जर आपण कांदा पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आताचा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये उन्हाळी कांद्याचे रोपवाटिका टाकण्यासाठीची धावपळ शेतकरी बंधूंची चाललेली आहे. कारण कांद्यापासून जर भरपूर उत्पादन हवे असेल तर रोपवाटिकेचे व्यवस्थापन अगदी तंतोतंत आणि काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. कारण रोपवाटिकेच्या माध्यमातूनच निरोगी आणि सुदृढ अशा रोपांची निर्मिती होते व त्या माध्यमातूनच भविष्यकालीन कांद्याचे उत्पादन चांगले मिळते.
आपल्याला माहित आहे की उन्हाळी कांदा लागवडीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये गादीवाफे तयार करून कांद्याचे रोप टाकले जाते. या कालावधीत टाकलेल्या कांद्याचे पुनरलागवड ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते.
जर आपण खरीप हंगामात लागवड केलेल्या कांद्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत जर उन्हाळी हंगामामध्ये कांद्याच्या मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर ते जास्त मिळते. या हंगामामध्ये हेक्टरी सरासरी 250 क्विंटल कांद्याचे उत्पादन मिळणे शक्य आहे.
कांद्याच्या वाणापासून सुरुवात असते महत्त्वाची
उन्हाळी हंगामामध्ये जो काही कांदा लागवड केली जाते त्यासाठी वाण निवडताना ते साठवणुकीसाठी योग्य असलेल्या वाणाची निवड करणे महत्त्वाचे असते.
यासाठी तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले एन-2-4-1 या वाणाची निवड करू शकतात. कारण हा वाण उन्हाळी व रब्बी हंगामात लागवडीकरता खास विकसित केलेला आहे. त्यासोबतच अर्का निकेतन सारख्या वाणांचा वापर देखील महत्त्वाचा ठरतो.
कांदा लागवडीसाठी एकसारख्या रोपांच्या वापर केला तर एक सारख्या आकाराच्या कांद्याचे उत्पादन मिळण्यास मदत होते व असे कांदे चाळीत साठवणुकीसाठी देखील महत्त्वाचे ठरतात. त्यासाठी रोपवाटिकेत रोपांची एकसारखी वाढ होणे गरजेचे असून त्यासाठी 3:2 मीटर आकाराचा गादीवाफा तयार करणे गरजेचे आहे.
गादीवाफ्यामध्ये कांद्याची बी टाकताना घ्यायची काळजी
गादीवाफे तयार केल्यानंतर प्रत्येक गादीवाफ्यात एक ते दोन पाट्या चांगले कुजलेले शेणखत, अडीचशे ग्रॅम 15:15:15 व वीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईडची पावडर मिसळावी. बियाणे टाकताना दहा सेंटिमीटर अंतराच्या ओळीमध्ये बियाणे पातळ पेरावे.
जेव्हा रोपाची उगवण होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने रोपास नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन एक हलकीशी निंदणी करून घ्यावी व त्यानंतर प्रत्येक वाफेस 50 ग्रॅम युरिया व पाच ग्रॅम थायमेट द्यावे. रोप टाकण्याला एक महिना झाल्यानंतर दहा लिटर पाण्यामध्ये दहा मिलि मेटासिस्टॅक 25 ग्रॅम डायथेन एम 45 आणि दहा मिली स्टिकर द्रव्य मिसळून एक फवारणी करावी.
Share your comments