' वरळं सुटलं ' हे ग्रामीण भागात साधारण जानेवारीच्या शेवटी व फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येणारं वाक्य आहे. ह्याच्याच जोडीला ' लई कळंघण सुटलं ' असे ही बोललं जातं.
काय आहे हे? काय प्रकार आहे हा? काय हवामान शास्त्र आहेत ह्या मागे? काय अर्थ आहे ह्याचा?
ज्यावेळेस हवेत कमी आर्द्रता असते आणि असे कमी आर्द्रतायुक्त कोरडे थंड वारे(Chilled Wind) भले साधारण वेग असु दे, पण मानवी शरीरावर जेंव्हा त्याचे आसूडा सारखे वेगाने फटके बसावे असे आदळतात तेंव्हा थंडी तर वाजतेच पण ती थंडी शरीरात इतकी भिनते कि काही करा, शरीरातून लवकर बाहेर पडतच नाही. माणूस आजारीच पडतो. कानात ही हवा शिरल्यावर कान गच्चं होतात. कोरडा कफ व खोकला सुरु होतो. माणूस खेसून खेसून बेजार होतो.
ह्या ' वरळा 'चा, कळंघांना ' चा ४०-५० दिवसाचा काळ व त्याचा कालावधीही ठरलेला असतो. पूर्वी होळीपौर्णिमेच्या च्या एक महिना अगोदर गोवऱ्या लाकडं एका ठिकाणी सार्वजनिकरित्या ग्रामस्थाकडून ज्या ठिकाणी गोळा व्हाव्यात असे अपेक्षित असते असे ठिकाण खूण म्हणून ज्या माघ महिन्यातील पौर्णिमेला गावकऱ्यांकडून दांडा रोवला जातो तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील माघी पौर्णिमा म्हणजेच दांडी पौर्णिमा होय. साधारण ' दांडी पौर्णिमेच्या अगोदर १५-२० दिवस ते साधारण होळीपर्यंत ह्या वरळं व कळंघणाचा कालावधी जाणवतो.
हाच कालावधीला 'झुंझूरमास' (धनुर्मास ) किंवा धुंधुर्मास किंवा शून्यमास ही म्हणतात. म्हणूनच थंडीपोषक असा शाकाहारी खाद्याचा खानपानात समावेश करूनही वेगळ्या पद्धतीने हा कालावधी साजरा केला जातो. सूर्याचा धनु राशीत प्रवेश होतो म्हणून झुंझूरमास' बरोबर धनुर्मास ही म्हणतात.
ह्याच कालावधीत आपल्या देशात कर्कवृत्तच्या उत्तरेत थंडीचे प्रमाण अतिटोकाचे असते. हवेचा दाबही अक्षवृत्तासमांतर तेथे जास्त असतो म्हणजेच हवेच्या दाबाची पोळ( High Pressure Ridge ) तयार होते. ही समुद्र सपाटी पासुन साधारण एक किमी च्या आसपास असते. त्यातच त्यामुळे तेथे अचक्रीय वाऱ्यांची स्थिती( घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार वारे उंचावरून खालच्या दिशेने वाहने अशी स्थिती ) तयार होऊन फेब्रुवारी महिन्यात वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे असते ती ह्या पद्धतीने. भले तंतोतंत उत्तर - दक्षिण दिशा नसली तरी वारा-वेग-दिशेचा एक काम्पोनंट हा उत्तरेकडून दक्षिणेकडे असतो तर वेग १२-१५ नॉट म्हणजेच ताशी २५-२७ किमी तर त्याचा झटका (Gust ) हा ताशी ३० किमी घेऊन जातो. पर्यायाने हा वारा कर्कवृत्त व त्याच्या दक्षिणेकडे म्हणजेच मध्य भारत व महाराष्ट्रात आदळतो. म्हणूनच आपल्याला ह्या कालावधीत ' वरळ ' व ' कळंघण ' चा अनुभव येतो. मानवी शरीरावर त्याची नक्कीच बाधा होते.
ह्याचं दरम्यान आगाप रब्बी पिके कापणीस येतात. टोमॅटो सारख्या पिकांना व इतरही पिकांना पाणी देतांना अडचणी येतात. कांदा भाजीपाला पिक फवारणीस त्रास होतो. ह्या वरळयुक्त वाऱ्यामुळे वाढलेल्या गव्हाच्या पिकावर पक्षवात झाल्यासारखे पिकात जीव न राहता कोसळतात. शेतकरी ' वारं ' गेलं म्हणतात. ज्वारी, मका, ऊस पीक जमिनीवर आडवे होतात. मग उसाला उंदीर लागतात तर कोल्हे रानडुकरांना पिके फस्त करण्यास सहजता मिळते.
ह्यावर्षी तर अजुनही उत्तर भारतात पश्चिम प्रकोप आदळतच आहेत. तेंव्हा कळंघण तीव्रता ह्या वर्षी तर अधिकच जाणवेल.अन तोच काळ सुरु असुन त्याची सुरवात झाली आहे. हेच ते ' वरळ ' अन हेच ते ' कळंघण '
Share your comments