1. कृषीपीडिया

जानेवारीमध्ये करावयाची शेतीची कामे

रब्बी पिके चांगल्या अवस्थेत आहेत हरभरा, ज्वारी व इतर पिके डौलदार पाहून आनंद होतोय. वाढलेली थंडी गहू पिकास चांगलीच मानवली आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जानेवारीमध्ये करावयाची शेतीची कामे

जानेवारीमध्ये करावयाची शेतीची कामे

रब्बी चांगली पिकावी आणि त्याहून चांगला भाव मिळावा ही इंग्रजी नवीन वर्षाची प्रार्थना योग्य नियोजन आणि त्याची उत्तम अंमलबजावणी हेच यशाचे, आनंदाचे गमक ठरते याला शेती व्यवसाय तरी कसा अपवाद ठरू शकेल किंबहुना नियोजनाच्या अभावामुळेच शेतीचे खूप मोठे नुकसान होताना दिसते कीडरोग यांचा प्रादुर्भाव आढळल्यास उपाययोजनाच्या मागे धावण्यापेक्षा हवामानावर, ऋतू चक्रावर आधारित नियोजन शेती अधिक फायदेशीर बनवू शकते. याकरिता जानेवारी महिन्यात करावयाच्या शेती कामाचे कँलेंडर साधारणतः खालील प्रमाणे मांडता येईल.

रब्बी पिकांची काळजी अशी घ्या

उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. उगवण चांगली होणेसाठी प्रथम जमीन ओलावून वाफशावर पेरणी करा. पेरणीसाठी फुले प्रगती, एस.बी.११, एम.१३, टी.जी- २६, टी.ए.जी.२४, आय.सी.जी.एस.११, टी.पी.जी.-४१, कोयना (बी९५) या पैकी वाणाची निवड करा. पेरणी करणेपुर्वी प्रतीकिलो बियाण्यास ४ ग्रँम ट्रायकोडर्मा अथवा २.५ ग्रँम कार्बेन्डँझीम किंवा कँप्टन या प्रमाणात बुरशीनाशक चोळावे. तदनंतर रायझोबियम २५० ग्रँम, स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५० ग्रँम प्रती १० किलो बीयाण्यावर बिजप्रक्रीया करावी. पेरणीचेवेळी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, १० किलो झिंक सल्फेट, २५ किलो फेरस सल्फेट, २ किलो बोरॅक्स प्रती हेक्टरी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी पेरणी ३० सें.मी. अंतरावर करावी, हेक्टरी ३,३०,००० भुईमुगाची रोपे असणे जरुरी आहे. त्यासाठी एका ओळीतील २ रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. त्यासाठी पेरणीनंतर ८ ते १० व्या दिवशी नांगे भरून हेक्टरी रोपांची अपेक्षीत संख्या ठेवा. उन्हाळी भुईमुगास तुषार संचणे मार्चपर्यंत १० ते १२ दिवसांनी व एप्रिल पासून ७ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे.

हरभरा : कोरडवाहू हरभरा पिकास ६० ते ६५ दिवसांनी तर बागायती हरभरयास ४५ आणि ७५ दिवसांनी जमिनीतील ओलावा विचारात घेऊन आवश्यकतेनुसार संरक्षीत पाण्याची पाळी द्या. फेरोमन सापळे उपयोग करून कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करता येते.यासाठी एकरी २ सापळ्यात २-४ दिवसात ८-१० पतंग आसल्यास कीड नियंत्रण करावे फूल कळी येताच पहिली फवारणी ५% निंबोळी अर्क + २०० ग्रॅम साबणचा चुरा फवारावा. १०-१२ दिवसानी एच.एन.पी.व्ही. ५०० मि.ली. ५०० ली.पाणी प्रती हेक्टर फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास ३६% प्रवाही मोनोक्रोटोफोस ५५० मिलि अथवा क्लोरोपायरीफोस १२५० मिली प्रती ५०० ली. पाण्यातून फवारावे.

गहू : आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेत (पेरणीनंतर २१ दिवस, ४२ दिवस, ६५ दिवस, ८५ दिवस) पाण्याच्या पाळ्या द्या उशीरा पेरणा केलेल्या पिकास हेक्टरी ४० किलो याप्रमाणे नत्राचा दुसरा हप्ता देऊन पाणी द्या. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मँन्कोझेब ७५ टक्के १५०० ग्रँम ५०० लिटर पाणी अधिक २० किलो युरीया मिसळून प्रतीहेक्टरी फवारणी करावी गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपर्ला कार्निया या परोपजीवी किडीच्या १० ते १५ हजार आळ्या प्रती हेक्टरी पिकावर सोडाव्यात अथवा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस २५ इ.सी. १००० मि.ली. अथवा क्विंनोल्फोस ३० इ.सी. ७०० मि.ली. किंवा मँलेथिऑन ५० इ.सी. १००० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी १५ दिवसानंतर करावी. गव्हातील तण नियंत्रणासाठी आयसोप्रोट्युरोण २.५ किलो प्रती हे. किंवा मेटसल्फुरोन मेथील २० ग्रॅम/ हे. ५०० लिटर पाण्यातून २५ ते ३० दिवसांनी फवारणी करावी.

मोहरी :पीक फुलोरा शेंगा भरण्याच्या आवस्थेत असताना १५ दिवसांच्या अंतराने पाणी पाळया द्याव्यात. हिरवा मावा, काळीमाशी नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफोस २ मिली / लीटर पाण्यातून फवारावे. आवश्यकता वाटल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी घ्यावी.

ऊस

१) खोडवा ऊस :अधिक उत्पादनासाठी खोडव्याचे सुधारीत पध्दतीने व्यवस्थापन करावे.१५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा, ऊस संख्या विरळ असल्यास पिशवीतील रोपांनी नाग्या भराव्यात, बुडख्यावरील पाचट बाजूला सारून बुडखे मोकळे करावे, बुडख्यांच्या छाटणीनंतर ०.१% बाविस्टीन बुरशीनाशकाची फवारणी करावी. काणीग्रस्त व गवताळ वाढी काढून टाका. शेताच्या चोहोबाजूंनी २ ओळी मका व २ ओळी चवळी लावावी तसेच ऊसात तुरळक मका टाकावी त्यामुळे लोकरी माव्यावर जगणार्‍या परभक्षी परोपजीवी कीटकांची वाढ होते. लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास ऊसात लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा या परभक्षी वापराव्यात. फोरेट १०% दांनेदार एकरी ५ ते १० किलो टाकावी पण फोरेट ऊस तोडणी पूर्वी ३ महीने वापरू नये. लोकरी मावाग्रस्त शेतातील पाचट ऊस तोडणीनंतर शेताबाहेर जाळून टाकावे. ऊसाची पाचट न जाळता कंपोस्ट जीवाणू वापरून त्याचे सरीत पसरून खत करावे.

२) पूर्वहंगामी ऊस : काणीग्रस्त व गवताळ वाढीची बेटे काढून टाकावी पूर्व हंगामी ऊसाची लागवड होऊन ६ ते ८ आठवडे झाले असल्यास हेक्टरी १३६ किलो नत्राचा (३०० किलो युरीयाचा) दुसरा हप्ता द्यावा. नत्र युरीया खतामधून द्यावयाचे असल्यास निम कोटेड युरियाचा वापर करा. त्यामुळे नत्र पिकाला हळूहळू उपलब्ध होऊन नत्राची बचत होते. नत्राचा तिसरा हप्ता १२ आठवड्यांनी ३४ किलो/ हे. द्यावा. जानेवारी महिन्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पाळी द्याव्यात.

फळबागा :नवीन लागवड केलेल्या कलमी आंबा, बोर, मोसंबी, चिकूच्या खुट रोपावरील फुट वरचेवर काढा. कलमांची फूट चांगली झालेली असल्यास कलमाच्या ठिकाणी बांधलेली पॉलिथीन पट्टी इ. सोडून टाकावी नविन लागवड केलेल्या आंब्याच्या कलमांना आलेला मोहोर काढून टाकावा. नवीन लागवड केलेल्या कलमी डाळींब, चिकू, पेरू इ. फळझाडांना आलेली फळे तोडा. आंबा मोहोराच्या संरक्षणासाठी क्रायसोपर्ला कार्निया या परोपजीवी किडीच्या १० ते १५ हजार आळ्या प्रति हेक्टर झाडावर सोडाव्यात अथवा व्हर्टीसिलीयम लिकयानी या बुरशीजन्य जीवाणूचे ४ ग्रँम प्रती लिटर पाण्यात द्रावण करून फवारावे अथवा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस भुकटी १.५ टक्का व ३०० मेश गंधक १:१ या प्रमाणात मिसळून झाडावर धुरळावी. नवीन लागवडीच्या कलमास, रोपास आधार द्यावा.

द्राक्षावरील बोट्रो डिप्लोडिया फळकुज या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग दिसून येताच रोगट पाने, शेंडे करपलेल्या फांद्या, कुजलेली फळे काढून टाकावीत. त्यावर नंतर ट्रायकोडर्मा हे जिवाणू ४ ग्रँम प्रतिलिटर पाण्यातून संपूर्ण वेलीवर फवारावे अथवा ब्यासीलस सबटिलीस इप्रिडिओन कॅप्टन, मन्कोझेब शिफारस केली आहे.नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये पाण्याचा अपुरा पुरवठा असल्यास आळ्यात दाट आच्छादन करून मटका सिंचन किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा.

आंबे बहाराचा पाण्याचा ताण डाळींब बागेस व्यवस्थीत बसला असल्यास (४० ते ५० टक्के पानगळ) बागेची मशागत करून तिला खतपाणी द्यावे. झाडांना जास्त ताण देऊ नये अन्यथा काडयांची मर होईल. पाण्याचा ताण देऊनही पानगळ चांगली होत नसल्यास ताणाच्या काळात पाणी सोडण्यापूर्वी १५ दिवस अगोदर झाडावर इथेल (२ मि.ली./ १ लिटर पाण्यात) मारावे. त्यामुळे किड व रोगग्रस्त संपूर्ण पाने गळून पडतात.जमिनीची मशागत करण्या करीता हलकी नांगरट द्यावी. झाडाभोवतालची १ ते १.५ मीटरची मशागत हाताने करावी. ताण संपल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात खोडापासून १.५ ते २.० मीटर अंतरापर्यत आळे अथवा स-या पाणी देणेकरीता कराव्यात. त्यावर संपूर्ण शेणखत (४ ते ५ घमेली) + ३२५ ग्रँम नत्र + २५० ग्रँम स्फुरद + २५० ग्रँम पालाश ही खते झाडास बहार धरणेचेवेळी द्यावीत त्यानंतर २५ ग्रँम अँझोटोबँक्टर व २५ ग्रँम स्फुरद जीवाणू एक घमेले शेणखतात मिसळून झाडाभोवती आळ्यात टाकून मातीत मिसळावे व १ ते १.५ महिन्यानंतर आणखी ३०० ग्रँम नत्र द्यावे. हलक्या व मुरमाड जमिनीत नत्र ३-४ हप्त्यांत विभागून द्यावे. खते खोडाभोवती गोलाकार चर करून चरात द्यावीत.बागेस पाणी देताना ते क्रमाक्रमाने वाढवावे. पहिले पाणी हलके द्यावे. त्यानंतर ७ दिवसांनी दुसरे पाणी / चिंबवणी थोडे जास्त द्यावे. तिस-या पाळीला भरपूर पाणी द्यावे. साधारणपणे २१ ते २५ दिवसांत बाग फुटून नवीन फूट जोमाने येते. नवीन फुटीवर किड दिसल्यास नुवाक्रॉन १०० मि.ली. १०० लिटर पाण्यात मिसळून त्याचा फवारा द्यावा थंडीची तीव्रता वाढल्यास फळबागांचे थंडीपासून संरक्षण करा. त्यासाठी फळबागांना सायंकाळी पाणी द्या. तसेच बागेत रात्री शेकोट्या धुपत ठेवा. झाडाच्या खोडाभोवती खुरपणी करून ९ इंच जाडीचे वाळलेल्या पाला पाचोळ्याचे आच्छादन करा, द्राक्ष बागेच्या बाजुने किलतान बांधा. फळबागेवर वाढरोधकाची फवारणी करा.

जनावरांची काळजी अशी घ्या :दुष्काळजण्य परिस्थितीत जनावरांना वेळेवर पाणी पाजावे जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत, अंगावर गोचीड प्रतिबंधक पावडर लावा तसेच परमेथ्रीन १ मि.ली. प्रती लिटर फवारणी योग्य ठरते, लिव्हर फ्ल्युक रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरास जंताचे औषध पाजावे, यानंतर लिवर टानीक द्यावे व पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे. शेळ्या, मेढ्यांना आंत्रविषार, लाळखुरकत, घटसर्प रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घ्या जनावरांचे थंडीपासून संरक्षण करा, त्यासाठी जनावरांना योग्य अशा निवा-यात (गोठ्यात) बांधा गाय, म्हैस व्याली असल्यास वासराची पारड्याची व्यवस्थीत काळजी घ्या. त्यांना उबदार ठिकाणी ठेवा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या लसुणघासास १५ कि.ग्रँ. नत्र, ५० कि.ग्रँ. स्फुरद किंवा १०० कि.ग्रँ. डी.ए.पी. (१८:४६) द्या. शेळ्यांना फुफुसांचा दाह या रोगावर प्रतिबंधात्मक लस टोचून घ्या.

कृत्रिमरितीने भरलेल्या गाईची गर्भ तपासणी करून घ्यावी. गावठी गोरहांचे खचीकरण करून घ्यावे. जनावरांना जीवनसत्वे व योग्य प्रमाणात क्षार मिळणेसाठी त्यांना चाटण (द्रवरूप खाद्य) द्या. युरीया, मळी, क्षार मिश्रण मीठ, जीवनसत्वे वापरून जनावरांसाठी चाटण तयार करता येते. साधारणतः २.५ लिटर पाण्यामध्ये २.५ किलो युरीया, १ किलो मिठ, २ किलो क्षार मिश्रण यांचे द्रावण करून ते ९२ किलो मळी किंवा गुळाचे घट्ट द्रावणामध्ये मिसळावे त्यात १५ ग्रँम जीवनसत्व अ व ड याची मात्रा मिसळावी, असे तयार केलेले चाटण गोठ्यात ठेवावे. गावठी कोंबड्यांच्या कळपात रेड आयर्लंड जातीचे नर ठेवावेत म्हणजे त्यापासून संकरीत पिल्ले निपजून आंड्यांचे प्रमाण वाढेल.

सद्य परिस्थितीत स्थळ-काळ अनुरूप उपरोक्त तंत्राचा वापर करावा.

 

- संकलन : प्रविण सरवदे,कराड

English Summary: Work done in January month Published on: 03 January 2022, 02:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters