प्रत्येक वनस्पतीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. हे अन्नद्रव्य वनस्पतीला वाढीस आणि वनस्पतींच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत खूप महत्वपुर्ण भूमिका असते. वनस्पतीला जीवनक्रम पुर्ण करण्यासाठी १७ प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन अन्नद्रव्ये वनस्पतीला मोठ्या प्रमाणात लागतात. तर लोह, बोरान, क्लोरीन, मॅगनिज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, निकेल हे वनस्पतीला खूप कमी प्रमाणात लागतात. बऱ्याच शेतकऱ्यांना अन्नद्रव्य बद्दल माहिती नसते. या लेखाच्या माध्यमातून गहू पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यावर आपण कोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल माहिती घेणार आहोत.
गहू पिकात विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येवू शकतात
जमिनीचा प्रकार,खत व जलव्यवस्थापन, गव्हाचे वाण अशा अनेक घटकांचा अन्नद्रव्य उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. लक्षणे दिसल्यावर लवकरात लवकर नियोजनात योग्य तो बदल करून पिकाची वाढीची अवस्था पूर्ववत करता येवू शकते. लक्षणे ज्या पट्यात दिसून येत आहेत त्याच पट्यात हवा तो बदल केल्याने खर्च नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.
कमतरतेची पूर्तता करते वेळी मिश्रण खतांचा वापर करावा जेणे करून एका घटकाची कमतरता भरून निघाल्याने दुसऱ्या घटकाची कमतरता उचंबळून येणार नाही. कधी कधी एका घटकाच्या कमतरते मुळे दुसऱ्या घटकाची देखील कमतरता निर्माण होते. मिश्र खते वापरल्याने हि अडचण देखील दूर होते.
नत्राच्या कमतरते मुळे येणारा फिक्कट पिवळेपणा: गव्हात नत्राच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात, जेव्हा फिक्कट पिवळे पान दिसण्यास सुरवात जुन्या पानापासून होते तेव्हा प्रामुख्याने नत्राची कमतरता आहे असे लक्षात घ्यावे.
यामुळे वाढीचा वेग कमी होते. पाने लहान राहू लागतात. लक्ष न दिल्याने हि पाने टोकाकडून पिवळी पडत जावून गळून पडतात, फुटवे कमी रहातात, पिक वेळेअगोदर पक्व होते, खुजे रहाते. ओंब्या छोट्या रहातात.
जास्त सामू, हलकी मृदा, मृदेतील सेंद्रिय घटकांची कमतरता, जल-असंतुलन या घटकामुळे नत्राची कमतरता अधिक तीव्र होऊ शकते.
नत्राची कमतरता :
1. नत्राची कमतरता दिसून आल्यास १९:१९:१९ या विद्राव्य खताची २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
स्फुरदाची कमतरता :
1. स्फुरद कमतरतेचे जांभळे चट्टे: स्फुरदाची कमतरता झाल्यास पानावर, क्षिरांवर व खोडावर जांभळे चट्टे दिसुन येतात.जुन्या पानावर पहिले परिणाम होतो.
2. वाढीचा दर मंदावतो, ओंब्या लहान राहतात
3. अति विम्ल जमीन, सेंद्रिय घटकाचा अभाव, जमिनीत चुनखडीचे जास्त प्रमाण,जमिनीतील स्फुरदाची कमतरता, गारठा-ओलावा, अविकसित मुळेयामुळे
4. स्फुरदाची कमतरता होऊ शकते.
5. स्फुरदाची कमतरता दूर करण्यासाठी डिएपी अथवा एमएपी १२:६१:०० या खतांची फवारणी करावी.
लोहाची कमतरता
1. लोहाच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे
2. लोहाची कमतरता असल्यास नवीन पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या रहातात.
3. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पानच पिवळे रहाते व जुनी पाने देखील पिवळी पडू लागतात.
4. विम्ल जमीन, पाणथळ, जास्त प्रमाणात चूनखडी तसेच जमिनीत गरजेपेक्षा जास्त झिंक असल्यास लोहाची कमतरता बळावते.
5. लोहाची कमतरता दिसून आल्यास फेरस सल्फेट ५० ग्रॅम किवा चिलेटेड फेरस २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी
लोह शिफारस
1. लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत (१२०:६०:४० नत्र:स्फुरद :पालाश किलो प्रति हेक्टर ) हिराकस २० किलो प्रति हेक्टरी (१०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून) जमिनीतून द्यावे.
लोहाची कमतरता जस्ताची कमतरता लक्षणे
1. गहू पिकात उच्च प्रतीचे दाणे भरण्यासाठी झिंक हा घटक अतिशय महत्वाचा आहे.
2. अल्कधर्मी व चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असते स्फुरदाचे गरजेपेक्षा जास्त पुरवठा केल्याने झिंक ची कमतरता बळावू शकते.
3. गव्हातील झिंकची कमतरता नवीन पानावर दिसून येते. शिरामधील भाग पिवळा दिसून येतो जर कमतरता जास्त प्रमाणात असेल तर पाने पांढरी होऊ शकतात आणि मरतात.
4. झिंकच्या कमतरतेवर गव्हाच्या झाडांची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे झाडाची उंची आणि पानांचा आकार कमी होणे.
गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्ये शिफारस
पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी १९:१९:१९ अथवा डीएपी या विद्राव्य खताची २ टक्के दराने
(४ किलो ग्रॅम २०० लिटर पाण्यात प्रति एकर) फवारणी करावी.
लेखक : डॉ. योगेश ज. पाटील, मृद शास्त्रज्ञ, मो.९४२१८८६४७४, कृषि संशोधन केंद्र, निफाड.
डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अहमदनगर.
Share your comments