फवारणी मध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दर्जा कसा आहे यावरदेखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. पाण्याचा दर्जा हा दोन प्रकारे बघितला जातो. पहिला म्हणजे पाणी किती स्वच्छ आहे ते आणि दुसरा म्हणजे पाण्याची रासायनिक परिस्थिती कशी आहे ते. पेस्टीसाईड्सचा रिझल्ट चांगला मिळावा यासाठी आपल्याकडील पाणी तपासून पाहणे सयुक्तिक ठरेल.फवारणीतील पेस्टीसाईड्सचा रिझल्ट हा खाली दिलेल्या पाण्याच्या चार प्रकारच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो :पाण्याची दुष्फेनता :- दुष्फेन पाणी म्हणजे असे पाणी ज्यात साबणाचा फेस सहजपणे होत नाही. याचे कारण म्हणजे त्यात धनभारित (पॉझिटीव्ह
चार्ज) असलेली खनिजे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असतात. जसे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि लोह. ही जास्तीची खनिजे तणनाशकांतील (जसे ग्लायफोसेट, 2,4-D) रेणूंना जोडली जाऊन त्यांचा प्रभाव कमी करतात. ही पाण्याची दुष्फेनता 350ppm पेक्षा कमी असल्यास तणनाशकांचे चांगले रिझल्ट्स मिळतात.पाण्याची दुष्फेनता आणि जास्तीचा टीडीएस यांचा जवळचा संबंध आहे. टीडीएस जास्त असणे म्हणजे त्यात सर्वच प्रकारचे क्षार जास्त असणे आणि दुष्फेन असणे म्हणजे वर सांगितलेली खनिजे जास्त असणे.बाय कार्बोनेट :- सोडियम तसेच कॅल्शियम बाय कार्बोनेट चे प्रमाण जास्त असेल तरीही काही तणनाशकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
पीएच (सामू) :- हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. पीएच सोबत पाण्याची दुष्फेनता आणि पेस्टीसाईड्स वर त्याचा किती परिणाम होतो हे पाहणे गरजेचे असते. सामान्यतः ४.५ ते ७ चा पीएच हा योग्य समजला जातो. मात्र काही पेस्टीसाईड्स हे ४.५ पेक्षा कमी पीएच ला पाण्यात चांगले विरघळतात तर काही ७ पेक्षा जास्त पीएच ला अधिक प्रभावी ठरतात. अनेक कीटकनाशके जास्त पीएच असेल तर तितकेसे प्रभावी ठरत नाहीत.पाण्याची स्वच्छता :-पाणी किती स्वच्छ आहे यावर दखील पेस्टीसाईड्सचा प्रभावीपणा ठरत असतो.पेस्टीसाईड्सचा प्रभावीपणा कसा टिकवता येईल?फवारणीसाठी पाणी घेताना ते कुठून येते आहे हे बघा. शक्य असल्यास स्वच्छ पाणी घ्यावे. विहिरींचे पाणी शक्यतो जास्त दुष्फेन असते. जमल्यास पाण्याची चांगल्या प्रयोगशाळेतून तपासणी करावी.
ते शक्य नसल्यास पाण्याचा फक्त EC तपासला तरी एक दिशा मिळू शकेल. ४०० पेक्षा कमी EC असेल तर ते पाणी तसे सुरक्षित मानले जाते. ४०० पेक्षा जास्त EC असेल तर त्या पाण्याची दुष्फेनता तपासून बघणे आवश्यक आहे.जर पाणी जास्त दुष्फेन असेल तर त्यात लिटरला १ ते ३ ग्रॅम अमोनियम सल्फेट टाकून मग तणनाशक टाकल्यास बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. मात्र अमोनियम सल्फेट खरेदी करताना ते फवारणीसाठी योग्य असलेलेच घ्यावे. त्यातील ऋणभारित (निगेटिव्ह चार्ज) असलेले सल्फेटचे रेणू तणनाशकांचा प्रभाव कमी होऊ देत नाही.मात्र हे मिश्रण करताना खतांसोबत ते तणनाशक चालते का हे तपासून घेणे गरजेचे आहे. पाण्याचा पीएच व दुष्फेनता माहीत नसेल तर अंदाजे असे प्रयोग करणे टाळावे. तसेच, कंपनी प्रतिनिधींना अथवा कंपनीच्या कॉल सेंटरला विचारून मगच मिश्रणे करावीत.
Share your comments