वृक्ष, वेली, पिके यांच्यावरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांची, फळफळावळीची होणारी नासाडी ही विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत शेतकी विज्ञानातील फार मोठी डोकेदुखी होती. निसर्गापुढे हात टेकण्यापलीकडे शेतकरी काहीच करू शकत नव्हता. मग प्रत्येक शेतकरी आपापले पारंपरिक तंत्र वापरीत असे.कोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपियन प्रदेशातील द्राक्षाच्या वेलींमध्ये अशाच एका बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला होता, फ्रान्स येथील बोर्दो विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक पियरे मेरी अलेक्सिस मिलादे हे त्या द्राक्ष
बागेच्या लागून असलेल्या रस्त्यावरून जात असताना, त्यांच्या लक्षात आले की रस्त्याला लागून असलेल्या द्राक्षवेलींमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव नव्हता, परंतु इतर सर्व द्राक्ष वेलींवर बुरशीने मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव केला होता. द्राक्षबाग मालकांच्या जुजबी चौकशीनंतर त्यांना कळले की रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी द्राक्षे खाऊ नयेत म्हणून द्राक्षवेलीवर कॉपर सल्फेट व चुना यांचे मिश्रण फवारण्यात आले होते. फवारणी केल्यामुळे द्राक्षं पटकन खावीशी वाटत नव्हती व कुणी खाल्लीच तर त्यांची चव कडू लागत होती. म्हणजे फवारणी रोगनिर्मूलनासाठी नव्हती तर केवळ द्राक्षाची चव बिघडवून
टाकण्यासाठी होती. बोर्दो विद्यापीठातील प्राध्यापक मिलादे यांनी १८८५ साली असा शास्त्रीय पुरावा सादर केला की हे मिश्रण बुरशीजन्य रोगापासून द्राक्षवेलीला वाचवू शकते. म्हणजे हा केवळ अपघाताने, नकळत लागलेला शोध होता. यालाच बोर्दो मिश्रण असे संबोधतात.मोरचूद (कॉपर सल्फेट) व चुना (कॅल्शियम ऑक्साइड) या घटकांचा योग्य प्रमाणात वापर करून बोर्दो मिश्रण तयार केले जाते. बोर्दो मिश्रण (१%) बनवण्यासाठी १:१:१०० हे गुणोत्तर वापरले जाते; ज्यात १ किलो पेंटाहायड्रेटेड कॉपर सल्फेट; १ किलो हायड्रेटेड चुना आणि १०० लिटर पाणी यांचे द्रावण बनविले जाते. बोर्दो मिश्रणाच्या फवारणीमुळे डाऊनी
मिल्डय़ू, पावडरी मिल्डय़ू आणि इतर रोगकारक बुरशींचा प्रादुर्भाव वनस्पतींवर होत नाही. बोर्दो मिश्रणाचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून बुरशींचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी केला जातो, नाही तर फवारा कुचकामी ठरतो.परंतु बोर्दो मिश्रणाचा वर्षांनुवर्षे अतिरेकी वापर हादेखील निसर्गाला मान्य नव्हता. शेतजमिनीत तांबे जमा होत राहिले व शेवटी जमिनीतील अति प्रमाणातील तांबे प्रदूषक बनले. म्हणून एके काळी संजीवनी ठरलेल्या बोर्दो मिश्रणाच्या विक्री आणि वापरावर निर्बंध लागू केले आहेत. एक पर्यावरणीय प्रश्न सुटला तर दुसरा डोकावतो हादेखील निसर्गाचाच नियम म्हणायला हवा.
डॉ. रंजन गर्गे
office@mavipamumbai.org
प्रसारक : दिपक तरवडे
संकलक : प्रविण सरवदे, कराड
Share your comments