
दोन लाख हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान ; अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून, कापूस, संत्रा, केळी, पपई, ज्वारी, मका, हरबरा आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि पाऊस पडत आहे. त्याचा फटका धुळे जिल्ह्यातील सिंदखेड, शिरपूर या तालुक्यांना बसला असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अकोला जिल्ह्यातील अकोला, अमरावती जिल्ह्यातील भातकुळी, तिवसा, मोर्शी, चांदुरबाजार या तालुक्यांतील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.
तीन दिवसांत अवकाळी पावसामुळे सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, गहू, हरभरा, कापूस, ज्वारी, केळी, पपई, तूर, कांदा, करडई, मोहरी ही पिके आणि भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे २८ आणि २९ डिसेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जालना, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, गडचिरोली,
भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील ६० हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून हातातोंडाशी आलेली जिरायत आणि बागायती पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Share your comments