कॅक्टस म्हटले की, एखाद्या शोभिवंत बाल्कनीमधील कुंड्या आठवू लागतात. छोटी मोठी काटेरी झाडे व त्यांचे विविध आकार डोळ्यांसमोर उभे राहतात. याउलट फड्या निवडुंग किंवा कोरफड म्हटले की, ओसाड भागात फोफावणारी काटेरी झाडे समोर येतात. शेताच्या बांधावर गुरे अात येऊ नयेत म्हणून निवडुंगाचे फड उभे केलेले असतात. वर्षाकाठी क्वचित लाल बोंडे धरून फुलणारा निवडुंग लक्ष वेधून घेतो. अन्यथा त्याच्याकडे कोणाचे लक्षही जात नाही. भर उन्हाळ्यात सारी सभोवतालची झाडे वाळकी, करपून गेलेली दिसत असतानाही निवडुंग किसा हिरवागार राहतो, याकडे कधी तुमचे लक्ष्य केले आहे काय ? तीच गोष्ट कोरफडीची. तशीच गोष्ट कॅक्ट्स जातीचा इतर झाडांची असते. पाणी मिळो वा न मिळो, ती आपली हिरवीगारच असतात.
कॅक्टस हा वनस्पतीप्रकार खास करून कमी पाण्याच्या प्रदेशात, ओसाडी भागात वा वाळवंटी क्षेत्रात वाढणार आहे. जेमतेम आठ दहा इंच पाऊस जेथे पडतो तेथेही कॅक्टस वाढतात, स्थिरावतात, पसरतातही.
अन्य कित्येक वनस्पतींना हा पाऊस पुरेसा नसतो. पण कॅक्टस जातीची व्यवस्था हे जेमतेम मिळणारे पावसाचे पाणी वर्षभरच काय, पण दोन दोन वर्षे पुरवून वापरते. तिची रचनाच तशी आहे. सर्व कॅक्ट्स गोलाकार आकारात वाढतात किंवा त्यांच्यावर उभट रेषा वा खोलगट चिरा असतात. पाने असा प्रकार नसून संपूर्ण आकारच पानासारखा हिरवा दिसतो. यावरच भरपूर काटे असतात. सहसा या काटय़ांमुळे जनावरच काय पण माणूसही त्यांना हात लावायला जात नाही. त्यांचे नैसर्गिक संरक्षण हेच कारण मुळात वाढीचे प्रमाण तसे कमीच असते. मुख्य गोलाकार भागाचा छेद घेतला, तर मध्यभागी असलेला गोलाकार मगज पाण्याने भरून साठविल्याचे दिसते. वर्षात जेव्हा केव्हा पाऊस पडेल, तेव्हा मिळणारा जमिनीतील ओलावा शोषून ही वनस्पती हा साठा भरून ठेवून जपून वापरते; मग भले वर्षभर पाऊस न का पडो. पाने नसल्याने बाष्पीभवनाने पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते. याच कारणाने अगदी उन्हाळ्यातही या वनस्पती हिरव्यागारच आढळतात. पण दृष्टीला न जाणवणारा एक फरक मात्र झालेला असतो. त्यांची 'जाडी' कमी झालेली असून त्या 'वाळलेल्या' असतात.
सर्व वाळवंटीत भागात, ओसाड प्रदेशात या कॅक्ट्सचेच राज्य असते. जोडीला तुरळक खुरटी गवतही आढळतात, पण ती मात्र वाळून जातात. कॅक्ट्सची जात सहसा सहा सात फुटांपेक्षा जास्त उंच नसते. पण काही भागात आढळणारी सॅग्वारा (Saguara Cactus) ही जात मात्र चक्क साठ-एक फूट उंचीपर्यंत वाढते. कॅक्टसचे आणखी एक वैशिष्टय़. एखादा तुकडा कडून मातीत रोवा. त्याला काही दिवसांतच मुळे फुटून तो रुजू लागतो.
एखादा तुकडा काढून तसाच कोरडा कागदात गुंडाळून आठ दिवसांनी पुन्हा जमिनीत लावा, तोही न कुरकुरता रुजून जातो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तग कसा धरावा, हे कॅक्टसकडून शिकण्याजोगे आहे की नाही ?
निवडुंगाच्या फळांना वाढती मागणी
आत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित वनस्पती म्हणून निवडुंगाकडे बघितले जायचे. परंतु निवडुंगाच्या काही जाती मानवी खाद्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आल्यामुळे या जातींची लागवड अमेरिकेतील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली. त्यामुळे आता निवडुंगाची फळे आणि प्युरी अमेरिकेतील बाजारपेठांत दिसू लागली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील शेतकऱ्यांनी अमेरिका आणि कॅनडामधील बाजारपेठांची मागणी लक्षात घेऊन खाण्यासाठी योग्य निवडुंगाची लागवड सुरू केली. त्याची स्वतंत्र बाजारपेठही विकसित झाली आहे. निवडुंगाच्या फळांना खाण्यासाठी शहरी भागात मागणी वाढत आहे. यंदाच्या वर्षी कॅलिफोर्निया राज्यातील हवामान बदलामुळे निवडुंगाचे उत्पादन थोडे उशिरा सुरू झाले.
Share your comments