1. कृषीपीडिया

वाडा बांधकाम साहित्य (मातीचे भेंडे)

पूर्वी मातीच्या भेंड्याचे बुरुज आणि बांधकाम कसे करत असत हे बऱ्याच जणांना माहित नसते म्हणून हा लेखन प्रपंच

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वाडा बांधकाम साहित्य (मातीचे भेंडे)

वाडा बांधकाम साहित्य (मातीचे भेंडे)

पूर्वी मातीच्या भेंड्याचे बुरुज आणि बांधकाम कसे करत असत हे बऱ्याच जणांना माहित नसते म्हणून हा लेखन प्रपंच. वाडा बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या विटांना भेंडे म्हणतात. वाडा बांधण्यासाठी पूर्वी कांही ठिकाणी मातीचे भेंडे तर कांही ठिकाणी भाजलेल्या चपट्या सपाट विटा वापरत असतं. पूर्वी आपल्या पूर्वजांनी मातीचे परीक्षण करून विशिष्ट अंदाज बांधण्यासाठी स्वतःची अशी शैली विकसित केलेली होती. अनेक ठिकाणच्या मातीचे नमुने गोळा करून त्याच्या ते चाचण्या घेत असत. 

पाणथळ जमिनीत उभे व आडवे चर करून खोदून घेत असत, पावसाळ्यात पावसाचे पाण्याबरोबर माती वाहून त्या चरात बसते अशी माती काढून घेऊन त्या मातीमध्ये योग्य ते पदार्थ मिसळून ती माती बांधकामात वापरत असत. ज्या ठिकाणची माती उत्तम प्रकारची आहे असे लक्षात आल्यावर ती माती भेंडे किंवा विटा तयार करण्यासाठी वापरत असत. प्रथम ती माती चाळून घेत.

चाळलेली माती २१ दिवस भिजत ठेवली जाई. त्यामध्ये गुळ, बेल, भेंडी, गाईचे शेण, डिंक, घोड्याची लीद, साबुदाणा, कात, ताग, उडदाचे पीठ, जवसाचे पाणी, गुगुळ, हिरडा, बेहरडा, आवळा, बाबळीच्या बिया असे चिकटपणा निर्माण करणारे पदार्थ ज्या त्या भागात जे पदार्थ उपलब्ध होत, ते पदार्थ त्यात मिसळले जात. माती एकजीव व मऊ होण्यासाठी ती रोज रेडा, हत्ती, बैल किंवा माणसं यांच्याकडून तुडवली जाई. माती एकजीव झाल्यावर त्याच्या विशिष्ट आकाराच्या विटा तयार करीत. अशा विटांना भेंडे म्हणतं. 

भेंड्याचे आकार वेगवेगळे असून खालच्या बाजूला मोठाले तर वरच्या बाजूला छोटे भेंडे असत. तयार झालेले भेंडे प्रखर उन्हामध्ये वाळविले जात. पावसाचा त्यावर प्रत्यक्ष परिणाम पाहण्यासाठी त्या पावसात भिजत ठेवत. किंवा पाण्याच्या धारेखाली धरून त्याची परीक्षा घेतली जाई. वाळलेल्या भेंड्यावर टिकावाचे अथवा पहारीचे घाव घातले असता सहजासहजी तुटणारा नसावा. मार लागला तेवढा छोटासा टवका उखडला पाहिजे असे ते परीक्षण असे. एक भेंडा एका व्यक्तीला उचलणार नाही याची खात्री केली जाई. 

अशा पद्धतीने भेंडे तयार करत व चाचण्याही करत असत.

पूर्वी बांधकामात सिमेंट वापरलं जात नव्हतं. त्याला पर्याय होता पांढरी माती. ही माती चिवट असायची. उन, वारा,पाऊस, धरणीकंप यांचा तडाखा सोसून गेली चारपाचशे वर्षे झाली तरी पांढऱ्या मातीच्या भिंती, बुरुज, वाडे, गढ्या आजही सुस्थितीत आहेत. आत्ताच्या सिमेंटलाही मागे टाकेल अशी ही पांढरी चिवट माती यावर संशोधन व्हायला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. वाड्याचे बांधकाम करताना परिसरातील सहज उपलब्ध होणारे दगड, माती, विटा, चुना, लाकूड मनुष्यबळ, कारागीर यांचा वापर करण्यावर भर असे. 

माती कोणतीही असो त्यामध्ये बिया रुजतात, गवत उगवते, झाडे उगवतात परंतु वाड्याच्या बांधकामासाठी वा बुरुजासाठी मातीचे जे मिश्रण तयार केले जाते त्यामध्ये गवत सुद्धा उगवत नाही. गड, किल्ले, वाडे, गढ्या बांधणीसाठी दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे आपण बघतो. याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी, भिंती, बुरुज ढासळलेले आपण बघतो

याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी, भिंती, बुरुज ढासळलेले आपण बघतो. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात माती वापरून देखील त्यामध्ये गवत, अथवा इतर झाडे वाढली नाहीत हे आश्चर्यजनक आहे. जर का झाडे वाढली असती तर असे अजस्त्र भिंती, बुरुज केव्हांच ढासळले असते. आता असा प्रश्न पडतो की, तीनचारशे वर्षापूर्वी अस कोणतं तंत्रज्ञान या मातीच्या निर्माणासाठी वापरलं होत की, ज्यामुळे ही माती दगडापेक्षाही दणकट बनवली गेली. आज इतक्या वर्षानंतरही या मातीत गवत देखील उगवत नाही. अशा अप्रतिम निर्माणकर्त्यानां मानाचा मुजरा.

 

‘वाडा’ या पुस्तकातून 

लेखक : शुभम सरकटे

फोन नं: 9545017729

English Summary: Vada construction Belongings bhende Published on: 10 January 2022, 06:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters