महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र, खरीप हंगामात या पिकाची लागवड पुणे, सातारा व अहमदनगर या जिल्ह्यांतील काही ठराविक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्र राज्यात बटाट्याचे बियाणे निर्माण केले जात नाही. उत्तर भारतातून आणलेल्या बियाणावरच शेतकर्यांना अवलंबून राहावे लागते.
दरम्यान आज आपण या लेखातून बटट्यावर येणाऱ्या रोगांविषयीची माहिती घेऊया. त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचीही माहिती आपण त्यातून घेणार आहोत.
-
पिकातील पाने गुंडाळणारा विषाणू ( लिफ रोल व्हायरस) : रोगग्रस्त बटाट्यामुळे या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव होऊन पुढे मावा आणि तुडतुडे या किडीमुळे या रोगाचा दुय्यम प्रसार होऊ शकतो. या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव बटाटा पिकास झाल्यास पाने आत वळून आकसतात, पाने पिवळसर पडतात आणि रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना बटाटे छोट्या आकाराचे आणि कमी प्रमाणात लागतात या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास बटाट्याच्या उत्पादनात 25 ते 50 टक्क्यांपर्यंत घट संभवते.
-
बटाटा पिकावरील वाय विषाणू ( पोटॅटो व्हायरस वाय) : या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास बटाटा पिकात नवीन पाने आकसलेली व रंगहीन दिसतात तसेच पाने, देठ, फांदी करपल्या सारखी दिसते. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते व रोगग्रस्त पाने गळतात. या रोगाचा प्रसार मावा या किडी मार्फत होऊ शकतो.
-
पर्पल टॉप रोल व्हायरस : बटाटा पिकात हा रोग फायटोप्लाजमा या घातक लसीमुळे होतो. या रोगात बटाट्याची पाणी वाळतात आणि आकसतात. शेंड्याकडील पानाचा खालचा भाग जांभळट गुलाबी दिसतो. बटाट्याची खालील जुनी पाने पिवळी होतात, रोगग्रस्त झाडाची उंची खुंटते बटाट्यास बारीक केसाळ कोंब फुटतात. या रोगाचा प्रसार तुडतुडे या किडींमार्फत होतो.
-
बटाटा पिकात जखमी वाटे किंवा रोगट भागाच्या स्पर्शाने पसरणारे विषाणूजन्य रोग : या रोगामध्ये बटाट्याच्या पानात हिरवट डाग पडून शिरा पिवळसर दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास पूर्ण पान पिवळे पडून झाडाची उंची खुंटते. पी .व्ही. एस. विषाणूमुळे बटाट्याची पाने तांबूस तपकिरी दिसतात त्यामुळे उत्पादनात घट येते.
-
या रोगाचा प्रसार बटाटे कापतांना रोगग्रस्त बटाट्यापासून निरोगी बटाट्यात होतो पुढे झाडाच्या फांद्या जवळच्या निरोगी झाडावर घासल्यास किंवा पिकांमधून फिरताना आंतरमशागतीच्या वेळी अवजाराच्या इजामुळे आणि मावा या किडी द्वारे या रोगाचा दुय्यम प्रसार होतो.
हेही वाचा : बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञानाचा करा अवलंब; मिळवा भरघोस उत्पन्न
बटाटा पिकावरील विषाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना :
-
बटाट्याची लागवड करताना विषाणूजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता रोगमुक्त बियाण्याचा म्हणजेच रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा.
-
विषाणूजन्य रोगाची लक्षणे बटाटा पिकात दिसताच पहिले एकटे दुकटे रोगट झाड उपटून नष्ट करावे.
-
बटाट्याचे शेत तणविरहित ठेवावे तसेच पिकांची फेरपालट करावी.
-
बटाटा पिकात मावा व तुडतुडे या विषाणूजन्य रोगाच्या दुय्यम प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या किडीचे योग्य निदान करून खालील निर्देशीत कोणत्याही एका कीटकनाशकांचा प्रादुर्भावानुसार गरज असेल तर तरच वापर करून मावा व तुडतुडे या किडीचे व्यवस्थापन करावे Thiamethoxam 25% WG 2 ते 3 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा Methyl dematon 25 % EC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी
-
यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची मावा व तुडतुडे या किडीच्या व्यवस्थापनासाठी व त्यापासून पुढे होणाऱ्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य निदान करून गरजेनुसार फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
१. रसायनाची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा.
२. रसायनाची फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे.
३. रसायनाची फवारणी करताना सुरक्षित कीटकनाशक फवारणी तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा तसेच फवारणी करताना सुरक्षा किटस चा वापर करावा.
Share your comments