्या घामाच्या धारांनी.
आपल्या महाराष्ट्रात शेती हा मुख्य व्यवसाय याच शेतीला कसतो. सुपीक बनवतो त्यात घाम गाळतो दिवस रात्र राबतो, तो आमचा बळीराजा अख्या जगाचा पोशिंदा! भल्या पहाटे याचा दिवस सुरू होतो. शेती म्हणजे काळी आई...ही त्याची श्रद्धा शेतात सर्जा-राजा सोबत जीवापाड मेहनत करतो. पिकाला आपल्या पोराबाळां प्रमाणे जपतो खूप काळजी घेतो.. मग शेतात दमदार पीक डुलायला लागतं. मग याचा आनंद गगनात मावत नाही.पिकाला पाहून तो मोठी स्वप्न रंगवतो. आपलं भलं होईल या आशेनं त्याचा चेहरा फ़ुलतो.
या वर्षी पोरीचं लगीन धुम धडाक्यात होईल असं गावभर सांगत सुटतो. मेहनतीचं फळ त्याला मिळालंच नाही.जगाचा पोशिंदा कधी जगलाच नाही.
पण निसर्गाला हे मान्य नसतं.एक दिवस निसर्ग कोपतो. आणि बहरलेलं पीक भुईसपाट करतो.याच्यासाठी तो खूप मोठा धक्का असतो. बळीराजा हे अस्मानी संकट कसं बसं पेलतो. अस्मानी व सुलतानी संकट हे त्याच्या पाचवीला पुजलेलं. अखं पीक वाया जातं.तरी हा हार मानत नाही. वर्षानुवर्ष निसर्गाचे चटके सोसून सोसून कर्जबाजारी होतो. मग पर्याय नाही म्हणून सावकाराकडून पैसे घेतो. सावकाराच्या चकरा सुरू होतात. त्याचा अपमान होतो. सगळं सहन करतो. पुन्हा नेटानं कामाला लागतो. कारण त्याला आपल्या काळ्या आईला पुन्हा फुलवायचं असतं. त्याच्या यातना कोणाला कधी कळल्याच नाही...जगाचा पोशिंदा कधी जगलाच नाही.
अख्या जगाची पोटाची खळगी भरणारा हा दमदार, कणखर, साधा पण स्वाभिमानी माणूस..! जगासाठी आपलं अखं आयुष्य झिजवणारा हा बाप माणूस..! म्हणायला जगाचा पोशिंदा...
पण नेहेमी उपेक्षित, दुर्लक्षित राहिलेला एक अवलिया. त्याच्या पदरी नेहेमी घोर निराशा.त्याच्या घामाचं मोल त्याला कधी मिळालंच नाही.जगाचा पोशिंदा कधी जगलाच नाही.
अनेक सरकारं आली आणि गेली.याच्या पदरी फक्त आश्वासनं. नुसत्या घोषणा.याचा वापर फक्त मतांसाठी.पाच वर्षे हा आस लावून बसलेला.वर्षानुवर्षे हेच गुऱ्हाळ. आपला फक्त वापर होतोय हे त्याला कधी कळलंच नाही.. हे घडतंय कारण संपूर्ण यंत्रणेचा शेतकऱ्यांप्रती असलेला संकुचित व नकारात्मक भाव.शेतकरी कोठे जाणार, शेवटी मत आम्हालाचं देणार.हा अविर्भाव.शेतकरी खचला. पिचला. त्याने गळफास घेतला .. तो आपल्या प्राणाला मुकला.तरी कुणाला त्याची फिकीर नाही.हा जगाचा पोशिंदा फक्त नावाला. अर्थव्यवस्थेचा कणा फक्त म्हणायला. त्याची अर्थ व्यवस्था कधीच सुधारली नाही. जगाचा पोशिंदा कधी जगलाच नाही.
मोठमोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या सो कॉल्ड उच्च शिक्षित, सुशिक्षित, उचभ्रू लोकांच्या मते शेतकरी म्हणजे गरीब, गाववाला, खेडूत, शेण उचलणारा, साधा माणूस.. बघा... काय भावना आहेत, आपल्या बळीराजा बद्दल... पण ह्याच लोकांना पोसतो, तो बळीराजा. बळीराजाने जर पिकवायचं बंद केलं तर यांचे काय हाल होतील, याची कल्पना ह्या लोकांना नाही.ह्या लोकांना शेतकरी कधी कळलाच नाही...जगाचा पोशिंदा कधी जगलाच नाही.
पेट्रोल, डिझल, गॅस, किराणा,जीवनावश्यक वस्तू व इतर सर्व गोष्टी यांची भाव वाढ झाली की कोणीच ओरड करत नाही. कोणी चकार शब्द काढत नाही.पण माझ्या बळीराजानं कष्टानं पिकवलेल्या कांदा, फळे, भाजीपाला, इतर गोष्टी यात थोडी जरी वाढ झाली, की लगेच सगळीकडं बोंबाबोंब, चर्चा,भाव कमी व्हावेत म्हणून शासन कर्त्यांना सूचना, विनंत्या इ.. वाह रे वाह.काय सहानुभूती आहे यांना जगाच्या पोशिंद्या बद्दल.ह्या अशा वृत्तीमुळे त्याला न्याय कधीच मिळालाच नाही...जगाचा पोशिंदा कधी जगलाच नाही.
आज परिस्थिती वाईट आहे. सगळीकडे भीती, नैराश्य, हतबलता पसरली आहे.अशा वाईट काळात देखील आपला बळीराजा सर्व जगाला पोसतो आहे.आता व येणाऱ्या काळात गरज आहे ती ह्या राजाला बळ देण्याची, साथ देण्याची, त्याला वाचवण्याची, रास्त हमी भाव देऊन मदत करण्याची.! कारण तो टिकला तर जग टिकेल..! चला तर मग ह्या जगाच्या पोशिंद्याला नेटानं उभं करू, त्याला वाचवू, कारण तो वाचला. तरच जग वाचेल! जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा.
Share your comments