फवारणीपूर्वी आपण वापरत असलेल्या पाण्याचा पीएच माहीत करून घेणे आवश्यक आहे. पाण्याचा पीएच हा नेहमी १ ते १४ या अंकापर्यंत मोजला जातो. पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे पाण्याचा नक्की सामू समजत नाही. बाजारात डिजीटल पीएच मीटर उपलब्ध अाहे. त्याचा वापर केल्यास नेमका पीएच कळतो.
- पाण्याचा पीएच त्यातील धन भार किंवा ऋण भारीत आयनांच्या प्रमाणावरून ठरतो.
- ज्या पाण्यामध्ये धन भाराचे प्रमाण अधिक असते ते पाणी आम्लधर्मीय असते. १ ते ७ अंकापर्यंतचा पीएच हा आम्लधर्मीय असतो.
- ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी अल्कधर्मीय असते. ७ पासून पुढे १४ पर्यंतचा पीएच हा अल्कधर्मीय समजतात.
- ७ अंक दर्शविणारा पीएच हा उदासीन समजतात.
- दोन अंकांमधील पीएच १० पट जास्त असतो. यावरून आपणास पीएचची तीव्रता समजून येईल.
फवारणीवेळी याकडे लक्ष द्या.
- फवारणीसाठी पाण्याचा सामू हा ५ ते ६.५ या दरम्यान असावा. पाण्याचा सामू योग्य पातळीपर्यंत कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाच्या रसाचा वापर करतात. मात्र पाण्याचा पीएच स्थिर अधिक काळ ठेवू शकत नाही. अधिक स्थिरतेसाठी सध्या बाजारातील काही द्रावणे उपयुक्त ठरू शकतात.
परिणामी फवारणीतील घटक दीर्घकाळ व पूर्ण क्षमतेने क्रियाशील राहून, योग्य तो परिणाम मिळतो.
- द्रावणाचा पीएच नियंत्रित करण्यासाठी फार खर्च येत नाही. कारण पीएच नियंत्रक घटकांचे प्रति १०० लिटरसाठी प्रमाण ३० ते ४० मिलिपर्यंत असते. तुलनेने फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची किंमत अधिक असते. क्रियाशीलता कमी झाल्याने अपेक्षित परिणाम न मिळाल्यास अधिक नुकसान होऊ शकते, हे लक्षात ठेवावे.
- फवारणी सकाळी किंवा दुपारनंतर केल्यास याचा जास्त फायदा होतो. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असते. तसेच या वेळी पानावरील छिद्रे (स्टोमॅटा) जास्त प्रमाणात उघडलेली असतात.
त्याद्वारे फवारणीचे द्रावण जास्त प्रमाणात शोषले जाते.
तणनाशकाची फवारणीवेळी
बहुतेक तणनाशके ही विम्लधर्मीय (अल्कलाइन) असतात. त्याच वेळी पाण्याचा सामूही विम्लधर्मीय असल्यास तणनाशकाची अर्धी कार्यक्षमता लवकर संपते. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी तणनाशकालाच दोष दिला जातो.तणनाशकांचा काही दोष नसतो.
Share your comments