शेतकरी बंधू पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करतात. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच विविध प्रकारचे जैविक कीटकनाशके तसेच कामगंध सापळ्यांचा देखील वापर यासाठी केला जातो. तसे पाहायला गेले तर किडींचे एकात्मिक व्यवस्थापन होणे खूप गरजेचे असते.
यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो परंतु यामध्ये ट्रायकोकार्ड हे देखील एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी खूप महत्त्वाची भूमिका निभावते. या लेखात आपण याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:स्लज कॅटरपिलर किंवा घोणस आळी किंवा डंख आळी व्यवस्थापन
ट्रायकोकार्ड म्हणजे काय?
पिकांवर जे काही पतंगवर्गीय किडी असतात त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक खूप उपयुक्त ठरतो.
याचेच प्रयोगशाळेमध्ये शास्त्रीयदृष्ट्या संगोपन करून त्यापासून जी काही अंडी मिळतात ते शेतामध्ये प्रसारित करता येतात. या पासून जे अंडी मिळतात त्या अंड्यांना ज्या कार्डवर चिकटवले जाते त्या कार्डलाच ट्रायकोकार्ड असे म्हणतात.
या कार्डची कार्यपद्धती
ट्रायकोकार्ड पोस्टकार्ड सारखे दिसते. कागदावर धान्यामध्ये जाळी करणाऱ्या पतंगाची वीस हजार अंडी चिकटलेली असतात व त्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा लहान परोपजीवी कीटक असतो.
हा साधारणतः गांधील माशी सारखा दिसतो पण आकाराने सूक्ष्म असतो. तो संपूर्ण शेतात फिरतो व जे कीटक पिकांचे नुकसान करतात अशा आळी वर्गीय कीटकांची अंडी शोधून काढतो व त्यांच्या अंड्यामध्ये स्वतःची अंडी टाकतो.
या टाकलेल्या अंड्यातून चोवीस तासाच्या आतमध्ये एक अळी बाहेर पडते व ही बाहेर पडलेली अळी किडींच्या असलेल्या अंड्यांवर दोन ते तीन दिवस उदरनिर्वाह करते. त्यामुळे हानीकारक किटकांच्या अंड्यामधून नवीन कीड तयार होत नाही व किडींचे नियंत्रण होते.
नक्की वाचा:कृषी विद्यार्थ्यांनी केले फवारणी बाबत मार्गदर्शन
ट्रायकोकार्डचा वापर कसा करावा?
समजा तुम्ही शेतामध्ये मका, ऊस आणि कापूस किंवा ज्वारी सारखी पिके घेत असाल तर त्यांच्या पेरणीपासून 40 दिवसांनी आळीवर्गीय कीटकांचा प्रादुर्भाव दिसून यायला लागला की एका एकर मध्ये दोन ते तीन कार्ड लावावे.
या कार्डवर ज्या आखलेल्या जागेवर दहा पट्ट्या कात्रीने हळुवार कापाव्यात व हे तुकडे वेगवेगळ्या पानांच्या खालील बाजूने स्टेपल करावे. म्हणजे पानांच्या खाली व्यवस्थित लावावेत.हे कार्ड लावायचे असेल तर ते सकाळी किंवा संध्याकाळी लावावे.
अधिक फायदा घेण्यासाठी ही काळजी घ्या
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही शेतामध्ये ट्रायकोकार्डचा वापर कराल त्यानंतर 10 ते 15 दिवस कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे टाळावे.
जेव्हा तुम्ही हे कार्ड खरेदी कराल तेव्हा परोपजीवी किटक बाहेर पडण्याची तारीख काय आहे हे व्यवस्थित बघून घेणे गरजेचे आहे कारण ते मुदतीपूर्वीच वापरणे महत्त्वाचे ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीटकनाशके व मुंग्या तसेच तीव्र सूर्यप्रकाशापासून ट्रायकोकार्ड दूर ठेवा.
नक्की वाचा:पॉवर टिलरने खोडव्याची भरणी करत असताना तुम्ही रासायनिक खते कसे टाकता?
Share your comments