परतीच पाऊस लाबंला तर शेतकऱ्यांना मशागतीसाठी उशीर झाल्याने रब्बी हंगामातील बहुताश पिकांच्या पेरण्या लाबंल्या. सततच्या पावसाने, जमिनीला वाफसा येण्यास उसंत न मिळाल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियाजन पुरते कोलमडले. जिल्ह्यातील बहुताश पिकांचे गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या लाबंल्या. सद्य स्थितीत वेळेवर व उशिरा पेरलेल्या गव्हाचे नियोजन बाबत शेतकरी संदिग्ध आहे.
पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. तरी देखील खरीपातील कांदा, ऊस काढणीनंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. त्या अनुषंगाने गव्हाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व आंतरमशागत कसे करावे याबाबत सदरील लेखात ऊपापोह केला आहे.
-
पाणी व्यवस्थापन
भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसाच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १०-१२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर होणारे परिणाम खाली नमूद केले आहेत.
मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी):
यावेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो व उत्पादनात घट येते.
हेही वाचा : जाणुन घ्या सेंद्रिय खताचे अप्रतिम फायदे
फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी):
ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
पीक फुलोरयास येणे (पेरणी नंतर ७०-८०- दिवसांनी):
पराग सिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते.
दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी):
या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.
दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर ११० दिवसांनी):
या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढीलप्रमाणे पाणी द्यावे.
-
एकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी द्यावे.
-
दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५-६० दिवसांनी द्यावे.
-
तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांन, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे.
-
चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे तर चौथे पाणी ९०-१०० दिवसांनी द्यावे.
-
पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४०-४५ दिवसांनी तर तिसरे ५५-६० दिवसांनी, चौथे पाणी ७०-८० दिवसांनी तर पाचवे ९०-१०० दिवसांनी द्यावे.
-
अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे, त्या क्षेत्रात,पंचवटी,नेत्रावती व एच डी २९८७ (पुसा बहार) या वाणांचे पेरणी करण्याचे नियोजन हंगामाच्या सुरुवातीला करणे आवश्यक आहे. अशा रीतीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन करावे.
आंतरमशागत
पेरणी नंतर २१-३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकाची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर,वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकाचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो. गव्हात चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच,कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागती मुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
गहू पिकातील; अरुंद पानांचे आणि रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दर हेक्टरी आयसोप्रोटयुरॉन (५०%) दोन ते तीन किलो किंवा मेटासल्फूरॉन मेथाईल (२०%) हेक्टरी २० ग्रॅम किंवा २,४- डी (सोडियम) अधिक २% युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस पाणी देवू नये. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा.पॉवर स्प्रे वापरू नये.
खुरपणी नंतर द्या उर्वरित नत्राची मात्रा
- बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रती हेक्टरी ६० किलो नत्र ( १३० किलो युरिया-म्हणजेच २.५ गोणी ),बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रती हेक्टरी ४५ किलो नत्र ( ९८ किलो युरिया-म्हणजेच दोन गोणी) द्यावा.
- पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.( १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९ ) किंवा डीएपी खते २० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी.(१० लि.पाण्यात २०० ग्रॅम युरिया)
गव्हाची उशिरा पेरणी
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर ) फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४), निफाड ३४ (एनआयएडब्लू-३४), एकेएडब्लू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या ह्प्त्यासह दोन चाद्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ से.मी.अंतरावर पेरावे.पेरणी करते वेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (९०:६०:४० नत्र: स्फुरद: पालाश) म्हणजेच सर्वसाधारणपणे दोन गोणी युरिया, ७.५ गोणी सिंगल सुपर फॉसपेट व १.२५ गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता म्हणजेच दोन गोणी युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.
गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ से.मी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता ती एकेरी करावी.म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
सध्या ढगाळ वातावरण व थंडी नसल्याने गव्हाची वाढ समाधानकारक नसल्याचे दिसून येते. गव्हावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात. मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्लूजी ५० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
लेखक -
डॉ. आदिनाथ ताकटे ,मृद शास्त्रज्ञ मो.९४०४०३२३८९,
जयंत नवले ,
डॉ. अंबादास मेहेत्रे
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
Share your comments