1. कृषीपीडिया

सेंद्रिय शेतीला चळवळीचे स्वरूप का येत नाही?

गेल्या काही वर्षांंचा आढावा घेतल्यास सेंद्रिय शेती ढेपाळलेलीच दिसते गेल्या काही वर्षांत आरोग्य जनजागृती जसजशी होऊ लागली

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सेंद्रिय शेतीला चळवळीचे स्वरूप का येत नाही

सेंद्रिय शेतीला चळवळीचे स्वरूप का येत नाही

गेल्या काही वर्षांंचा आढावा घेतल्यास सेंद्रिय शेती ढेपाळलेलीच दिसत.

गेल्या काही वर्षांत आरोग्य जनजागृती जसजशी होऊ लागली तसतशी ‘सेंद्रिय शेती’ची चर्चाही जोर धरू लागली आहे. मात्र हे होताना आजही सेंद्रिय शेती खूप मोठय़ा प्रमाणात रुजली असे वाटत नाही किंबहुना तिला चळवळीचे स्वरूप आलेले नाही.

शेतीच्या विकासामध्ये अनेक परिवर्तने झाल्याचे दिसतात. त्यातील सेंद्रिय हे एक आहे. आज काळाबरोबर बदलत असताना, अनेक पातळ्यांवर आरोग्य जनजागृती होत असताना आणि काळाची गरज म्हणून तिला व्यापक स्वरूप येण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीला चळवळीचे स्वरूप का येत नाही. गेल्या काही वर्षांंचा आढावा घेतल्यास ती ढेपाळलेलीच दिसते. असे का होते, शेतकऱ्यांच्या पातळीवर प्रयोग करणारे बऱ्याचदा घुटमळताना दिसतात. याचा खोलात जाऊ न विचार आणि अभ्यास ना सेंद्रिय समर्थक करतात, ना सेंद्रिय शेतीला नाके मुरडणारी मंडळी करतात. केवळ आपल्या भूमिका पुढे रेटण्याचे उद्योग चाललेत, असे स्पष्टपणे दिसते. यामुळे सेंद्रिय शेतीची चळवळ अपेक्षित गती साधताना दिसत नाही.  

 मानवाने इतर प्राण्याप्रमाणे असणारे आचरण बदलले. तो एका जागी राहू लागला. नदीकाठी वस्त्या वसवल्या. तरीही सुरुवातीला मानवाचा आहार शिकार, फळे आणि कंदमुळेच राहिली. मानवाने अंदाजे एक लाख वर्षांंपूर्वीपासून जंगलात पिकणारी धान्ये गोळा करून खाण्यास सुरुवात केली. स्थिरतेतून मानवी तोंडे वाढू लागली. भूक भागवण्यासाठी अन्नाची गरज वाढली. अन्नासाठी भटकंती वाढली. यातून मानवाने शेती करण्यास सुरुवात केली. अंदाजे बारा ते चौदा हजार वर्षांंपूर्वीपासून मानव शेती करू लागला, असे मानले जाते. मानवाने अन्नधान्य पिकवणे आणि त्याचा आहारात वापर करण्यास सुरुवात केल्यापासून, त्याला खऱ्या अर्थाने स्थैर्य प्राप्त झाले.

मात्र या शेती क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या बियाण्यांपासून मोठय़ा प्रमाणात उत्पादन मिळवताना जमिनीमध्ये असणारा कस मोठय़ा प्रमाणात शोषत होते. जमिनीतील कस कायम ठेवणे आणि नव्या वर्षांमध्ये भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करणे अपरिहार्य ठरू लागले.

त्यासाठी युरियासारख्या खतांचा अमर्याद वापर सुरू झाला. पिकांवर पडणाऱ्या किडींचा, रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशकांचा मोठय़ा प्रमाणात वापर करणे आवश्यक झाले. कीड, रोग यातून उत्क्रांत होऊन ताकदवर झाले. त्यांना मारण्यासाठी आणखी शक्तिमान कीटकनाशके आणि उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा वापर करण्यात येऊ लागला. याचा पिकासाठी जितका वापर होत होता, त्यापेक्षा जास्त वाया जात होते. पावसाच्या पाण्याबरोबर ते वाहून जात होते. पाण्याचे त्यामुळे प्रदूषण होऊ लागले. निसर्गावर मानवाकडून झालेला हा खरेतर मोठा हल्ला होता.

दुसरीकडे गतीने कामे उरकण्यासाठी शेतांमध्ये यंत्राचा वापर वाढत गेला. बैलांमार्फत होणाऱ्या मशागतीच्या जागी ट्रॅक्टरसारखी यंत्रे आली. मळणीसाठी यंत्रे आली. त्यामुळे पशुधन कमी झाले. त्यांच्यापासून मिळणारे खतही दुरापास्त झाले. शेतीमध्ये पिकांच्या उपयोगास न आलेली खते, कीटकनाशके गवताच्या माध्यमांतून जनावरांच्या पोटात आणि त्यातून दुधांमध्ये त्यांचे अंश उतरू लागले. त्याचा मानवी शरीरावर परिणाम होऊ लागला. पिकांवर वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा आणि इतर रासायनिक खतांचा मानवी जीवनावर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास सर्वाधिक झाला, तो या उत्पादनांच्या माध्यमातून सर्वाधिक नफा कमावणाऱ्या राष्ट्रांमधून. काही वर्षांंतच या राष्ट्रांनी अशा प्रकारे अतिरिक्त खते आणि कीटकनाशकांचा वापर करून उत्पादित केलेल्या फळांवर, भाजीपाल्यावर, अन्नधान्यावर कडक निर्बंध घालण्यात आले. विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त खते, कीटकनाशके वापरण्यात आली असल्यास, त्यांचे प्रमाण या उत्पादनामध्ये आढळल्यास, अशा पदार्थांची आयात रोखण्यात येऊ लागली. आधुनिक शेती पद्धतीमध्ये अन्नधान्याचे, फळांचे, भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले. मात्र खाण्यांवर प्रतिबंध आले.

सेंद्रिय शेतीचा स्वीकार

दरम्यानच्या काळात अगदी विसाव्या शतकातही अल्बर्ट हॉवर्ड यांच्यासारखा इंग्लंडमधून भारतीयांना आधुनिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी आलेला संशोधक भारतातील पारंपरिक शेतीच्या प्रेमात पडला. त्यांनी आधुनिक शेतीच्या तंत्राऐवजी भारतातील सेंद्रिय शेतीचा अवलंब आणि प्रसार करण्यास सुरुवात केली होती. सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी शास्त्रशुद्ध पद्धती तयार केल्या. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी ‘इंदौर पॅटर्न’ विकसित केला. मात्र अन्नधान्याच्या उत्पादनाची वाढ होण्यापलीकडे जगासमोर इतर कोणतेच उद्दिष्ट समोर नसल्याने हॉवर्ड यांच्यासारख्या दृष्टय़ा संशोधकांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. अपवादात्मक काही जाणकार शेतकरी यादृष्टीने प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे प्रमाण नगण्य होते. परिणामी पुन्हा जगाला पूर्वीच्या शेती पद्धतीकडे नव्याने वळण्याची वेळ आली आहे. पुन्हा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे दिवस आले आहेत. झाडांचा पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र यांचा जास्तीत जास्त वापर करून शेती पिकवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरण्यावर किंवा निसर्गस्नेही कीटकनाशके वापरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘सेंदिय शेती’ हा विचार आता स्वीकारला जाऊ लागला आहे. शेतातून सकस अन्न मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पण तिला चळवळीचे स्वरूप येताना दिसत नाही. हे या शेती पद्धतीचे अपयश आहे, असे म्हणावे लागेल.

सन १९९० च्या सुमारास महाराष्ट्रात पहिल्यादा सेंद्रिय शेतीचे वारे वाहू लागले. तत्पूर्वी ते देशातील काही राज्यांत काही प्रमाणात सुरू झालेही होते. हरितक्रांतीने आणलेले संकरित वाण तसेच रासायनिक खतांचा वापर शेतकरी करीत होता. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची उपलब्धता पुरेशी होती. त्यामुळे जमिनीची उत्पादकताही चांगली होती. भारतीय अर्थव्यवस्थेला आणि कृषी जगताला रासायनिक शेतीच्या यशाची धुंदी चढलेली होती. मात्र, १९९० च्या दशकानंतर त्याचे दुष्परिणाम पुढे येऊ लागले. त्यातून जमिनीतील सेंद्रिय कर्बाची सर्वत्र कमतरता भासू लागली. त्यामुळे हळूहळू शेतीची उत्पादकता कमी होऊ लागली. काही ठिकाणी जमिनीची नापीकतेकडे वाटचाल सुरू झाली. यातून पुन्हा कमी खर्चाची सेंद्रिय शेती करा, असे सल्ले देणारी मंडळी पुढे आली. त्यांनी एकही रासायनिक खताचा कण जमिनीत पडता कामा नये, असे सल्ले दिले. यातून उत्पादन आणखी कमी झाले.

मानसिकतेत बदल

गेली काही वर्षे शेतीला रासायनिक खते दिली जात होती. ती एकदम बंद केल्याने अनिष्ट परिणाम उत्पादनात दिसू लागले. यामुळे शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आला. पहिली दोन—तीन वर्षे उत्पादन कमी येते. पुन्हा ते वाढत जाते असे सल्ले सल्लागार मंडळी देत होती. मात्र, तेवढे थांबण्याची शेतकऱ्याची मानसिकता आणि ऐपत नह्ती. यामुळे ही मंडळी पुन्हा रासायनिक शेतीकडे वळल्याचे वास्तव आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९९०—९२ ला पुण्यातील काही मंडळी यामध्ये आघाडीवर होती. त्या काळात सेंद्रिय शेती करणे म्हणजे रासायनिक खते वापरणे बंद करून एकरी २ टन गांडूळ खत वापरावे, असे सूत्र होते. शहरी भागात फार मोठे गिऱ्हाईक सेंद्रिय शेतीमालाला असल्याचे गोंडस चित्र उभे केले होते. पण अपवादात्मक यश आले तरी सेंद्रिय शेतीच्या सल्लागारांनी गांडूळ खते विक्रीचा व्यवसाय जोरात केला होता. यानंतर एक देशी गाय आणि चार एकर सेंद्रिय शेतीची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना वास्तव कमी, भावनिक जास्त आहे. काहींचे केवळ शेतीसल्लय़ांच्या फीवर पोट भरते, त्यांनी यासाठी कायमपणे जोर लावलेला दिसतो आहे. ज्यांचे पोटपाणी केवळ शेतीवर आहे, त्या मंडळींनी सेंद्रिय शेती सोडून दिलेली आहे.

एकात्मिक शेतीचा सुवर्णमध्य

सन २००० सालापर्यंत राज्याला सेंद्रिय शेतीचे धोरण नव्हते. त्यासाठी काम करणारी मंडळी नव्हती. कृषी विद्यापीठांनी याबाबत अलिप्तता बागळलेली होती. आता सेंद्रिय शेतीचे धोरण तयार झालेले आहे. त्याचे प्रमाणीकरणाची सोय झालेली आहे. पण भारतीय जनतेच्या क्रयशक्तीचा विचार केल्यास आरोग्यासाठी जादा किंमत मोजून सेंद्रिय शेतीमालाचा आग्रह अजूनही फारसा धरला जात नाही. फार मर्यादित ग्राहक आहे. परदेशात सेंद्रिय शेतीमालाला प्रचंड मागणी असल्याचे सांगितले जाते. वास्तवात सामान्य शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांच्यासाठी हा केवळ स्वप्नरंजनाचा भाग झालेला आहे. ध्येयवादासाठी काही जण या क्षेत्रात टिकून आहेत. अनेकांचा चरितार्थ शेतीवर अवलंबून नाही, बाहेरून पैशांचे बऱ्यापैकी पाठबळ आहे, आरोग्यासाठी अर्थशास्त्राचा विचार न करता अनेकांची वाटचाल चालू आहे.

शासनाने सेंद्रिय शेतीचे धोरण जाहीरकेल्यानंतर काही प्रमाणात आता विद्यापीठांनी याबाबतचे संशोधन सुरू केले आहे. काही विद्यापीठांमध्ये सलग तीन वर्षे (त्यांच्या पद्धतीप्रमाणे) सेंद्रिय व रासायनिक शेतीचे शेजारी—शेजारी प्रयोग केले व रासायनिक शेतीच सामान्य शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असल्याचे निष्कर्ष आहेत.

महाराष्ट्रातील एका आघाडीच्या साखर कारखान्याने सेंद्रिय साखर उत्पादनाचा प्रयोग करून पाहिला. यासाठी मोठय़ा प्रमाणात यंत्रणा राबविली. पण तयार झालेली सेंद्रिय साखर ग्राहकांअभावी पडून राहिली. त्यातून त्या कारखान्याला मोठा फटका बसला आहे. तसेच एका मोठय़ा समूहाने २०० एकर माळरानाची शेती घेऊ न तिथे देशी गायी पाळून सेंद्रिय भाजीपाला तयार केला. त्यांची स्वत:ची गावोगावी आऊ टलेटस आहेत, शिवाय तो भाजीपाला घरोघरी देण्याची योजना केली होती. तरीही त्या उद्योग समूहाला तो सेंद्रिय शेतीमाल विक्रीचा उद्योग नाइलाजास्तव बंद करावा लागला. अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक छोटे शेतकरी याबाबत अधिक गोत्यात असल्याचे सांगत असतात. एकप्रकारे सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादन घेतले तरी त्याला हक्काचा आणि जास्त पैसे मोजून खरेदी करणारा ग्राहक अद्याप आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात तयार झालेला नाही. यामागे सेंद्रिय उत्पादनाचे महत्त्व पटले नाही असे म्हणावे लागेल किंवा स्वस्तातील माल खरेदी करण्याची भारतीय मानसिकता कारणीभूत असल्याचे ठरवावे लागेल. दरम्यान,रासायनिक खते वापरून निर्माण केलेली शेती उत्पादने सरसकट विषमय ठरविली जात आहेत. हे देखील एक टोक आहे. सेंद्रिय शेतीतील सर्व उत्पादने दर्जेदार असतात व रासायनिक शेतीतील सर्व उत्पादने दर्जाहीन असतात, असे सरसकट विधान करणे चुकीचे आहे. यासाठी एकात्मिक शेती पद्धतीला विशेष महत्त्व आहे. हा सुवर्णमध्य साधतो, तोच शेतीत यशस्वी होतो,असे दिसते. शेतीपुढे अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका सुरू आहे. अशा परिस्थितीत शेती ही सोपी झाली पाहिजे. ती कमीत कमी खर्चात, कमी ताणतणावाची व कमीत कमी मनुष्यबळात यशस्वी झाली पाहिजे. यासाठी व्यापक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. 

 

प्रगतिशील शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

तालुका अचलपूर जिल्हा अमरावती

9404075628

English Summary: Why doesn't organic farming take the form of a movement Published on: 21 February 2022, 11:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters