1. कृषीपीडिया

गहू पिकातील अन्नद्रव्य कमतरता , लक्षणे, उपाय जाणून घ्या

गव्हामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसताच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचे नियोजन करावे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गहू पिकातील अन्नद्रव्य कमतरता , लक्षणे, उपाय जाणून घ्या

गहू पिकातील अन्नद्रव्य कमतरता , लक्षणे, उपाय जाणून घ्या

गव्हामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसताच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचे नियोजन करावे. वनस्पतीला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी १७ प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, त्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सल्फर, मॅग्नेशिअम, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन अन्नद्रव्ये वनस्पतीला मोठ्या प्रमाणात लागतात. तर लोह, बोरॉन, क्लोरिन, मँगेनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, निकेल हे वनस्पतीला खूप कमी प्रमाणात लागतात. गहू पिकात विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहे. जमिनीचा प्रकार, खत, पाणी व्यवस्थापन, जाती अशा अनेक घटकांचा अन्नद्रव्य उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो.

जस्ताची कमतरता

लक्षणे : उच्च प्रतीचे दाणे भरण्यासाठी जस्त हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. अल्कधर्मी व चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असते. स्फुरदाचा गरजेपेक्षा जास्त पुरवठा केल्याने जस्ताची कमतरता दिसते, कमतरता नवीन पानावर दिसून येते, शिरामधील भाग पिवळा दिसुन जर कमतरता जास्त प्रमाणात असेल तर पाने पांढरी होऊ शकतात आणि मरतात. झाडाची उंची आणि पानांचा आकार कमी होतो.

कारणे : शेणखताचा वापर न केलेले शेत तसेच जमिनीत पहिल्यापासून अन्नद्रव्यांची कमतरता.

उपाय :झिंक सल्फेट ५० ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी १९:१९:१९ किंवा डीएपी २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

लोहची कमतरता

लक्षणे :नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या राहतात. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पानच पिवळे राहते

कारणे : विम्ल जमीन, पाणथळ, जास्त प्रमाणात चुनखडी तसेच जमिनीत गरजेपेक्षा जास्त झिंक असल्यास लोहाची कमतरता बळावते. शेणखताचा वापर न केलेले शेत तसेच जमिनीत पहिल्यापासून अन्नद्रव्यांची कमतरता.

उपाय :लोहाची कमतरता दिसून आल्यास फेरस सल्फेट ५० ग्रॅम किंवा चिलेटेड फेरस २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नत्र कमतरता

लक्षणे :जेव्हा फिक्कट पिवळे पान दिसण्यास सुरुवात जुन्या पानापासून होते तेव्हा प्रामुख्याने नत्राची कमतरता आहे असे लक्षात घ्यावे. यामुळे वाढीचा वेग कमी होवून पाने लहान राहू लागतात. लक्ष न दिल्याने पाने टोकाकडून पिवळी पडत जाऊन गळून पडतात, फुटवे कमी राहतात, पीक वेळेअगोदर पक्व होते, खुजे राहाते. ओंब्या छोट्या राहतात.

कारणे :जास्त सामू, हलकी मृदा, मृदेतील नत्र कमतरता, सेंद्रिय घटकांची कमतरता, जल असंतुलन या घटकांमुळे नत्राची कमतरता अधिक तीव्र होऊ शकते.

उपाय :पीकवाढीच्या अवस्थेनुसार १०० ते २०० ग्रॅम युरिया किंवा १९:१९:१९ हे विद्राव्य खत प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

स्फुरदाची कमतरता

लक्षणे :स्फुरदाची कमतरता झाल्यास पानावर, शिरावर, खोडावर जांभळे चट्टे दिसतात. जुन्या पानावर पहिला परिणाम होतो. वाढीचा दर मंदावतो, ओंब्या लहान राहतात.

कारणे : अति विम्ल जमीन, सेंद्रिय घटकाचा अभाव, जमिनीत चुनखडीचे जास्त प्रमाण, जमिनीतील स्फुरदाची कमतरता, गारठा ओलावा, अविकसित मुळे यामुळे कमतरता होऊ शकते.

उपाय : स्फुरदाची कमतरता दूर करण्यासाठी डिएपी किंवा १२:६१:०० हे २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लक्षणे दिसल्यावर लवकरात लवकर नियोजनात योग्य तो बदल करून पिकाची वाढीची अवस्था पूर्ववत करता येऊ शकते. लक्षणे ज्या पट्यात दिसून येत आहेत त्याच पट्टयात हवा तो बदल केल्याने खर्च नियंत्रणात ठेवणे शक्य आहे, अन्नद्रव्य कमतरतेची पूर्तता करतेवेळी मिश्रण खतांचा वापर करावा. जेणे करून एका घटकाची कमतरता भरून निघाल्याने दुसऱ्या घटकाची कमतरता दिसून येणार नाही. कधी कधी एका घटकाच्या कमतरतेमुळे दुसऱ्या घटकाची देखील कमतरता निर्माण होते. मिश्रखते वापरल्याने ही अडचण देखील दूर होते.

English Summary: Wheat crop nutrients definciency and solutions Published on: 23 January 2022, 06:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters