1. कृषीपीडिया

स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धन, २ महिन्यांत तयार होते उत्कृष्ट प्रतीचे खत

स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे आधीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते. तसेच त्यात अळिंबी बुरशीचे धागे शिल्लक असल्याने कमी कालावधीत (२ महिन्यांत) उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होऊ शकते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
स्पेंट मशरूम कंपोस्ट

स्पेंट मशरूम कंपोस्ट

स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे आधीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते. तसेच त्यात अळिंबी बुरशीचे धागे शिल्लक असल्याने कमी कालावधीत (२ महिन्यांत) उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होऊ शकते.

पारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. हे पदार्थ कुजण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे आधीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते. तसेच त्यात अळिंबी बुरशीचे धागे शिल्लक असल्याने कमी कालावधीत (२ महिन्यांत) उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होऊ शकते.

अळिंबी उत्पादनानंतर शिल्लक राहिलेल्या बेड किंवा माध्यमास ‘स्पेंट मशरूम कंपोस्ट’ (एसएमसी) किंवा ‘स्पेंट मशरूम सबस्ट्रेट’ (एसएमएस) असे म्हणतात. प्रति किलो अळिंबी उत्पादनामागे साधारणपणे ५ ते ६ किलो स्पेंट मशरूम कंपोस्ट शिल्लक राहते. सध्या महाराष्ट्रामध्ये वर्षाला २५,००० मे. टनांपेक्षा जास्त विविध प्रकारच्या अळिंबीचे उत्पादन घेतले जाते. त्यापासून साधारणपणे १.२५ ते १.५ लाख मे. टनांपेक्षा जास्त मशरूम कंपोस्ट तयार होते. चांगल्या दर्जाचे कंपोस्ट तयार करण्यासाठी स्पेंट मशरूमवर योग्य कंपोस्टिंग प्रक्रिया करावी लागते. नैसर्गिक कंपोस्टिंग प्रक्रियेसाठी लागणारा काळ अधिक असून, जागाही अधिक लागते. एवढी जागा, वेळ आणि मनुष्यबळ अळिंबी उत्पादकांकडे उपलब्ध असेलच असे नाही. परिणामी, कंपोस्टिंग प्रक्रियेकडे दूर्लक्ष केले जाते. वास्तविक स्पेंट मशरूम कंपोस्टपासून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट तयार होते. त्याच्या विक्रीतून आर्थिक फायदाही मिळू शकते.

बटण अळिंबी लागवडीमध्ये साधारणपणे ६० टक्के भुस्सा, ४० ते ५० टक्के कोंबडी खत आणि यांच्या एकत्रित वजनाच्या २ ते ४ टक्के जिप्सम, १.५ ते २ टक्के पेंड, १.० टक्का युरिया इत्यादींच्या वापर करून कंपोस्ट तयार केले जाते. यावर अळिंबीची वाढ चांगली होते.
यामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेले सर्व अन्नघटक उपलब्ध असून, त्यापासून मिळवलेल्या कंपोस्टचा दर्जा चांगला असतो. स्पेंट मशरूम कंपोस्टनिर्मितीसाठी अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे येथे अनेक प्रयोग केले. या सेंद्रिय पदार्थामध्ये गांडुळे सोडून गांडूळ खत कमी कालावधीत तयार होऊ शकते.

 

पारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. हे पदार्थ कुजण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे आधीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते. तसेच त्यात अळिंबी बुरशीचे धागे शिल्लक असल्याने कमी कालावधीत (२ महिन्यांत) उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होऊ शकते. पारंपरिक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी इंदोर पद्धत, बंगळूर पद्धत, सुपर कंपोस्ट पद्धत, नॅडेप पद्धत इ. पद्धतींचा अवलंब केला जातो. स्पेंट मशरूम सबस्ट्रेटपासून कंपोस्ट करण्यासाठी या पद्धतींची आवश्यकता नसते. हे कंपोस्ट साध्या व सोप्या पद्धतीने करता येते.
कंपोस्ट निर्मितीसाठी पूर्वतयारी

अळिंबीची काढणी झाल्यानंतर शिल्लक बेड अळिंबी प्रकल्पाजवळ टाकू नयेत. अन्यथा, त्यावरील
रोग-किडींचा प्रकल्पातील नवीन येणाऱ्या अळिंबीवर प्रादुर्भाव होऊ शकतो.
कंपोस्ट तयार करण्यासाठी अळिंबी प्रकल्पापासून किमान ४ ते ५ किमी लांब असलेल्या मोकळ्या पडीक जागेची निवड करावी.
बेड प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून पिशव्यांची तोंडे बंद करून कंपोस्ट निर्मितीच्या जागी न्याव्यात. तेथे पिशव्यांमधून बेड बाहेर काढून घ्यावेत.

स्पेंट मशरूम कंपोस्ट तयार करण्याची पद्धत

  • हे कंपोस्ट तयार करण्यासाठी ढीग पद्धत उपयुक्त आहे. ही पद्धत कोणत्याही कमी किंवा जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये उपयोगी ठरते.
  • ढिगाची लांबी आवश्‍यकतेनुसार आणि रूंदी २ ते २.५ मीटर ठेवावी. आखलेल्या जागेभोवती जवळपास १० सेंमी उंचीची मातीचा थर चारही बाजूंनी द्यावा.
  • त्यानंतर पिशवीतून काढलेले बेड आखलेल्या जागेत एकसारखा (१ ते दीड फूट जाडीमध्ये) पसरून घ्यावेत. थर ओलसर होईल इतके पाणी त्यावर शिंपडावे.
  • थरावर जिवाणू खते (ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी) प्रत्येकी ५०० ग्रॅम प्रति ५० लिटर पाण्यात मिसळून प्रति १ टन स्पेंट मशरूम सबस्ट्रेट या प्रमाणात प्रत्येक थरावर फवारावे. अशाप्रकारे थरावर थर टाकत जावेत. यामध्ये कंपोस्ट जिवाणू संवर्धक टाकण्याची आवश्‍यकता नाही. अळिंबीची बुरशीच उत्तम कंपोस्टिंग घटक म्हणून काम करते.
  • ढिगाची उंची १.५ ते २ मीटर झाल्यानंतर थर टाकणे बंद करावे. शेवटचा थर निमुळत्या आकाराचा करावा. त्यावर शेण किंवा माती व पाण्याच्या मिश्रणाने लेपावे. यामुळे ढिगामधील उष्णता बाहेर पडत नाही. कुजण्याची प्रक्रिया जलद होते.
  • साधारणपणे १ महिन्यानंतर ढिगाची उलथापालथ करावी. त्यामुळे सर्व सेंद्रिय पदार्थ एकसारखे कुजतात. थरांतील पाण्याचे प्रमाण कमी वाटल्यास योग्य त्या प्रमाणात पाणी शिंपडावे.
  • या पद्धतीद्वारे स्पेंट मशरूम सबस्ट्रेट कुजवल्यास २ महिन्यांत चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.
    तयार कंपोस्टमध्ये १.१२ टक्के नायट्रोजन असते. ते वनस्पतींना हळूहळू उपलब्ध होते. ताज्या मशरूम कंपोस्टचा सरासरी सामू ६.६ ते ७.२५ असतो.

स्पेंट मशरूम कंपोस्टचे (एसएमसी) फायदे

  • कंपोस्ट तयार करण्यासाठी कमी कालावधी (सुमारे दोन महिने) लागतो. तसेच खर्च कमी येतो.
  • वनस्पतींना आवश्‍यक प्रमाणात पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
  • जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते.
  • पिकास सतत पाणी देण्याची गरज लागत नाही.
  • तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • यामध्ये साधारणपणे १.० ते १.१२ टक्का नत्र, ०.५० ते १.० टक्का स्फुरद व पालाश, ३० टक्के सेंद्रिय पदार्थ, प्रथिने ८.१९ टक्के, कार्बन १६.६ टक्के आणि कार्बन-नायट्रोजन प्रमाण १५:१ आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.
  • या कंपोस्टचा वारंवार किंवा जास्त वापर केल्याने मातीमधील कॅल्शिअमचे प्रमाण वाढून क्षारता वाढण्याची शक्यता असते. म्हणून हे कंपोस्ट सेंद्रिय पदार्थ कमी असलेल्या आम्ल मातीसाठी जास्त उपयुक्त आहे.

 

पॅकिंग व विक्री

पूर्ण तयार झालेले स्पेंट मशरूम कंपोस्ट हे गर्द तपकिरी ते काळसर रंगाचे असते. त्याला चांगला वास येतो. तयार कंपोस्टचा चांगला भुगा करून मोठ्या चाळणीच्या (१/२ इंच मेश) साह्याने चाळून घ्यावे. चाळल्यानंतर बारीक कंपोस्ट प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरावे. यासाठी २५ ते ३० किलो धारणक्षमतेच्या पिशव्यांवर आकर्षक छपाई करून घ्यावी. त्यावर सोप्या आणि मोजक्या शब्दांत मालाचे नाव, मालाची ठळक वैशिष्ट्ये व फायदे, कंपनीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, लोगो, पॅकिंग दिनांक, किंमत आणि आवश्‍यक छायाचित्रे यांचा समावेश असावा. आकर्षक पॅकिंगमुळे विक्रीला फायदा होतो.

- डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११
(लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Value addition of spented mushroom compost, excellent quality manure is produced in 2 months Published on: 15 July 2021, 12:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters