पेरणीनंतर गव्हाचे वाढीच्या संपूर्ण कालावधीत पाण्याची गरज असते. अपेक्षित उत्पादनासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाणी दिल्यास खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.गव्हाची पेरणी होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी झाला असेल त्यांनी तक्तामध्ये दिल्याप्रमाणे गव्हाच्या पिकास संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. मध्यम जमिनीत एक ज्यादा पाणी गरजेनुसार द्यावे.ज्या शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीमध्ये गव्हाची पेरणी केली आहे त्यांनी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यास २५ टक्के पाण्याची बचत होते. पहिल्या पाण्याच्या वेळेला युरिया खताचा दुसरा हप्ता हेक्टरी १३० किलो युरिया द्यावा.
पहिले पाण्यास उशीर झाल्यास उत्पादनात हेक्टरी दोन क्विंटल घट येऊ शकते.पाण्याचा तुटवडा असल्यास शेततळ्याच्या माध्यमातून गव्हाच्या पिकास संरक्षित पाणी द्यावे. त्यामध्ये एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४५ दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे.गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी १८ ते २१ व दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी १८ ते २१ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४५ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
पीक वाढीच्या काळात पाणी व्यवस्थापन.
पाणी - देण्याची वेळ पिकाची अवस्था
पहिले पाणी :पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी मुकुटमुळे फुटण्याची सुरवात
दुसरे पाणी :पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी कांडी धरण्याची अवस्था
तिसरे पाणी :पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
चौथे पाणी :पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी दाणे भरण्याची अवस्थेत
प्रवीण सरवदे , कराड
Share your comments