ट्रायकोडर्मा टिकण्याची क्षमता किंवा वैधता ही फक्त ६ महिने इतकीच असते. ही क्षमता वाढवण्याच्या मायक्रोबियल इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानाने ट्रायकोडर्माच्या गोळ्या (बायोकॅप्सूल) तयार करण्यात आल्या आहेत.
निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही रोगकारक, तर काही पिकांचे रोगापासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. मातीमध्ये वाढणारी ट्रायकोडर्मा ही बुरशी सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी परोपजीवी व अन्य रोगकारक बुरशीवर उपजीविका करते. पिकांच्या जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ॲस्परलम आणि ट्रायकोडर्मा हरझानियम या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. सुमारे ८७ वेगवेगळ्या पिकांवर आणि मातीमधील ७० रोगकारक बुरशी आणि झाडावरील १८ बुरशींच्या नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्माचा वापर केला जातो.
त्यातही ट्रायकोडर्मा ॲस्परलम ही प्रजाती खूप प्रचलित आहे. भारतामध्ये ट्रायकोडर्मा हा १८५० टन प्रति वर्ष वेगवेगळ्या प्रकारे तयार केला जातो.
पिकातील वापर ः
कापूस, तेलबिया, कडधान्ये, भाजीपाला अशा विविध पिकांवर सुरुवातीच्या काळात मर, मूळकूज, खोडकूज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकतात.
या रोगासाठी फ्युजारीअम, पिथीअम, रायझोक्टोनिया आणि फायटोप्थोरा अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकाचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकाचा वापर फायदेशीर ठरतो.
ट्रायकोडर्मा ही फक्त बुरशीनाशक म्हणूनच नव्हे, तर सूत्रकृमीसारख्या काही किडींच्या नियंत्रणामध्येही चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे पुढे आले आहे.
ट्रायकोडर्मा हा जैविक उत्तेजक, पिकातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी असून, पिकाला होणाऱ्या जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यास मदत करते.
पिकाला मातीतून वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठीही मदत करते.
नावीन्यपूर्ण उत्पादन ः
भारतामध्ये ट्रायकोडर्माची वेगवेगळ्या उत्पादकांनी तयार केलेली सुमारे १०० पेक्षा जास्त नोंदणीकृत उत्पादने बाजारात पावडर व द्रब स्वरूपात उपलब्ध आहेत. या स्वरुपातील ट्रायकोडर्मा टिकण्याची क्षमता किंवा वैधता ही फक्त ६ महिने इतकीच असते. कारण ट्रायकोडर्मा ही जिवंत बुरशी असून, ती जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. हळूहळू त्यातील पेशींची संख्या हळूहळू कमी होत जाते. या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने मायक्रोबियल इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानाने ट्रायकोडर्माच्या गोळ्या (बायोकॅप्सूल) तयार करण्यात आल्या आहेत. त्यांची वेगवेगळी फॉर्म्यूलेशन्सही तयार करण्यात आली आहेत.
सेंद्रिय शेतीमध्ये पीक संरक्षणासाठी विविध जैविक नियंत्रक घटकांचा वापर केला जातो. यात वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात. या प्रत्येकाचा आपला एक नैसर्गिक जीवनक्रम आणि आयुष्यकाळ (उत्पादनाच्या भाषेत -टिकवणक्षमता) असतो. हा कालावधीही मर्यादित असतो.
आचार्य पदवीच्या संशोधनामध्ये आम्ही मायक्रोबियल इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांचे वेगवेगळे फॉर्म्यूलेशन तयार करून त्याचे परीक्षण केले असता या सूक्ष्मजीवांच्या साठवणुकीचा कालावधी वाढला असल्याचे स्पष्ट झाले.
आमच्या अभ्यासामध्ये विविध प्रकारच्या साहित्य व मिश्रणांचा वापर करत १० वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायकोडर्मा गोळ्या व बायोकॅप्सूल तयार केल्या. तयार केलेल्या गोळ्या आणि बायोकॅप्सूलचे दर ३० दिवसाने निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेतल्या. या गोळ्या व बायोकॅप्सूल सुमारे २७० दिवस टिकून राहिल्या. म्हणजेच गोळीतील ट्रायकोडर्मा बुरशी ही २७० दिवस जिवंत राहिली. तसेच त्यातील पेशींची संख्याही व्यवस्थित राहिली. या अभ्यासातील नोंदी व निरीक्षणासाठी एम.एस्सी. (वनस्पती रोगशास्त्र) या अभ्यासक्रमांतर्गत मेघल सु. तायडे यांचीही मोठी मदत झाली.
ट्रायकोडर्माच्या सहा बायोकॅप्सूल –
१) टाल्क, २) जिलेटीन, ३) अल्जीनेट, ४) अल्जीनेट+ चारकोल (१:१), ५) जिलेटीन + कारखान्यातील राख (१:१), आणि ६) फक्त ट्रायकोडर्माचे तंतू आणि कॅप्सूल.
ट्रायकोडर्माच्या चार गोळ्याचे प्रकार -
१) टाल्क, २) लिग्नाइट, ३) चारकोल आणि ४) कारखान्यातील राख.
वरील साहित्यांमध्ये ट्रायकोडर्मा मिसळून तयार केलेल्या ट्रायकोडर्मा मिश्रणाचा वापर अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकतो. या प्रकारामुळे त्यांची साठवणूकही जास्त कालावधीपर्यंत करणे शक्य होते.
वरील प्रकारे तयार केलेल्या फॉर्म्यूलेशनमध्ये २७० दिवसांनंतर सगळ्यात जास्त ट्रायकोडर्माच्या पेशीची संख्या (४२.०० × १०--- ७ घात --- सीएफयू/ग्रॅम (कॉलनी फॉर्मिंग युनिट्स) ही फक्त ट्रायकोडर्माचे तंतू आणि कॅप्सूल यापासून तयार केलेल्या फॉर्म्यूलेशनमध्ये दिसून आली. तर सर्वांत कमी ट्रायकोडर्मा पेशीची संख्या ही ट्रायकोडर्माच्या लिग्नाइट या गोळ्यांच्या फॉर्म्यूलेशनमध्ये (११.३३ × १० --- ७ वा घात --- सीएफयू /ग्रॅम) दिसून आली.
निष्कर्ष ः
फक्त ट्रायकोडर्मा अॅस्परलमचे तंतूपासून तयार केलेल्या बायोकॅप्सूलची टिकवण क्षमता ही सर्वांत जास्त कालावधीची आहे .त्यानंतर ट्रायकोडर्मा अॅस्परलम +अल्जीनेट बायोकॅप्सूलची टिकवण क्षमता ही जास्त आहे.
तंत्रज्ञानाचे फायदे :
सामान्य तापमानात (१८ ते २४ अंश सेल्सिअस) उत्पादन आणि साठवणूक शक्य.
उत्पादन खर्च कमी लागतो.
पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञान.
सूक्ष्मजीवांचे वितरण, हाताळणे आणि साठवणूक सोपे होते.
पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
फायदेशीर सूक्ष्मजीवांचे उत्पादन आणि त्यांचा साठवणुकीचा कालावधी वाढतो. त्याचा विक्री, वितरण सोपे होणार आहे.
Share your comments